बुध्दाला प्राप्त झालेली ‘सम्यक समाधी’ किंवा महावीराला प्राप्त झालेली ‘अर्हतावस्था’ किंवा तुकोबा चोखोबाची विठ्ठलावरील श्रध्दा हे सारे त्यांचे व्यक्तिगत मनोव्यापार आहेत. परंतु बौध्द आणि जैन धर्म किंवा भागवत धर्म हा सामुदायिक मनोव्यापार आहे. त्यांना उद्य आणि विकास आहे. त्यांना स्थलकालाच्या मर्यादा आहेत. म्हणून धर्माचा विचार करतांना वैयक्तिक आणि सामाजिक हा भेद सतत मनात ठेवावा लागतो. हा विचार मनात ठेवूनच चिकित्सा करावी लागते. ज्यांनी धर्माची खरी चिकित्सा केली त्यांनी हा भेद ध्यानी घेवूनच केली. ज्यांना प्रचाराची आणि धर्म श्रेष्ठत्वाची धुळवड खेळायची असते त्यांना या भेदाचे काहीही घेणे देणे नसते. बट्रॉंन्ड रसेल यांच्या धर्म चिकित्सेला महत्व प्राप्त झाले ते यामुळेच आणि आपल्या मराठी भाषेच्या मर्यादेत बोलायचे ठरले तर दि. के. बेडेकर, लक्ष्मणशास्त्री जोशी आणि गं. बा. सरदार यांचे या विषयावरील लिखाण खोल विचार करायला लावते तेही यामुळेच. म्हणून आपल्यासमोर ज्या धर्मासंबंधी मी बोलत आहे तो सामाजीक आहे. ज्या धर्माने समाजधारणा होते त्या धर्मासंबंधीच आपण बोलू शकतो. हे सारे विवेचन आपल्यासमोर करण्याचे कारण धर्माच्या समर्थकांचे म्हणणे नेमके काय आहे तेही आपल्याला समजावे. ते समजावून न घेता त्याची टिंगल टवाळी करण्याची प्रवृत्ती सा-याच धर्मवेड्यांच्यामध्ये वाढते आहे. एकाने दुस-याची टवाळी करण्यात काहीच अर्थ नाही. स्वत: काचेच्या घरात राहणा-यांची दुस-यावर दगड फेकू नयेत. सिध्दार्थं गौतम राजपुत्र होता. त्याला स्वत:च्या आणि समाजाच्या मुक्तीसाठी गृहत्यागाची प्रेरणा कोठून मिळाली ? या प्रश्नाचे आपण कोणतेही ऐतिहासिक अनैतिहासिक, खरे-खोटे उत्तर दिले तरी अकटा सिध्दार्थच घराबाहेर का पडला आणि तोच एकटा बुध्द का झाला ? हा प्रश्न निरूत्तरीतच राहील. तुकाराम तर दारिद्र्यातच जीवन जगणारा संत होता. मग
ज्याचे अंत:करण शुध्द | त्यास करणे नलगे बोध ||
हा अंत:करणाच्या शुध्दीचा विचार तुकारामालाच का अनुभवता यावा आणि त्याच्या समकालीनांनी गुरूत्वाचा बाजार मांडून आपले जातीय अहंकार का कुरवाळावेत ? मला वाटते धर्माचा वैयक्तिक पातळीवर विचार केला तरच या दृष्टीने आपल्या हाती काही लागेल.
या दृष्टीने विचार करतांना मला असे वाटते की संन्यास किंवा या व्यवस्थेपासून अलिप्त होण्याचा प्रयत्न हा त्या त्या काळातल्या व्यवस्थेविरूध्दचे व्यक्तिगत पातळीवरील बंड होते. ज्या काळात ही व्यवस्था संघटितपणे बदलता येणे शक्य असते हा विचार उगम पावलेला नव्हता आणि त्या दृष्टीने व्यक्तीचे सामर्थ्य तर मर्यादित होते. अशा वेळी संन्यासाशिवाय पर्याय नव्हता. या समाजव्यापारपासून अलिप्त राहण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. या सर्वांची कारणे तत्कालीन समाज व्यवस्थेत आपण शोधूही शकू परंतु हा एकट्याने केलेला प्रवास आपल्याला शब्दबध्द करता येईल की नाही याबद्दल शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. या व्यक्तिगत अनुभूतीली ‘धर्म’ का म्हणायचे मात्र समजत नाही. तिला धर्माऐवजी अन्य काहीतरी नाव दिले तर बराच स्पष्टपणे विचार करता येईल. परंतु धर्मसंस्थेचे प्रचारक आणि विरोधक या दोघांनाही ते आवडणारे नाही. धर्मसंस्थेच्या प्रचारकांना व्यक्तिगत धर्म आणि सामुहिक धर्म किंवा संस्थात्मक धर्म यांची सरमिसळ करून तो सामान्य माणसांच्या माथी मारावयाचा असतो. संस्थात्मक धर्माची सारी वैगुण्ये व्यक्तिगत उदाहरणे देवून त्यांना झाकायची असतात तर धर्मसंस्थेच्या विरोधकांना संस्थात्मक धर्माचा विकास स्पष्ट करतांना त्यांच्याकडून जे अत्याचार झालेले आहेत, जी अमानवी वागणूक सामान्य माणसांना मिळालेली आहे तिच्या सहाय्याने व्यक्तिगत धर्माचे ढोंग जनतेसमोर ठेवून समाज जीवनातून त्याचे उच्चाटन करावयाचे आहे या ठिकाणी एका गोष्टीचे भान सतत ठेवावे लागते आणि ते हे की, व्यक्ती कितीही मोठी असो, ती कितीही शूर-वीर अथवा कर्तबगार असो, ती जीवन सर्वांगानी भोगणारी अथवा त्यापासून अलिप्त असणारी असो, ती अनुभूती घेतलेली अथवा अनुभूतीशून्य असो. अशी कोणतीही एकटी व्यक्ती इतिहासात इतर व्यक्तींच्या सहाय्याशिवाय काहीच करू शकत नाही.