व्याख्यानमाला-१९७४-२६

सबंध अविकसित देशांच्यामध्ये जे तणाव आहेत ते केवळ अधिकारांच्याबाबतीत नाहीत. भाषा, भूषा, भोजन आणि भवन म्हणजे आपल्या जीवनाला व्यापणा-या सर्व महत्त्वाच्या बाबतींत हे तणाव वाढले आहेत. एकीकडे सामंती भाषा, सामंती भूषा, सामंती भोजन आणि सामंती भवन यांचा ज्याला लाभ झालेला आहे असा एक छोटा गट आहे आणि दुसरीकडे लोकभाषा, लोकभूषा, लोकभोजन आणि लोकभवन. प्रश्न फक्त वर्गसंघर्षाचा नाही. तो तर आहेच. पण त्यालाही ग्रासणारी जी सामाजिक, सांस्कृतिक बाजू आहे, जातिसंस्थेने हजारो वर्षे जी विषमता निर्माण केली आहे त्याचा हा प्रताप आहे. अविकसित भारतीय समाज जात व दारिद्रयाच्या जात्यातून हजारो वर्षे भरडला जात आहे. समाजवादाचे कोणतेही स्वरुप याची दखल घेऊन उपाययोजना करणार नसेल तर फक्त शब्द-जंजाल निर्माण होईल व मूळ बैठक कायम राहील. अविकसित देशामध्ये हाही मूलबूत झगडा आहे. इथे केवळ वर्गसंवर्ष अपूर्ण आहे. वर्गसंघर्षा बरोबर भारतीय समाजामध्ये एकप्रकारचा जबरदस्त वर्णसंघर्ष आहे. वर्गसंघर्ष आणि वर्णसंघर्ष एकजुटीने उभे केल्याशिवाय समाजवादी क्रांतीचे इंधनच निर्माण होणार नाही. प्रचलित व्यवस्था, नीतिमूल्ये, परिवर्तनाच्या संकल्पना, या सर्वांवर परंपरागत उच्चवर्ग व धनिकशाही यांची घट्ट पकड आहे. ही पकड कायम रहावी म्हणून भ्रष्टाचाराचे हत्यारही हा वर्ग वापरीत आहे. या परंपरागत व्यवहारांचेवर निर्भय प्रहार करण्याचा पुरुषार्थ सामान्य माणसांत निर्माण झाला. त्यासाठी निर्भयपणे उभे रहाण्याचा त्याचा आत्मविश्वास वाढला तरच तो इतिहासाचा निर्माता बनू शकेल. भारतीय समाजात हजारो वर्ष जनसामान्य इतिहासाचे फक्त प्रेक्षक म्हणून वावरला आहे. त्याला या इतिहासाचा निर्माता करण्यानेच व्यक्ती व समूहाचा कायापालट करण्याचे कार्य सुरु होईल. हे प्रयत्नसाध्य आहे याची प्रचीती गांधी-युगात याच सातारा जिल्ह्याने दिली आहे. समाजवादाचा संघर्ष अशाप्रकारे सर्वंकष व सर्वव्यापी करणे, परिवर्तनासाठी जनसामर्थ्यांची तरफ वापरणे, हीच अविकसित समाजातील समाजवादाची अचूक दिशा ठरण्याची शक्यता आहे.