विरंगुळा - ११८

नवी दिल्ली
११ डिसेंबर १९८३

''तुम्ही मागे वळून पाहिलं तर समाधान वाटावं असं तुमचं जीवन आहे. पत्रकाराचं जीवन तसं कटकटीचं - पण तेही तुम्ही रस घेऊन पार पाडलेत. अनेक क्षेत्रात जिवाभावाचे मित्र मिळविलेत. पत्रकारितेच्या क्षेत्राच्या बाहेर संगितादी कलाक्षेत्रात, कार्यरत राहिलात. तुमच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद तुम्ही मनापासूनच चाखला आहे. या जीवनाला यशस्वी जीवन म्हणावयाचे नाही तर कशाला म्हणावयाचे.

गेली बावीस-तेवीस वर्षे जे मित्रप्रेम तुम्ही मला दिलेत ते अतिशय अकृत्रिम असे आहे.

तुमच्या घरी येऊनच अभिष्टचिंतन करायला हवे पण प्रकृती साथ देत नाही. नुकताच तिकडून आलो. पुन्हा येईन तेव्हा तुम्हाला घरी भेटेन. दीर्घायुषी व्हा. सुखी व्हा.
- यशवंतराव
------------------------------------------------------------

या पत्रात त्यांनी आमच्यातील मैत्रीला, जिव्हाळ्याला 'अतिशय अकृत्रिम' असं अधोरेखित केल्यानं वाढदिवसाचा माझा आणि माझ्या कुटुंबियांचा आनंद शतपटीनं वाढला. यशवंतरावांसारख्या सावध नेत्यानं स्वहस्ते लिहिलेलं मैत्रीचं, मित्रप्रेमाचं हे शिफारसपत्र कुठल्याही मानपत्राहून माझ्या दृष्टीनं मोलाचं असं आहे.
 
त्यानंतरचा एप्रिल महिना उजाडला. कसलीही पूर्वसूचना न देता एक दिवस सकाळी ११ वाजता यशवंतराव माझ्या पुण्यातील घरी अचानक आले. अगदी एकटे. अभीष्टचिंतन केलं. शब्द पाळणं म्हणतात ते हे असं!

त्यांनी घरात प्रवेश केला तेव्हा मी विश्रांती घेत होतो. प्रकृती ठीक नव्हती. ते शेजारी येऊन बसले. प्रकृतीची विचारपूस केली. विश्रांती घ्या म्हणाले. खरीखुरी विश्रांती घ्या हे सांगताना म्हणाले, ''घरात आलो तेव्हा वहिनी मनानं हललेल्या मला दिसल्या.'' हातात हात घेऊन या थोर माणसानं मला मोठा दिलासा दिला. तासाभरानं परत जाण्यास निघाले तेव्हा निरोप देण्यासाठी उठून बसू लागलो तेव्हा ''उठून बसण्याचे कष्ट घेऊ नका, पूर्ण विश्रांती घ्या,'' म्हणाले आणि परतले.
राजकीय दृष्टया यशवंतराव निश्चित शक्तिमान होते. पण याहीपेक्षा राजशक्ती आणि देशभक्ती, मानवता यांचं विलक्षण मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संक्रमित झालेलं होतं. मित्रप्रेमाची आगळी-वेगळी झालर या व्यक्तिमत्त्वाला होती. या मैत्रीत निर्व्याजता होती.