विरंगुळा - ९

या नोंदीच्या शेवटी यशवंतरावांनी लिहिले आहे- ''चेअरमन कोसिजिन किती प्रमाणात स्पष्ट भूमिका घेतील याच्यावर या बैठकीचे भविष्य आहे असे माझे मत आहे.'' यशवंतरावांचा हा अंदाज खरा ठरला.

लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनानंतर गुलझारीलाल नंदा हे तात्पुरते पंतप्रधान झाले. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष कामराज आणि अन्य श्रेष्ठींनी इंदिरा गांधी यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी यांच्यावर आपण नियंत्रण करू शकू असे कामराज आणि अन्य श्रेष्ठींना वाटत होते. परंतु इंदिरा गांधी यांनी सुरुवातीपासून काही निर्णय श्रेष्ठींना बाजूला ठेवून घेतले आणि मंत्रिमंडळाच्या खातेपालटात गृहखाते हे यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपविले.

१९६९ साली काँग्रेस दुभंगली. त्या साली बंगलोरला काँग्रेस वर्किंग कमिटीत जे घडले त्यासंबंधी ४ मे १९७५ ला यशवंतरावांनी वेणूताईंना लिहिलेल्या पत्रात पुढील मजकूर आहे - ''१९६९ मध्ये मी इंदिरा गांधींच्या विरुद्ध मत दिले ते त्यांना सत्तेवरून काढण्यासाठी हे निदान माझ्या बाबतीत तरी खरे नाही. मी त्यांचे मत एकसारखे विचारले होते. त्यांचे मत बनत नव्हते. हे करू की ते करू अशी चंचलता होती. शेवटी मी जे करीन ते इतरांनी मानावे अशी त्यांची रीत होती.''

यशवंतरावांनी हे लिहिले असले तरी इंदिरा गांधीना मात्र चव्हाणांनी त्यांच्या विरुद्ध मत दिल्याबद्दल त्यांचा राग आला होता व पुढे काँग्रेस दुभंगल्यावर जरी यशवंतराव हे इंदिरा गांधींच्या बरोबर राहिले तरी यानंतर इंदिरा गांधी यांच्या मनातील यशवंतरावांच्या बद्दलचा राग कमी झाला नाही. त्यांनी यशवंतरावांवर सतत अन्यायच केला, असे पुढील घटनाक्रमावरून स्पष्ट होते. असे असूनही ४ मे १९७५ला वेणूताईंना लिहिलेल्या पत्रामध्ये पुढील शब्दात त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. ''मला हेही कबूल केले पाहिजे की श्रीमतीजी माझ्याशी कधी सूडाने वागल्या नाहीत. Fair वागणे म्हणतात तसे गेली सहा वर्षे त्यांनी माझ्याशी वर्तन केले. पण हे शेवटी सगळे वैयक्तिकच ना? सार्वजनिक जीवनात आणि राजकारणांत जी तत्त्वे मानली त्यांच्या भविष्याचे काय?

इदिरा गांधीनी १९६७ साली गृहमंत्रीपद यशवंतरावांच्याकडे दिले आणि १९६९ साली लहर फिरताच त्यांच्याकडे अर्थखाते सोपविले. १९७४ला त्यांच्याकडे परराष्ट्र खाते दिले. हे बदल करताना त्यांनी यशवंतरावांशी चर्चा केल्याची एकही नोंद नाही.

२६ जून १९७५ला इंदिरा गांधीनी आणीबाणी पुकारली. त्यांनी हा आदेश काढण्यापूर्वी मंत्रिमंडळातील यशवंतरावांसारख्या सहकाऱ्यांना विचारले नव्हते. जयप्रकाश नारायण आणि अन्य विरोधी पक्ष नेत्यांची धरपकड झाल्यानंतरच यशवंतराव, जगजीवनराम आदींना देशात आणीबाणी पुकारल्याचे समजले.

४ मे १९७५ ला वेणूताईंना लिहिलेल्या पत्रामध्ये यशवंतरावांनी लिहिले आहे- ''काँग्रेस पक्ष मी माझे सर्व जीवन मानले. ती काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसमध्ये लोकशाही राहिली आहे का? सत्ता मिळवून ती ताब्यात ठेवण्याचे यंत्र म्हणून आज काँग्रेस वापरली जात आहे.''