विरंगुळा - ४

महाराष्ट्रात १९५३ हे दुष्काळी वर्ष होते. अन्नधान्याची टंचाई होती. रेशनिंगच्या त्या काळात पुरेशा धान्य पुरवठ्याअभावी लोकांचे हाल होत होते. निरनिराळ्या भागातील कार्यकर्ते तारा पाठवून, फोन करून धान्य पुरवठ्याची मागणी करीत होते. यशवंतराव हे पुरवठा मंत्री असल्यामुळे त्यांना या बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते. या परिस्थितीत केंद्र सरकारकडून धान्यसाठा उपलब्ध करून घेण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. ही दुष्काळी परिस्थिती हाताळताना यशवंतराव चव्हाण यांनी ज्या नोंदी केल्या आहेत त्यामधून दुष्काळग्रस्त जनतेबद्दलची त्यांची उत्कट सहानुभूती व्यक्त होते आणि त्याचबरोबर आपल्याला प्रशासक यशवंतरावांची ओळख होते. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुष्काळी गावे पहावयास ते गेले होते. तेथील अनुभवासंबंधी त्यांनी लिहिले आहे. ''घोगरगावी दुष्काळी परिस्थितीतही आमच्या गावी दूध-कॉफी घेऊन जा' असा आग्रह पाहून मन गहिवरले. ग्रामीण जीवनातील परंपरागत संस्कृती म्हणतात ती ही. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि शासनाच्या अडचणी यामुळे अनेकदा तणाव निर्माण होत. नगर जिल्हा काँग्रेसचे नेते स्वामी सहजानंद आणि नगरचे कलेक्टर राणा यांच्यात समझोता करण्याचे कामही यशवंतरावांना करावे लागले.

१९५३ साली रफि अहमद किडवई हे केंद्रामध्ये अन्नमंत्री होते. यशवंतरावांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून महाराष्ट्राला स्वस्त दरात गहू मिळावा या मागणीस मान्यता मिळविली. अन्नमंत्र्यांच्या परिषदेबाबत पुढील टिपणी यशवंतरावांनी लिहिली आहे. 'अन्नधान्याची आयात कमी करण्यावर पंतप्रधान पंडित नेहरूंनी भर दिला आहे. तत्त्व सर्वांनाच मान्य होते. मी तसे उठून सांगितलेही. परंतु कोणत्या भूमिकेवर अन्नधान्याची रचना केली तर हे करणे व्यवहार्य ठरेल हा खरा निर्णयाचा प्रश्न आहे....नियंत्रणे म्हणजे तुटीच्या प्रांतांना शापच आहे असे वाटू लागते. मुंबई राज्यातील ज्वारी-बाजरीच्या आंशिक निर्मितीयंत्रणाचा विचार या पार्श्वभूमीवर केला पाहिजे, हे मी आग्रहपूर्वक व निर्भयपणे प्रतिपादिले. माझे म्हणणे अर्थमंत्री देशमुख यांना पटले नाही, रुचलेलेही दिसले नाही परंतु सुरुवातीस ते ज्या आक्रमक वृत्तीने चर्चा करीत होते ती वृत्ती बरीच वरमली असे दिसले.'

अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख पुण्यात आले असताना त्यांनी, मुंबई सरकारने दुष्काळी कामास परिणामकारक मदत करण्यासाठी दारूबंदीसंबंधी फेरविचार करावा आणि शिक्षणावरील खर्च थोडा कमी करावा अशा सूचना केल्या तेव्हां यशवंतराव फार नाराज झाले. या संदर्भात त्यांनी लिहिले आहे - ''देशमुख पहिल्या प्रतीचे ग्रंथपंडित आहेत यात शंका नाही. परंतु राज्य कारभारासाठी वापरावयाची तत्त्वे सामान्य माणसांच्या जीवनानुभूतीवर तपासून घ्यायची असतात. बिचारे देशमुख तरी काय करणार? त्यांच्या जीवनाच्याच काही मर्यादा आहेत. नोकरशाहीच्या जुन्या चाकोरीतून पस्तीस वर्षे त्यांनी राबविली आहेत. त्यामुळे तिला थोडा बोथटपणा आला आहे. लोकजीवनाच्या संग्रामातून आलेल्या दुर्गाबाईंशी त्यांची आता भेट झाली होती. आशा करूया की त्या त्यांना नवी दृष्टी देतील.''

यशवंतरावांचे माणसांचे निरीक्षण किती सूक्ष्म आणि भेदक होते हे त्यांनी महाराष्ट्राचे त्यावेळचे राज्यपाल (एका वेळचे आयसीएस अधिकारी) गिरिजाशंकर वाजपेयी यांच्याबद्दल जे लिहून ठेवले आहे त्यावरून कळून येते. यशवंतराव लिहितात - ''दुष्काळ मदत कमिटीच्या मध्यवर्ती कमिटीच्या स्थापनेची बैठक झाली. श्री. वाजपेयी (राज्यपाल) यांनी मोठया कुशलतेने काम चालविले. त्यांचे भाषाप्रभुत्व, कठीण, गैरसोयीचे प्रश्न टाळताना कुशलतेने वापरलेली विनोदीबुद्धि आणि उभ्या रहाणाऱ्या सर्व तपशीलवार प्रश्नांचा अगोदर विचार करून, मनाशी निर्णय करून ठेवण्याची हुशारी पाहून 'बुढ्ढा मोठा अर्क आहे' असा विचार येऊन गेला.''