'कृष्णाकाठ' हा पहिला आत्मचरित्रपर ग्रंथ सन १९८४ च्या ५ फेब्रुवारीस, रंगपंचमीच्या दिवशी प्रसिद्ध झाला तेव्हा त्याची खूप प्रशंसा झाली. साहित्य सम्राट न. चिं. केळकर परितोषिक या ग्रंथासाठी जाहीर झालं. या पारितोषिकानं जणू काही यशवंतरावांच्या साहित्यगुणावर शिक्कामोर्तबच केलं.
'कृष्णाकाठ' ग्रंथाच्या अखेरच्या प्रकरणांत ग्रंथाचा समारोप करताना, त्यांच्या मनांत विचारांचं जे काहूर उठलं त्याची आणि भवितव्यतेसंबंधीची केलेली नोंद त्यांच्या मनोव्यापारावर नेमका प्रकाश टाकते. नव्या कामाची, पार्लमेंटरीपद स्वीकारण्याची - जबाबदारी सांभाळण्यासाठी पुणे मार्गे डेक्कन-क्वीनने ते मुंबईला जात असतानाच्या दिवसाची ही नोंद आहे. ते लिहितात –
गाडीत निवांत बसल्यानंतर भूतकाळातील सुख-दु:खाची धूसर क्षणचित्रे डोळ्यासमोर येऊ लागली. त्याचप्रमाणे अनोळखी पण रंगतदार भविष्याची बोटेही आपल्याला पाळवताहेत असे वाटले.
माझ्या मनांत येऊन गेले की माझ्या जीवनांत मोठा बदल झाला आहे. कृष्णाकाठी हिंडलो, वाढलो, फिरलो, झगडलो, अनेक नवी कामे केली, मैत्री केली, माणसे जोडली, मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा काळ होता. आता मी कृष्णाकाठ सोडून नव्या क्षितिजाकडे चाललो आहे. आता ती क्षितिजे रंगीबेरंगी दिसत आहेत. परंतु प्रत्यक्षात तेथे पोहोचेपर्यंत ती तशीच राहतील का? कोण जाणे?
अशा विचाराच्या तंद्रीत असताना आमच्या जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे एक पुढारी रावसाहेब मधाळे हे मजजवळ आले आणि म्हणाले, कुठे चाललात?
''अर्थातच मुंबईला, नवे काम अंगावर घ्यायला''- मी सांगितले.
त्यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, ''तुम्ही फार चांगल्या दिवशी हे काम अंगावर घेत आहात.''
''मी काही पंचांग पाहून निघालो नाही, पण आज असा कोणता महत्त्वाचा दिवस आहे.'' _ मी म्हटले.
''आज १४ एप्रिल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज जन्मदिवस आहे.'' - ते म्हणाले.
''फारच चांगला योगायोग आहे.'' - मी म्हटले.
माझ्या ध्यानीमनी नसताना सुद्धा हा दिवस निवडला गेला, ही माझ्या जीवनातील महत्त्वाची घटना आहे, असे मी मानतो.