व्याख्यानमाला-१९८७-१

व्याख्यान पहिलेः दिनांक १२ मार्च १९८७

व्याख्यान दुसरेः दिनांक १३ मार्च १९८७

विषयः “धर्म आणि इतिहास लेखन”

व्याख्याते : मा. प्रा. डॉ. रावसाहेब कसबे

भारतीय समाजमन सध्या त्याच्या इतिहासात कधीही नव्हे एवढे भयग्रस्त बनले आहे. त्याची कारणे विविध आहेत. समाजाची ही भयग्रस्तता फॅसिझमला आमंत्रण देणारी असते तर लोकशाहीवादी आणि समाजवादी शक्तींना एक आव्हान म्हणून स्वीकारावी लागते. जगातील सर्वच देशातील फॅसिस्ट शक्तीनी आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी धर्म आणि इतिहासाचा आधार घेतलेला आहे. आजच्या वास्तवाची कठोर चिकित्सा करण्याऐवजी जनतेत धार्मीक अहंकार वाढीस लावणे आणि इतिहासाचा अपलाप करून त्याचे कल्पनारम्य भव्य दिव्य स्वरूप मांडून जनतेला भूतकालाभिमुख करणे हे फॅसिस्ट शक्तींचे पहिले उद्दीष्ट असते. कारण त्यांना सामान्य जनतेला वास्तवाचा विसर पाडावयाचा असतो. ज्यांना ‘माणूस ’ केंद्रीभूत मानून समाज आणि राष्ट्र उभारणीचा विचार करावयाचा असतो त्यांना म्हणूनच जनतेला आपल्या वास्तव परिस्थितीची जाणिव करून द्यावी लागते. ही जाणिव देतांना समाजाचा विकासक्रम आणि या विकासक्रमात निर्माण झालेल्या संस्थांचे स्वरूपही स्पष्ट करावे लागते.

‘धर्म आणि इतिहास लेखन’ या विषयावरील दोन व्याख्यानात हा प्रयत्न केलेला आहे. धर्मसंस्थेचा उगम आणि विकास, तिची विविध रूपे, तिचे सामर्थ्य आणि तिच्या मर्यादा यांचा तर यात आहेच परंतु इतिहास लेखन कसे जाते, त्याचे वेगवेगळे दृष्टी-कोण कोणते आहेत, भारतीय इतिहास लेखनाचा विकास कसा झाला याही प्रश्नांची चर्चा आहे. हा विषय इतका अवाढव्य आहे की ही व्याख्याने म्हणजे एका अर्थाने प्रस्तुत व्याख्यात्याच्या ‘ धर्म आणि इतिहास लेखन ’ या आगामी ग्रंथाची नांदी ठरावी अशीच आहेत.