विरंगुळा - १११

बुखारेस्ट
१८ जानेवारी १९७७

सौ. वेणूबाईस,

सर्व बेत बदलून उद्या सकाळी रोमहून दिल्लीला परतण्यासाठी निघणार आहे. झेकोस्लोव्हाकियाच्या विदेशमंत्र्यांना आपल्या राजदूतामार्फत संदेश पाठवून मी येऊ शकत नसल्याबद्दल माफी मागितली आहे. कृपा ही की, माझा इथला सर्व कार्यक्रम संपला आहे.

फक्त संध्याकाळचे माझे रात्रीचे भोजन 'माकोव्हस्की' (विदेशमंत्री) यांच्यासाठी. हा इथला शेवटचा कार्यक्रम. तो संपला की उद्या परत येण्यास मोकळा.

ही नाट्यमय घटना आज दुपारी अडीचच्या सुमारास झाली. मी ऍम्बॅसडर कौल यांचे घरी दुपारचे जेवणासाठी गेलो होतो. येथील जेवणे खाऊन उबगलो होतो. तेव्हा आपली डाळ-रोटी खावी म्हणून हा बेत आम्ही योजला होता.

एकाएकी टेलिफोन वाजला. राजदूत कौल यांना बेलग्रेडचा फोन आहे असे सांगितले. तो घेण्यासाठी ते गेले. मी तोपर्यंत माझे जेवण संपविले. निवांत हात धूत होतो. राजदूत घाईघाईने माझेकडे आले आणि म्हणाले, ''तो बेलग्रेडचा कौन्सल काही सांगत नाही. तुमचेशीच प्रत्यक्ष बोलायचे म्हणतो. तुमचेसाठी काही मेसेज आहे.''

मी गेलो तेव्हा कौन्सेलने आपले नाव सांगितले आणि पंतप्रधानांचा मेसेज आहे सतरा तारखेचा, तो मी वाचून दाखवतो असे म्हणून हिंदीत असलेला संदेश वाचून दाखविला.

सारांश असा होता की, ''जो महत्त्वाचा निर्णय आपण घेणार होतो तो उद्या घेणार आहे. तुमच्याशी मी तुम्ही जाण्यापूर्वी बोलणार पण तुम्ही व मीही कामाच्या गर्दीत असल्यामुळे राहून गेले. तुम्हास निर्णय रेडिओवर समजू नये, आधी माहीत व्हावा म्हणून कळवीत आहे. शक्य असेल तर (हो सकेतो) कार्यक्रम संपण्यापूर्वी परत या.''

मी दिल्ली सोडण्यापूर्वी वातावरणात निवडणूक खच्चून भरली होती. तेव्हा तो महत्त्वाचा निर्णय कोणता हे अगदी स्पष्ट होते. पार्लमेंट-लोकसभा बरखास्त करून मार्चमध्ये निवडणुका घेणे!

राजदूताला मी विश्वासात घेतले आणि सांगितले की, पहिल्या परतीच्या प्लेनने मी दिल्लीस जाऊ इच्छितो. झेकोस्लोव्हाकियाचा कार्यक्रम रद्द. निर्णय प्रत्यक्ष जाहीर होईतो कारण कुणाला सांगू नका. परंतु जाण्याचा माझा निर्णय पक्का.

तोही योग्य ते समजला आणि योग्य ती कार्यवाही सुरू केली. निर्णय संध्याकाळी ६ वाजता बी.बी.सी. (येथील) वरून येथे सर्वांनाच समजला.