प्राध्यापकांनी, मित्रांनी, विद्यार्थ्यांनी 'विरंगुळा' ग्रंथ संग्रही ठेवावा, वाचावा यासाठी प्रयत्नशील रहाण्याचं त्यांनी दिलेलं आश्वासन अधिक महत्त्वाचं मानलं पाहिजे.
पुण्यातील यशवंतप्रेमी उद्योजक श्री. बी. जी उर्फ बाबूराव शिर्के यांनी पहिल्या भेटीतच सहकार्यासाठी हात पुढे केला. श्री. शिर्के हे सिपोरेक्स, शिर्के कॉन्सार्टियम चे संस्थापक प्रमुख. सिपोरेक्सतर्फे त्यांनी दुबई येथे सतत दहा वर्षं बांधकाम केले. टोलेजंग इमारती, आलिशान बंगले असं या बांधकामाचं स्वरुप होतं. शेख रसिद हे दुबईचे प्रमुख सत्ताधारी होते. त्यांनी बांधकामाचा मक्ता शिर्के यांना दिला होता.
यशवंतराव विदेशमंत्री होते त्यावेळी दुबई भेटीला गेले असताना शेख रसिद यांनी बांधकामं दाखविली. बांधकामाच्या ठिकाणी श्री. बी. जी. शिर्के होते. शेख रसिद यांनी यशवंतरावांशी त्यांची ओळख करून दिली. वस्तुत: हे दोघे परिचित होतेच. येथे काही समस्या नाही ना? असे यशवंतरावांनी शिर्के यांच्याकडे विचारणा केली तेव्हा इथला राजदूत आमच्या कामगारांना व्हिसा वेळेवर उपलब्ध करून देत नसल्यानं कामात खंड पडतो असे शिर्के यांनी सांगितलं. त्यावर यशवंतरावांनी राजदूताला लगेच पाचारण करून चर्चा केली आणि व्हिसा मिळण्याचा मार्ग सुलभ करून दिला. इतकंच नव्हे तर दिल्लीस परतल्यावर कामगारांना देण्यात येणाऱ्या परवानगीच्या नियमात दुरुस्ती करून व्हिसा मिळण्याच्या अडचणीतून कामगारांना मुक्त केलं. काँन्ट्रॅक्टरकडे व्हिसाची जबाबदारी वळविली.
सिपोरेक्सचं बांधकाम वस्तूचं उत्पादन मुंढवा येथील कारखान्यात होत असतं. सिपोरेक्सच्या रौप्यमहोत्सव प्रसंगी यशवंतरावांनी कारखान्यास भेट दिली आणि या उद्योजकाचा गौरव केला. यशवंतरावांशी असा ॠणानुबंध असलेल्या श्री. बी. जी. शिर्के यांनी व्यक्तीश: सक्रिय सहकार्य करून यशवंतरावांसंबंधी आदर व्यक्त करणं स्पृहणीय होय.
खानदेशातून जळगावचे डॉ. धनराज पाटील, विलासरावभाऊ पाटील, एरंडोल येथील श्री. दादासाहेब दिगंबर शंकर पाटील यांनी आणि खानदेश विभागातील शहरात असलेल्या शिक्षणसंस्था प्रमुख आणि प्राचार्यांनी यशवंतराव लिखित साहित्याचा ग्रंथ प्रकाशित होत असल्याचं समजलं तेव्हा या उपक्रमाचं स्वागत केलं. सहकार्याची तयारी दर्शविली हे विशेष होय.
डॉ. धनराज पाटील यांनी जळगाव येथे 'यशवंतराव चव्हाण स्मृतिगंध समिती' अशी विश्वस्त संस्था स्थापन केलेली असून संस्थेतर्फे यशवंतरावांसंबंधी व्याख्यानं, चर्चा, प्रसिद्धी पत्रकं असं जनजागृतीचं कार्य डॉ. पाटील करीत आहेत. श्री. दादासाहेब पाटील हे यशवंत विचारनिष्ठ आहेत. यशवंतरावांनी मोफत शिक्षणाची दारे खुली करून महाराष्ट्राचा ग्रामीण भाग शिक्षणमय केला. तीच प्रेरणा घेऊन श्री. दादासाहेब पाटील यांनी एरंडोल या तालुक्याच्या गावात विस्तीर्ण भूखंडात तीन महाविद्यालयं, माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालय सुरू केलेलं असून ''यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ'' असं संस्थेचं नामकरण केलं आहे. तालुक्यात या संस्थेच्या शाखा आहेत. हजारो विद्यार्थ्यांना अद्ययावत असं ज्ञानदान ही संस्था करीत आहे. संस्थेचा ग्रंथालय विभाग सुसज्ज आहे.