विरंगुळा - २

महत्त्वाच्या राजकीय घटनांबाबत वृत्तपत्रात माहिती येते, परंतु या घटनांमधील राजकीय प्रवाह त्याचप्रमाणे वेगवेगळया व्यक्तींचा, पक्षांचा आणि संघटनांचा त्या घटनांमधील सहभाग या सर्वांचे आकलन झाल्याशिवाय राजकीय इतिहासाचे सम्यक् दर्शन होत नाही. १९४६ ते १९८४ या कालखंडातील भारताच्या राजकीय जीवनातील सर्व तपशील आणि बारकावे समजण्यासाठी यशवंतरावांच्या आत्मकथनाचा फार उपयोग होईल याची जाणीव असल्यामुळे मी 'कृष्णाकाठ' नंतरच्या यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पित आत्मकथेची उत्सुकतेने वाट पहात होतो. परंतु हे लेखन करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

यासंबंधी मी माझे पत्रकार मित्र रामभाऊ जोशी यांच्याशी एकदा बोललो, तेव्हा त्यांनी मला पुढील हकीगत सांगितली. रामभाऊ म्हणाले, 'तुम्हाला माहिती आहे की यशवंतरावांशी माझं नातं जिव्हाळ्याचे मित्र असं होतं. त्यांच्या आणि माझ्या ॠणानुबंधामुळे ते माझ्याजवळ त्यांचं मनोगत मनमोकळेपणाने सांगत. १९८४ मध्ये वेणूताई गेल्यानंतर मी त्यांच्याकडे दिल्लीला गेलो होतो. मला वेणूताईंचं चरित्र लिहायचं होतं. त्याच्यासाठी त्यांचा काही पत्रव्यवहार वगैरे आहे का म्हणून मी यशवंतरावांना विचारले. त्यावर ते म्हणाले, 'तसं काही असण्याची शक्यता नाही. कारण बाईंनी आयुष्यभर फक्त दर्जेदार संसार केला.' दोन-चार दिवसांनी मी पुन्हा आग्रह धरल्यावर यशवंतरावांनी वेणूताईंची कपाटे उघडली. त्यात काही फाईल्स आणि एक छोटी बॅग होती. त्यामध्ये वेणूताईंनी त्यांना यशवंतरावांनी लिहिलेली पत्रे ठेवली होती.'

रामभाऊंना जुन्या आठवणीमुळे भरून आले. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, 'मी यशवंतरावांना म्हणालो, 'हे तुमचं खाजगी आहे. ते खाजगीतच ठेवा.' परंतु यशवंतराव म्हणाले, 'हे तुमच्याकडेच असू द्या.' त्यानंतर ऑक्टोबरमध्ये 'कृष्णाकाठ'ला मिळालेलं न. चिं. केळकर पारितोषिक स्वीकारण्यासाठी यशवंतराव पुण्याला आले होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो, 'आपण लिहिलेली पत्रं मी वाचली. ते ऐतिहासिक संदर्भ साहित्य आहे.' यावर यशवंतराव म्हणाले, 'याचं काय करायचं ते तुम्ही करा.' रामभाऊ पुढं म्हणाले, 'गेली वीस वर्षे मी हे लॉकरमध्ये ठेवलं होतं. ही पत्रे यशवंतरावांनी पत्नीला लिहिली असल्यामुळे खाजगी असली तरी ती ख्याली खुशालीची किंवा केवळ कौटुंबिक नाहीत. यशवंतरावांच्या पत्रांचं स्वरूप वेगळं आहे. मी ती आता संपादित करून प्रसिद्ध करणार आहे. या पत्रांमध्ये आणि अन्य राजकीय नोंदींमध्ये यशवंतरावांनी समाजासाठी ठेवलेलं विचारधन आहे. ते आता मी समाजाच्या स्वाधीन करणार आहे.'

रामभाऊ जोशी यांनी हा निर्णय घेतल्यामुळेच यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या पत्रांचा हा संग्रह आणि केलेल्या अनेक राजकीय नोंदी 'विरंगुळा'मध्ये आता प्रसिद्ध होत आहेत. या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना माझे मन संकोचून गेले आहे. रामभाऊ जोशी यांचे मन मोडवेना म्हणूनच केवळ प्रास्ताविक लिहीत आहे.

१९४६ पासून १९५२ पर्यंतच्या कालखंडातील केवळ तीन पत्रे या संग्रहामध्ये आहेत. रामभाऊ जोशी यांनी विस्तृत प्रास्ताविक लिहून या कालखंडातील यशवंतरावांच्या संसारातील आर्थिक ओढाताण, वेणूताईंना झालेला क्षयाचा विकार, यशवंतरावांच्यापासून आजारपणातही दूर रहावे लागत असल्यामुळे वेणूताईंच्या मनावर येणारा ताण, त्यातून होणारी चिडचिड, यशवंतरावांच्या मनाची वेदना हे सर्व स्पष्टपणे सांगितले आहे. यशवंतरावांची ही मानसिक स्थिती त्यांनी २७ जुलै १९४९ला लिहिलेल्या पत्रातूनही व्यक्त झालेली आहे.