व्याख्यानमाला-१९७४-१

भारतीय सामाजिक नि राजकीय क्षेत्रात ते "एक विचार" म्हणून गौरवले जातात. पण ही त्यांना लाभलेली ईश्वरदत्त गोष्ट नाही, त्यांचा हा होणारा गौरव त्यांनी सतत व्यासंगाने, चिकित्सक वृत्तीने नि अभ्यासाने आत्मसात केलेली "साधना" आहे. भावी काळाचा अचूक वेध घेणारी त्यांची प्रज्ञा. त्यांच्या एकाग्र चिंतनाची परिणती आहे. बालवयातही सवंग लोकप्रियतेचा मोह त्यांना झाला नाही. सत्यशोधक सामाजिक चळवळीच्या पेक्षा काँग्रेसच्या व्यापक ध्येयधोरणाचा परिचय करुन घेण्यात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते; भावनेपेक्षा विचाराला शरण जाणे ही त्यांची वृत्ती त्यांच्या राजकारण पटुत्वाची यशोध्वजा ठरली !

'राजकारण' असो,  समाजकारण असो, अर्थकारण असो कोणत्याही गंभीर समस्येचा विचार एकाग्रतेने करावा. आपल्या सहकारी मित्राबरोबर साधक-बाधक चर्चा करावी आणि भावनावश न होता जो निर्णय तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ आहे तो शिरोधार्य मानून कोणत्याही परिणामाची मुलाहिजा न ठेवता त्याचा पाठपुरावा करावा हा यशवंतराव चव्हाणांचा स्वभावविशेष आहे !

क्वचित स्वत:च्या मनाला किंवा सहका-याच्या मनाला क्लेशकारक निर्णयही एकदा तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ नि अंतिम श्रेयस्कर आहे अशी खात्री झाली की तो प्रथम उच्चारण्याचे मनोधैर्य यशवंतरावच दाखवू शकतात ! या विज्ञानयुगातील गणक यंत्रातून बाहेर पडणारे बिनचूक उत्तराइतके अचूक निर्णायक उत्तर स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी त्यांच्या प्रज्ञेचा चमत्कार वाटतो. राजकारणातील अत्यंत नाजूक नि अत्यंत कठीण प्रसंगी अनेकवेळा याचा पडताळा आला आहे.

परिस्थितीचे आव्हान स्विकारण्याची त्यांची तयारी स्वत:च्या व्यासंगावरील नि अभ्यासू धारणेवरील जबरदस्त विश्वासच ! मुंबई राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा नि भारताच्या राजकारणातील त्यांच्या धाडशी भूमिकांची ओळख सर्वांनाच जवळून झालेली आहे. राजकीय वा सामाजिक चळवळीची परिणिती कोठे थांबेल याचे अचूक निदान यशवंतरावजी करु शकतात; अशावेळी त्यांची शोधक दृष्टी आपल्या निदानाचे समर्थन करताना बोधक ठरते.

पंडितांच्या सभेत तर्कशुद्ध नि समर्पक दाखल्यांनी बिनतोड युक्तिवाद करणारी त्यांची भाषाशैली; राजकीय किंवा सामाजिक व्यासपिठावर खास प्रासादिक नि प्रादेशिक लेणे घेऊन, जनसामान्याच्या मनाचा कब्जा करते !

काँग्रेसचा एक सैनिक म्हणून घेण्यात यशवंतराव स्वत:ला धन्य समजत आलेले आहेत. पण ते सैनिक आहेत त्याही पेक्षा ते कुशल संघटक आहेत. सतत कार्यकर्त्यांचा संच उभा करुन त्यांना ध्येयनिष्ठेने आणि कार्य प्रेरणेने गतिमान करण्यात त्यांना लाभणारे यश इतरांनी हेवा करावा असे आहे !

यशवंतराव चव्हाण यांचा जीवनलेख चढता वाढता आहे; पण तो त्यांनी अनुभवलेल्या सामाजिक, राजकीय क्रिया- प्रतिक्रियांचा परिपाक आहे.

या व्याख्यानमालेतील व्याख्यानांतून यशवंतरावांच्या जीवन-चरित्राची चर्चा होत रहावी हा प्रधान हेतू नाही. तर आज ज्या भारतीय समाजाच्या नि राष्ट्रीय जीवनाच्या समस्या आव्हानाचे स्वरुप घेऊन आपल्यापुढे उभ्या ठाकल्या आहेत त्या सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा अभ्यास पूर्ण ऊहापोह अधिकारी व्यक्तींच्या नियोजित व्याख्यानांतून व्हावा, हाच प्रधान हेतू या व्याख्यानमालेचा आहे.