इतर व्यक्तींचे सहकार्य असल्याशिवाय व्यक्तीला आपले कार्य करताच येणे शक्य नाही. आपण ऐतिहासिक पुरूषासंबंधी जेव्हा विचार करतो; मगते बुध्द, महावीर, पैगंबर असोत की नेपोलियन, शिवाजी, लेनिन असोत; येशू, तुकाराम, कबीर असोत की राम, गांधी, आंबेडकर असोत; या सर्वांनी इतरांच्या सहाय्याने जे कार्य केले तेच आपल्या समोर असते. कोणत्याही महापुरूषाचा एक सुटी, स्वतंत्र, समाजनिरपेक्ष व्यक्ती म्हणून आपल्याला विचार करता येणार नाही. त्यांचे नाव इतक्या कालखंडानंतरही आपण घेतो आणि पुढील पिढ्याही घेतील कारण ते समाजाचा एक अविभिन्न भाग म्हणून जीवन जगले, समाजात राहिले. आपआपल्या विचाराप्रमाणे त्यांनी समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यांच्या समकालीन जनतेने वंद्य मानले. जनता त्यांच्या बरोबर गेली म्हणून तर ते आपल्याला ज्ञात आहेत. ज्ञान प्राप्तिनंतर बुध्द मौनात गेले असते, येशू जर परमेश्वराच्या साम्राज्यात एकटाच रममाण झाला असता, गांधीजी आत्मशुध्दीसाठी हिमालयात गेले असते तर त्यांची नावे आपणास ज्ञात नसती. परंतु जग बदलविण्यासाठी सिध्दार्थ बुध्द झाल्यानंतरही बोलला, येशूने सर्वसामान्यासाठी परमेश्वराच्या साम्राज्याचा दरवाजा खुला करण्याचा प्रयत्न केला आणि गांधीजींनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले म्हणून त्यांची नावे आपणास आठवतात. जे फक्त स्वत:साठी स्वत:च्या मुक्तीसाठी जगले, तपश्चर्या केली अशा असंख्य अनामिकांची नावेही आपणास ठाऊक नाहीत. ती ठाऊक असण्याचे काही कारणही नाही. ज्यांची मुक्ती स्वत:पुरतीच मर्यादित होती त्या व्यक्तीची आणि तिच्या मुक्तीची चर्चा करण्यात आपल्याला स्वारस्य नाही. जे इतरांशी असे काहीच करीत नसतात त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता नसते. परंतु ज्यांना समाजासाठी काही करावयाचे असते त्यांच्या कर्तृत्वातील चुका आणि शहाणपण पुढील पिढ्यांना सतत दिसते. कारण त्या व्यक्तीच्या चुका किंवा शहाणपणही नसते ते ततकालीन समाज परिस्थितीच्या मर्यादांनी घडविलेले असते. म्हणूनच आपण व्यक्तिगत धर्माची चिकित्सा करू शकत नाही. केली तरी ती सर्वमान्य होईल याची खात्री नाही, परंतु आपण समाजासाठी स्थापन झालेल्या संघटीत धर्मांची, संस्थात्मक धर्मांची चिकित्सा करू शकतो. कारण त्यांना त्या त्या समाज परिस्थितीत उगम आणि विकास असतो. त्याच बरोबर अंतही असतो. आज आपल्या समोर जे धर्म आहेत ते सारे संस्थात्मक, इन्स्टिट्यूशनल, किंवा संघटित ऑर्गनाइज्ड धर्म आहेत. आपल्याला माहित नसलेले अनेक धर्म कालौघात नष्ट झालेले आहेत. त्यांची नावेही आपल्याला माहित नाहीत. काहींचे तर फक्त ऐतिहासिक अवशेष शिल्लक आहेत. म्हणूनच धर्माचा विचार करताना त्याच्या व्यक्तिगत आणि सामाजिक रूपाचे भान ठेवावे लागते.