विरंगुळा - ७

१ मे १९५३च्या स्टॅलिनच्या निधनानंतरची यशवंतरावांनी केलेली नोंद मला मुळीच रुचली नाही. लिहितात - ''या थोर पुरुषाच्या निधनाची वार्ता ऐकून मला फार वाईट वाटले. कुणीतरी अगदी जवळचे माणूस गेल्यानंतर जशी हुरहूर लागते अशी हुरहूर वाटली. एक अत्यंत शहाणा नेता. या शतकातील एक अत्यंत कर्तृत्ववान ध्येयवादी विचारवंत म्हणून या पोलादी पुरुषाबद्दल आदर होता.''

१७ फेब्रुवारी १९५५ ला एआयसीसी बैठक अमृतसरला भरली होती. त्या दिवशी यशवंतरावांनी विस्तृत नोंद लिहिली आहे. ती महाराष्ट्राच्या संदर्भात फार महत्त्वाची आहे. तिचा मुख्य भाग पुढीलप्रमाणे आहे -
''राज्यपुनर्रचनेच्या प्रश्नामुळे वातावरणात अधिक गंभीरता भासली. महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे आणि मुंबईतील दंगलीमुळे कडक टीका करणारे येथे अधिक भेटतात. हे वातावरण पाहिले म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सुलभतेने सुटण्याची शक्यता कमी आहे हे दु:खाने कबूल करावे लागते. आमच्या प्रांता संबंधीचे हे गैरसमज सर्व देशात फार खोलवर गेलेत. ते दूर करण्याचे प्रयत्न फार महत्त्वाचे व अगत्याचे आहे.''

त्यांनी पुढे लिहिले आहे - ''दुपारी चहाच्या वेळी पंडितजींना भेटलो. दहा-पंधरा मिनिटे बाजूला अगत्यपूर्वक बोललो. मुंबईच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने ते अतिशय दु:खी दिसले. आम्ही राज्य का नाकारले हे त्यांच्या बुद्धीला अजूनही पटत नाही असेही ते म्हणाले. वादग्रस्त प्रश्न शांततेच्या वातावरणात थोड्या सावकाशीने सोडवावे लागतील. आणि या पद्धतीने मुंबईचाही प्रश्न सुटेल असे ते म्हणाले. मुंबई महाराष्ट्रात जाऊ नये अशी माझी भावना नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व बोलण्यावरून वर्ष दोन वर्षांच्या काळात योग्य संधी आणि वातावरण पाहून ते मुंबईचा निर्णय महाराष्ट्राला अनुकूल देतील असा विश्वास मला वाटू लागला आहे. द्विभाषिक राज्ये व्हावीत ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. परंतु महाराष्ट्र व गुजराथ आजच्या परिस्थितीत एकत्र आणण्याचा प्रयत्न अवघड आहे असेही त्यांना वाटते.

मी त्यांना सर्व पुढारी आणि पक्ष वगळून डायरेक्टली महाराष्ट्रीय जनतेला आवाहन करायची विनंती केली तेव्हां ते गहिवरून म्हणाले, ''हां, जरूर मी तसे करीन. दंगे गुंड करतात. सर्व जनतेला दोष कोण देईल? महाराष्ट्रीय जनता शूर आहे. माझे त्यांच्यावर प्रेम आहे.''

यशवंतरावांच्या नोंदीतील उत्तरार्ध पं. नेहरूंच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारा आहे. या नोंदीतील यशवंतरावांचे मत वाचल्यावर त्यांच्या पुढील धोरणाचा अर्थ समजतो.

महाराष्ट्र आणि गुजराथ असे महाद्विभाषिक निर्माण झाल्यानंतर १९५६ला यशवंतरावांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. १९५५ ते १९६० हा कालखंड चव्हाणांच्या जीवनात अत्यंत कसोटीचा होता. ११ डिसेंबर १९५८ला यशवंतरावांनी दिल्लीतून वेणूताईंना लिहिलेल्या पत्रात त्यांचे मनोगत पुढील शब्दामध्ये व्यक्त केले आहे.

''गेले काही महिने, विशेषत: कांही आठवडे जसे काही एखादे वादळ निर्माण व्हावे असे आयुष्यात निर्माण झाले आहे. १९५२ ते १९५५ च्या कठीण काळांतही तू माझी खरी सोबतीण होतीस म्हणून साथ केलीस. किती तरी कठीण काळात माझ्या सल्लागाराचे आणि जिवाभावाच्या मित्राचे कार्य केलेस. तुझी साथ नसेल तर मी एकटा काही करू शकेन अशी माझी मनस्थिती नाही. येत्या वर्ष सहा महिन्याचा काळ राजकीय परिस्थितीमुळे अत्यंत कसोटीचा ठरणार आहे. सर्व आपत्ती आहे. यातून बचावले पाहिजे. त्यात मी यशस्वी होईन असे वाटते.''