विरंगुळा - १२२

प्रवासात असतानाचं हे लेखन असल्यानं त्यात प्रवासवर्णनं, निसर्गदर्शन, वेगवेगळया ठिकाणी भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव विशेष, चालिरीती, विविध प्रदेशातील लोकरीती हे सर्व आहे. त्याच बरोबर राजकीय चर्चा आहेत, ज्येष्ठ नेत्यांशी झालेला संवाद आहे, त्यावरील प्रतिक्रिया असं सविस्तर काही आहे. हे लिहिताना त्यांच्यासमोर समाज आहे. पत्नीला म्हणून पत्र लिहिलं असलं तरी समाजातील एक घटक म्हणून पत्नी त्यांच्या समोर असल्याचं जाणवतं. यशवंतरावांनी समाजासाठी मागे ठेवलेलं हे विचारधन, समाजाच्या स्वाधीन करण्यानंच त्यातील खाजगीपण संपुष्टात येणार आहे.

आयुष्याची ८४ वर्षे मागे टाकीत असताना त्यांचं हे विचारधन मी आणखी किती काळ खाजगीत, गुप्त ठेवणार आहे कोण जाणे? या विचारानं मनात फेर धरला. हे सर्व अप्रकाशित, प्रकाशात यावं यासाठी सरस्वतीपूजनचा श्रीगणेशा केला.

यशवंतरावांनी जे लिहून ठेवलं ते सारं सुगम आहे. सुगम-संगीत थाटाचं आहे. मधून मधून ख्यालगायकीचाही थाट आढळेल. पण त्यात दुर्बोधता नाही. शब्दात आणि वाक्यात मनांतलं प्रतिबिंबाचं दर्शन घडतं रहातं.

'सागरतळी' आणि 'यमुनातीरी' हे दोन चरित्रखंड लिहून प्रकाशित करण्याचा यशवंतरावांचा संकल्प सिध्दीस गेला असता, तर या हस्तलिखित साहित्याचा समावेश त्यात झाला असता. १९८४ च्या ऑक्टोबरमध्ये बोलणं झालं त्यावेळी तसं निश्चित झालं होतं. १९८५ च्या जानेवारीनंतर दिल्लीला तीन-चार महिने मुक्कामाला तयारीनं या म्हणजे सर्व हातावेगळं करू असं सांगून ते दिल्लीला गेले.

परंतु आले देवाजीच्या मना.... पूर्वीच्या प्रवासात करून ठेवलेल्या नोंदी, पत्रं मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला ते निघून गेले. त्यांच्याबरोबर बुद्धिनिष्ठा, ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा, लोकनिष्ठा, महाराष्ट्र आणि राष्ट्रनिष्ठा सारेच प्रवासी बनले! नव्या पिढयांना इतिहास उमजावा, काही बोध घडावा यासाठी लिहून ठेवलेलं हे सिद्धहस्त फक्त मागे राहिलं. विचारधन, शब्दसंपत्ती एवढंच काय ते यशवंतरावांचं ऐश्वर्य!!

या सर्व धनावर समजाचाच अधिकार आहे. समाजात वाढलेल्या या नेत्यानं समाजासाठीच हे मागं ठेवलं. माझ्या स्वाधीन करून त्यातलं खाजगीपण संपवलं ते यासाठीच.

संगिताच्या मैफलीची सांगता ''भैरवी''नं करण्याची परंपरा रूढ आहे. यशवंतरावांच्या शब्दसंगिताची सांगता म्हणजेच 'विरंगुळा' भैरवी! बंदिशीचे शब्द आणि रचना सारंच काही यशवंतरावांचं!