माझ्या राजकीय आठवणी १३

सन १९२० साली अनियंत्रीत कारभारांचे धोरण मागे पडून द्विदल राज्यपध्दतीचा पहिला अंकही त्याचवेळी समाप्त झाला व त्यापुढें प्रांतीक स्वायसत्तेच्या प्रयोगास सुरवात होवून, त्याची परिणती अखेर जबाबदार राज्यपध्दतींत किंबहुना सन १९२९ चा लॉर्ड आयर्विन यांचा जाहिरनामा लक्षांत घेता वसाहतीच्या स्वराज्याची तयारी वृध्दीमय होण्याची चिन्हे दिसू लागली. द्विदल राज्यपध्दती अमलांत आल्यापासूनच त्यांत मिळालेल्या जाबाबदारीच्या अपुरेपणाबद्दल हिंदी लोकांनी आपले असमाधान प्रकट केले होते. परंतु सन १९२० ते १९२३ ही तीन वर्षे हिंदी राजकारणांत असहकारतेच्या चळवळींत गेल्यामुळें सन १९२३ अखेर या धोरणांत बदल होवून असहकारीस्वराजिष्ट म्हणून कौन्सिलांत शिरले व त्यांनी असहकारीतेऐवजीं कौन्सिलांत अडवणुकीचे धोरण स्विकारले. त्यामुळें कौन्सिलांतील राजकारणास रंग चढला. सन १९२४ साली द्विदल राज्यपद्धतीच्या गेल्या चार वर्षाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमण्यांत आली व तिलाच रिफॉर्म्स-इन्क्वायरी कमिटी किंवा मुडिमन कमिटी असे म्हणतात. द्विदल राज्यपद्धती आगोदरच सदोष आणि त्या राज्यपद्धतीचा प्रयोग सरकार अंगचोर पद्धतीनें करीत असलेनें मिळाले ते हक्कहि जनतेच्या पदरी पडणेची मारामार होत असे. ही गोष्ट कमिटीने आपल्या बहुमत रिपोर्टात दाखवून दिली होती.

राजकारणांत चालू असलेल्या या उलथापालथी उघड्या डोळ्यांनी पाहून शक्यतेनुसार त्यांत भाग घेण्याच्या इच्छेनें दैनंदिन कार्यक्रम म्हणून लोकजागृतीसाठी एक सार्वजनीक वाचनालय चालवावे, असे आम्हा उभयतांच्या (श्री. यशवंतराव व माझ्या) मनांत आले. कराडांतील शनिवार पेठेत एक वाचनालय श्री. शिर्के  नांवाचे गृहस्थ चालवित होते. परंतु ते मोडकळीस आले होते, ते वाचनालय हाती घेऊन त्याची प्रगती करावी म्हणून आम्ही दोघे मिळून श्री. शिर्के यांचेकडे गेलो. आमचे बोलणे झाले, त्याप्रमाणें वाचनालय चालवायचे हेही ठरले. परंतु ते अमलांत येण्यापूर्वी श्री. शिर्के कराडातून कायमचेच निघून गेले. त्यामुळें प्रचाराचे एक साधन हाती घेण्याचा आमचा प्रयत्न फसला. या वाचनालयांत केवळ ब्राम्हणेतर चळवळीचे वाङ्मय व वृत्तपत्रे यानाच स्थान दिले गेले होते. त्यांत राष्ट्रीय वाङ्मयाची वृत्तपत्रांची भर घालून जनतेपुढें सर्वांगीण विचार ठेवण्याचा आमचा उद्देश होता. स्वतंत्ररितीनें वाचनालयाचा व्याप आर्थिक दृष्टीनें आम्हास झेपण्यासारखा नव्हता.

सन १९२७ साली श्री. दिनकरराव जवळकरांचे कराडांतील एका व्याख्यानांत अशीच आमची निराशा झाली. व्याख्यान कराडांतील डुबलगल्लीत झाले. व्याख्यान देतांना श्री. जवळकरांनी केलेल्या कांही विधानास विरोधी माहितीचे प्रश्न कराडचे श्री. बाबुराव गोखले यांनी विचारले. त्या विधानाबाबत खुलासा करतांना ती लोकमान्य टिळकांची विधाने म्हणून श्री. जवळकरांनी सांगितली होती व केसरी पत्रांतील तारीखवार अहवालही दिला होता. तेव्हा आम्ही दे. भ. पांडुआण्णा शिराळकर यांच्या घरी जाऊन केसरी पत्राचे त्या त्या तारखांचे अंक पाहिले. त्यांत श्री. दिनकरराव यांनी केलेली विधाने लोकमान्यांनी किंवा इतरांची अशी कोठेहि आढळून आली नाहीत. नंतर श्री. जवळकरांना भेटलो असतां म्हणाले कीं, वेळप्रसंगी प्रभावी बोलून फड मारावा लागतो.

या धक्क्यामुळे आमचे मन अस्वस्थ झाले होते, अशाचवेळीं मुसलमानाचे अनेक प्रश्न व गुंतागुंती याचा आम्हास उलघडा होत नव्हता. तुर्कस्थानची राजसूत्रे केपालपाशानें तेथील सुलतान व मुसलमानांचा खलीफायांचे हातून हिसकावून घेतल्यामुळे भारतीय-मुसलमान समाजांतील खिलाफतीचे महात्म्य संपले. सन १९२४ चे मुस्लिमलीगचे अधिवेशन लोहोरला बॅं. महमदअल्ली जीना यांचे अध्यक्षतेखाली भरले व त्यानंतर दोन मुस्लिमलीगा अस्तित्वात आल्याचे दिसून आले. बॅ. महमदअल्ली जीनांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सन १९२४ च्या अधिवेशनांत दोन मुस्लिमलीगा निर्माण झाल्या तेव्हां ही मुसलमानांतील दुफळी घट्ट झाली. देशावरील परिस्थितीचा परिणाम म्हणून मुसलमानांची सवत्यासुभ्याची मागणी अधिकाधिक बळकट झाली. सन १९२० ते १९२४ पर्यंत मुस्लिमलीगला चार वर्षे भारतायं काँग्रेसनें मौलाना महमदअल्ली व शौकतअल्ली यांच्या सहकार्यानें डोके वर काढू दिले नव्हते. त्या मुस्लिमलीगने देशांत आपला राजकारणी सवतासुभा निर्माण केला. सन १९२६ व १९२७ मध्ये दोन्ही मुसलमान पुढा-यांनी आपसांतील द्वैत गाडून टाकण्याचा प्रयत्न केला, तो निष्फळ झाला. तसेंच भारतीय काँग्रेस व इतर राजकीय पक्ष मधून मधून तडजोडीचा उपाय काढण्यासाठी परिषदा भरवून झटत होते. पण अशा परिषदांना यश आले नाहीं. मुसलमान समाज हजारो वर्षांची राज्यकर्त्यांची भूमिका सोडणे व मुजोरी सोडणे आणि प्रजाजनाशी समरस होणे. तसेंच पूर्वीच्या आक्रमक राजकारणास तिलांजली देणे या गोष्टी करावयास तयार नव्हता.