विरंगुळा - ११

शास्त्रीजींच्या निधनानंतर सुरुवातीस पंतप्रधानपदासाठी यशवंतरावांच्या नावाचीही शक्यता होती परंतु इंदिराबाईंनी 'उत्तरप्रदेशच्या खासदारांची इच्छा मी पंतप्रधान व्हावे अशी आहे,' असे सांगून चाणाक्षपणाने त्यांना स्पर्धेतून दूर सारले. १९६९ नंतर इंदिरा गांधी यशवंतरावांशी कशा वागल्या हे वरती लिहिले आहेच. असे कुटिल राजकारण दिल्लीत सतत चालत असतानाही यशवंतरावांनी त्यांच्यावर जी जी जबाबदारी पडली ती कार्यक्षमतेने पार पाडली. तसेच भारताची जगात प्रतिष्ठा वाढावी म्हणून अर्थमंत्री आणि पराराष्ट्रमंत्री असतानाही त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पं. नेहरूंनी भारताच्या विकासाची जी दिशा निश्चित केली होती त्या दिशेनेच भारताची वाटचाल चालू रहावी अशीच धोरणे अर्थमंत्री असताना चव्हाणांनी घेतली आणि कार्यान्वित केली. पं. नेहरूंनी बडया राष्ट्रांच्या संघर्षापासून भारताला अलिप्त ठेवून जागतिक शांततेचा पुरस्कार करण्याचे जे धोरण आखून त्याची प्रभावीपणे कार्यवाही केली तेच सूत्र यशवंतराव चव्हाण यांनी परराष्ट्रमंत्री असताना पुढे चालविले. त्यामुळे काँग्रेसमधील त्यांच्या विरोधकांनाही आक्षेप घेता आले नाहीत.

धकाधकीच्या राजकारणात सतत गुरफटलेले असताना वेणूताईंशी पत्रातून संवाद करणे हा यशवंतरावांच्या जिवाचा 'विरंगुळा' होता. त्याचप्रमाणे कृतिशील जीवन जगतानाच तटस्थेने वर्तमान कालीन घटनांवर टीकाटिपणी करणे यातही त्यांना समाधान वाटे. अशा तऱ्हेच्या नोंदींना ऐतिहासिक संदर्भ म्हणून फार महत्त्व आहे. या दृष्टीने या पुस्तकाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे असे मला वाटते.

यशवंतराव चव्हाण यांनी देशभर आणि जगातही अनेक ठिकाणी प्रवास केला. वेणूताईंची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या यशवंतरावांच्या समवेत कधी प्रवास करू शकल्या नाहीत. त्यामुळे यशवंतरावांनी प्रवास करताना जी अनेक पत्रे लिहिली आहेत त्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे. या पत्रामधून यशवंतरावांचे निसर्गप्रेम, त्यांची रसिकता तसेच त्यांचे पुस्तकावरील प्रेम आणि सतत चाललेले वाचन आदींचा प्रत्यय येतो. अर्थात त्यांनी वेळोवेळी केलेली राजकीय टीका टिपणी अधिक महत्त्वाची आहे. परंतु मला सर्वात महत्त्वाचे वाटते ते त्यांनी वेणूताईंना लिहिलेल्या पत्रातील केलेले आत्मपरीक्षण. यशवंतरावांनी अत्यंत प्रांजळपणे स्वत:च्या राजकीय जीवनाबद्दल जे लिहिले आहे ते पुढीलप्रमाणे आहे. ''वस्तुस्थिती आहे की सातत्याने गेली तीस वर्षे मी सत्तास्थानावर आहे. पण योजून एखादी सत्तेची जागा हस्तगत करावयाची असे मी कधीच केले नाही. जाणीवपूर्वक सत्तेचा उपयोग समाजाच्या परिवर्तनासाठी करावयाचा माझा प्रयत्न राहिला. नव्या विचारांना सामोरा गेलो. मुख्यत: दलितांबद्दल कणव ठेवून सामाजिक न्याय प्रस्थापित केला पाहिजे ही माझी धारणा प्रथमपासूनची होती. माझ्या हातातील सत्तेचा आग्रहाने आणि योजनापूर्वक दृष्टीने वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टांसाठी उपयोग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.''

मला असे वाटते की यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबद्दल जे मुख्यत: निवेदन या पत्रात केलेले आहे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही.

'विरंगुळा' हे पुस्तक भारतीय राजकारणाच्या अभ्यासकांना खासच उद्बोधक वाटेल आणि माझ्याप्रमाणेच याबद्दल ते रामभाऊ जोशी यांना मन:पूर्वक धन्यवाद देतील.

फेब्रुवारी, २००५-
ग. प्र. प्रधान