विरंगुळा - १२०

''मागणी अशी. मी तुम्हाला मनोमन मित्र मानलं आहे. आता मित्र म्हणून तुम्ही माझा स्वीकार करावा आणि मैत्री पूर्णपणानं द्यावी. एवढंच'' मी सांगितलं.

स्तब्धता. यशवंतराव शून्य दृष्टीनं छताकडे बघत राहिले. मी गोंधळलो. पण काही क्षणच. ते कोचावरून उठले. मीही उभा राहिलो. त्यांनी मला मिठीत घेतलं. म्हणाले, ''या जगात खरोखरीचा मित्र लाभल्याचं समाधान तुम्ही मला दिलंत.'' हे म्हणत असताना त्यांच्या डोळयांतील समाधानाचे अश्रू पाहून मी थरारलो! याचा अन्वयार्थ लावणं कठीण ठरलं.

दुसरे दिवशी, त्यांचे विश्वासू स्वीय सहायक श्रीपाद डोंगरे यांनी रात्रीची घटना सविस्तर सांगितली. अन्वयार्थ विचारला. नेहमीच्या लकबीनं ते हसले. म्हणाले, ''तुमची जबाबदारी वाढली आहे. तुम्ही मैत्री दिली आणि मागितली. आलिंगन देताना अश्रू ओघळले. कुटुंबातील एक म्हणून तुमच्या मैत्रीचा स्वीकार त्यांनी केला आहे आणि मैत्री प्रदान केली आहे. ती पेलणं ही आता तुमची जबाबदारी.''

श्रीपाद डोंगरे यांनी जो अन्वयार्थ सांगितला त्यातून आम्हा दोघांमध्ये अंतर नसलेल्या विशुद्ध मैत्रीचा बोध मिळाला. आमच्यातील 'मी', 'तू', अंतरच संपलं होतं. ही मैत्री मला किती पेलता आली हे सांगणे अवघड आहे. यशवंतरावांनी मात्र मित्रत्वाचं नातं पूर्णपणे पेललं. आमच्या दिल्लीतल्या या चर्चेनंतर काही वर्ष उलटल्यावर अभीष्टचिंतनासाठी लिहिलेल्या पत्रात 'अकृत्रिम मैत्री' असा उल्लेख करून एक प्रकारे शिक्कामोर्तबच केलं.

आणखी एका वेगळया समारंभात त्यांनी याची प्रचिती आणून दिली. कराड नगरपालिका, शिक्षण संस्था आणि नागरिक यांनी एकषष्ठीनिमित्त माझं अभिष्टचिंतन करण्याचं योजिलं. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी यशवंतरावांना निमंत्रित केलं. ते आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं भाषण मोठं अर्थपूर्ण झालं. इतकं की श्रोते अचंबित झाले.


रामभाऊ जोशी हे पत्रकार आहेत म्हणून मी येथे आलो नाही. त्यांनी माझे चरित्र लिहिले म्हणूनही आलो नाही. असे प्रारंभी सांगून म्हणाले, ''आमच्या कुटुंबात आम्ही तीन भाऊ. दोघे ज्येष्ठ बंधू निवर्तले आणि मी घरातला लहान, घरातला मोठा बनलो. नंतर असं लक्षात आलं की, बाहेरचं मोठेपण सांभाळता येतं पण घरातल्या लहानाला घरातलं मोठेपण सांभाळता येत नाही. रामभाऊंचं तेच झालं. त्यांचे दोन ज्येष्ठ बंधू गेले आणि घरातले ते लहान घरातले मोठे बनले. पण त्यांचा अनुभव माझ्याहून वेगळा असेल असं नाही. तसं पाहिलं तर रामभाऊंपेक्षा वयानं मी काहीसा मोठा आहे. आपला मोठा भाऊ म्हणून त्यांनी मला पूर्वीच स्वीकारलेलं आहे. माझा लहान भाऊ म्हणून मी त्यांचा स्वीकार केला आहे हे सांगण्यासाठी दिल्लीहून मी आलो आहे.''

असे त्यांचे-माझे ॠणानुबंध. सन १९८३-८४च्या दिल्लीतील त्यांच्याकडील मुक्कामात या ॠणानुबंधावर कळस चढला.