विरंगुळा - १०

यशवंतरावांना काँग्रेस तत्त्वभ्रष्ट झाली हे उमजत होते. परंतु पत्रात त्यांनी लिहिले आहे 'काँग्रेस मी माझे जीवन मानतो.' काँग्रेसचा अध:पात होत आहे याची जाणीव असली तरी काँग्रेस शिवाय अन्य कोणताही पक्ष वा आघाडी देशहित साधू शकणार नाही, असे त्यांना वाटत होते का यासंबंधी या पुस्तकात कसलीही नोंद नाही. यशवंतरावांचे आत्मचरित्र लिहून पूर्ण झाले असते तर त्यामध्ये यासंबंधीची त्यांची भूमिका त्यांनी मांडलीच असती असे मला वाटते. ४ मे १९७५ ला वेणूताईंना लिहिलेले पत्र हे यशवंतरावांच्या मनातील तडफड व्यक्त करणारे आहे. ते लिहितात - ''श्रीमतीजी अजून महत्त्वाच्या कामात सल्ला-मसलत घेतात पण सत्तेच्या वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याचा समजेल असा प्रयत्न करतात असा अनुभव आहे. मग मन धुमसतच राहते. असे अपमानित राहण्याने ज्यांचा मी प्रतिनिधी आहे असे मानतो त्यांचाही अपमान तर होत नाही ना अशी बोचणी असते. मी माझी समजूत घालतो की असा वैयक्तिक भावनांचा विचार करून निर्णय घ्यावयाचे नसतात. राष्ट्रीय कार्य करीत असताना स्वत:ला विसरले पाहिजे. भविष्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. रागाने मोडता येते, जोडता येत नाही. तडजोडीने वागले पाहिजे असा विचार करून मग काम चालू राहते. पण खऱ्या अर्थाने काम चालू आहे का? की एका व्यक्तीचा अहंकार सुखविण्यासाठी हे सर्व चालू आहे?''

१९६९ सालापासून १९७७ पर्यंत इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाण यांनी गृहखाते, अर्थखाते आणि परराष्ट्र खाते अशा महत्त्वाच्या विभागाचे मंत्री म्हणून काम केले. त्यांनी या काळात केलेल्या कामगिरीबद्दल रामभाऊ जोशी यांनी विस्ताराने लिहिले आहे.

अर्थमंत्री असताना यशवंतरावांनी केलेल्या काही नोंदी विशेषत: अमेरिकेशी केलेल्या पी एल ४८० या ऐतिहासिक कराराबद्दलची नोंद महत्त्वाची आहे. परंतु या काळातील नोंदीच्या संबंधी मला फारसे लिहावेसे वाटत नाही. याचे कारण यशवंतरावांच्या पत्रातील 'खऱ्या अर्थाने काम चालू आहे का?' हे वाक्य आहे. आणीबाणी उठवून निवडणुका घेण्याचा निर्णयही इंदिरा गांधीनी यशवंतरावांना ते परदेशात दौऱ्यावर, बुखारेस्टमध्ये असताना कळविला. हा निर्णय घेण्यापूर्वीही त्यांनी यशवंतरावांशी सल्लामसलत केली नव्हती. यामुळेच या पुस्तकातील १९६९ नंतरच्या नोंदींच्या बद्दल फार काही लिहावे असे मला वाटत नाही.

यशवंतराव चव्हाण हे तळागाळातून वर आलेले कार्यकर्ते. त्यामुळे जनसामान्यांच्या आकांक्षा अचूक समजत असत. १९५७ ते १९६२ या काळात महाराष्ट्रात सहकार, शिक्षण आणि अन्य क्षेत्रात जी प्रगती केली ती लक्षात घेतल्यावर १९६२ ते १९६७ या काळात यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती करण्याकरिता त्यांनी शर्थीने प्रयत्न केले असते. आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यांना प्रतिसादही दिला असता. दिल्लीच्या राजकारणाची चाल तिरपी असते. यशवंतरावांना संरक्षण मंत्री करण्याचा निर्णय पं. नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांनी विचारविनियम करून घेतला. या निर्णयामुळे टी. टी. कृष्णम्माचारींचा जळफळाट झाला. त्याचप्रमाणे पं. नेहरूंना संरक्षण विषयक बाबतीत सहाय्य करणारे ओरिसाचे बिजू पटनाईक हेही नाराज झाले. त्यांनी यशवंतरावांच्या कामात ढवळाढवळ केली तेव्हां यशवंतरावांनी पं. नेहरूंना पत्र लिहिले आणि पं. नेहरूंनी 'संरक्षणमंत्री तुम्हीच आहात' असे नि:संदिग्धपणे सांगितल्यावर यशवंतरावांनी पटनाईकांना बाजूला केले.