धर्म हा दहशतीचा विषय
गेल्या अनेक वर्षापासून धर्माचे एक अतिशय विचित्र रूप आपल्यासमोर आलेले आहे. ते केवळ भारतातच आलेले आहे असे नाही तर ही प्रक्रिया जागतिक स्वरूपाची आहे. आपण दोन धार्मिक गटातल्या दंगलींची हकीगत वर्तमान पत्रातून नेहमीच वाचतो. केवळ दोन वेगवेगळ्या धर्मांच्या समुदायांचा संघर्ष एक वेळ आपण समजू शकू परंतु एकाच धर्माच्या दोन पंथातील दंगलीही अंगावर शहारे आणणा-या आहेत. ज्या महापुरूषाने टोकाची अहिंसा आणि त्याग शिकवला त्या महावीराच्या नावाने देवस्थानाच्या मालकीसाठी जेव्हा श्वेतांवर आणि दिगंबर कोयता, कु-हाडी घेवून संघर्षाला बाह्या सावरीत असताना दिसतात त्यावेळी हा बाहुबली स्वत:ला काय म्हणत असेल ? जेव्हा एखादा बकरा ज्या झटक्यात कापला जातो त्याच झटक्यात अकाली आणि निरंकारी एकमेकांचे तलवारीने शिरच्छेद करतात त्यावेळी गुरू नानक आणि गुरू गोविंदसिंह यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील ? जर त्यांचा आत्मा अविनाशी आहे असे मानले जात असेल तर. जेव्हा सुन्नी आणि शिया एकमेकांच्या कत्तली करतांना या दोहोंचाही ज्या खुदावर विश्वास आहे तो कयामतच्या दिवशी आपल्याला काय विचारील याचा कधी हे आहे. जाती पोटजातीमधील सतत चालणा-या संघर्षाचा तपशील म्हणजे जणू हिंदूंचा इतिहास अशी अवनत आणि विकृत स्थिती आपण आपल्या इतिहासाला आणलेली आहे. या सर्व संघर्षात दोन्हीही बाजूकडील स्त्रिया या दंगलखोरांच्या वासनेच्या बळी ठरत आहेत. धार्मिक संघर्षात बलात्कार करणे हे पुरूषार्थाचे एकमेव कृत्य आहे असे मानून स्त्रियांशी दंगलखोरांची वागणूक असते. हे सारे आज आपल्या देशात उघडपणे आणि बेडरपणे चालू आहे. हे सारे धार्मिक पुनरूज्जीवनाच्या चळवळीचे अपत्य आहे. हा धार्मिक पुनरूज्जीवनवाद केवळ मुसलमानांचा किंवा हिंदूंचाच आहे असे मानण्याचे काहीच कारण नाही. जगातले सारेच धर्म या पुनरूज्जीवनवादाची शिकार बनले आहेत. इतरांच्या पेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत नव्हे श्रेष्ठ आहोत ही श्रेष्ठत्वाची अहंकारी भावना या पुनरूज्जीवनवादाच्या मुळाशी आहे. माणसाला अहंकारातून मु्क्त करण्यासाठी तर धर्मांचा सारा खटाटोप आहे. अहंकार विरघळल्याशिवाय माणूस मुक्त होत नाही अशी सा-या धर्मांची शिकवण आहे. परमेश्वर आणि माणूस यांच्या दरम्यान अहंकार हाच एक मोठा पोलादी पडदा असून तो भेदल्याशिवाय माणूस मुक्त होवून शकत नाही असा तर धर्मांचा दावा आहे. ज्या धर्मांनी परमेश्वराचे अस्तित्व मानले नाही त्यांनी सुध्दा सम्यक समाधी साठी अहंकाराचा त्याग ही पूर्वअट मानली आहे. मग या सर्वच धर्मांचे अनुयायी असे क्रूर का होत आहेत ? त्यांना रक्ताची चटक का लागली आहे ? त्यांना आपल्या श्रेष्ठत्वाच्या अहंकारांनी का ग्रासले आहे? हे प्रश्न सामान्य माणसाला बेचैन करतात. परंतु हे आजचेच नाही. हे तर पूर्वापार चालत आलेले आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधताना भले भले थकून गेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे ते प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथात शोधीत असतात. या सा-या संघर्षाची कारणे धर्मग्रंथात शोधणे हा शुध्द वेडेपणा आहे. काही माणसे तर ‘ सर्व धर्म समभावाचा ’ असा आव आणतात की त्यांना सारेच धर्म शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारे वाटतात हे सारे धर्म मुळात फार चांगले आहेत परंतु त्यांचे अनुयायी मूर्ख आहेत अशी भूमिका घेवून त्यांना त्यांच्या धर्मातील उदात्त त्त्वांची आठवण करून देणारे कीर्तंनकार, मौलवी आणि पाद्री आजचेच आहेत असे नाही इतिहासात ते सतत जन्मलेले आहेत. आयुष्यभर त्यांनी उपदेश केलेला आहे परंतु तो सारा वा-यावर गेलेला आहे. हे असे का होते ?