विरंगुळा - १२१

त्याचं असं झालं. वेणूताईंचं चरित्र लिहावयाचं होतं. त्याच्या तपशिलासंबंधात दोन-तीन आठवडे सविस्तर बोलणं झाल्यावर वेणूताईंचा काही पत्रव्यवहार वगैरे साहित्य असल्यास ते वाचण्याची आवश्यकता एकदा रात्री बोलत बसलो असताना मी सांगितली. त्यावर असं काही असण्याची शक्यता नाही कारण बाईंनी कधी कुणाला पत्रं लिहिली नाहीत, मुलाखती दिल्या नाहीत किंवा महिलांच्या कुठल्या सभेला उपस्थित राहून भाषण केलं नाही, कुठल्या महिला मंडळात सहभागी झाल्या नाहीत. आयुष्यभर त्यांनी दर्जेदार संसार केला. यशवंतरावांनी सांगितलं.

दोन-चार दिवसानंतर पुन्हा मी तोच आग्रह धरला. रात्रीचे १० वाजून गेले होते. बेडरूममध्ये बोलत बसलो होतो. तेथे वेणूताईंची दोन लोखंडी कपाटं होती. ती पहा असा आग्रह धरला.
नाखुषीनंच त्यांनी कपाटे उघडली. काही फाईल्स आणि छोटीशी बॅग त्यांनी पाहिली. कोचावर बसले आणि त्यात काय आहे पहाणं सुरू केलं. दहा-पंधरा मिनिटानंतर ते साहित्य त्यांनी मला दिलं. म्हणाले, ''वाचून पहा. हे वेगळं आहे. मी लिहिलेलं आहे. बाईंनी हे सर्व जपून ठेवलंय याची मला कल्पना नव्हती. आज प्रथमच पहातो आहे.''

ते सर्व मी दिल्लीतच वाचलं. दोन दिवसानंतर ते त्यांच्या स्वाधीन केलं. म्हणालो, ''हे तुमचं खाजगी आहे. तुम्ही स्वतंत्रपणे लिहिलेलं काही आहे पण बरचसं पति-पत्नीमधील लिखित संवाद स्वरूपाचं आहे. खाजगीतील खाजगीतच ठेवा.''

''बरोबर आहे तुमचं. खाजगीतलं आहे आणि होतं. ज्या क्षणाला ते मी तुमच्या स्वाधीन केलं त्याच क्षणाला त्यातलं खाजगीपण संपलं. हे असंच, खाजगीत मी ते किती काळ ठेवणार कोण जाणे! तुमच्याकडं ठेवा. याचं काय करायचं ते आपण बोलू.'' _ यशवंतरावांनी भावनापूर्ण शब्दांत सांगितलं.

१९८४ च्या जानेवारीतील रात्रीच्या या बोलण्यानंतर त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये 'कृष्णकाठ'साठी जाहीर झालेलं केळकर पारितोषिक स्वीकारण्यासाठी ते पुणे येथे आले त्यावेळी या साहित्याच्या संदर्भात आमची सविस्तर चर्चा झाली. राजकीय ज्येष्ठ नेत्यानं लिहून ठेवलेलं हे ऐतिहासिक संदर्भ साहित्य आहे वगैरे मी बोलू लागलो तेव्हा हसले आणि म्हणाले, ''ते ठीक आहे. संदर्भ साहित्य म्हणून त्याला कमी-अधिक महत्त्व असेलही. त्याचं काय करायचं तुम्ही ठरवा. हे साहित्य तुम्हाला सोनं वाटत असेल तर दागिना घडवा. तसं नसेल तर राहू द्या तुमच्या लॉकरमध्ये.''

गेली वीस वर्षे ते मी लॉकरमध्ये ठेवलं. अगदी गुप्त. परंतु सोन्याची शोभा लॉकरमध्ये नाही. दागिना घडविण्यात असते. पैलू पाडले तर ते आणखी चकाकते. या विचारानं मला ग्रासलं. 'हे साहित्य खाजगीत मी आणखी किती काळ ठेवणार कोण जाणे!' या यशवंतरावांनी सांगितलं होतं. ते त्यांनी माझ्या स्वाधीन केल्यावर त्यातलं खाजगीपण संपुष्टात आलं असलं तरी ते खाजगीतच राहिलं. पत्नीला लिहिलेली पत्रे खाजगी असतात हे मान्य पण अशी पत्रे ख्याली खुशालीची किंवा कौटुंबिक हितोपदेशाची असतात. यशवंतरावांनी लिहिलेल्या पत्रांचे स्वरूप वेगळं आहे. आशय वेगळा आहे.