विरंगुळा - ८१

डी. एम्. के. शी संबंध काहीसे दूरचे झाले आहेत. कामराज परत येऊ इच्छितात. येवोत बिचारे! व्यक्तिश: मला समाधानच आहे. परंतु दक्षिणेचे राजकारण त्यांच्या येण्याने सुधारणार नाही. डी. एम्. के. संबंध दुरावण्यामुळे ते प्रश्न अधिक कडवट होतील ही भीती आहे. परंतु दुर्दैवाने या प्रश्नाची चर्चाच होत नाही. टीटीटी वगैरे जहालांचे व डी. एम्. के. चे बाबतीत सूडाच्या भावनेने पहात आहेत. मूल्यापेक्षा निवडणुका हा सर्वप्रथम महत्त्वाचा प्रश्न दिल्लीत मानला जातो आणि त्या केंद्राभोवती सर्व काही हालत-चालत असते. ओरिसाचा यक्ष प्रश्न - निवडणुकीत बहुमत कोणाचे होईल सांगणे अवघड झाले तरी ते किती वेळपर्यंत टिकणार हे त्यापेक्षाही अवघड. चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आदिवासी व इतर उपेक्षित वर्गाचे आमदार आहेत ते पक्षांतर भराभर करतात. परिणामी अस्थिरता. या वर्गाच्या हातात राज्याचे नेतृत्व दिल्याशिवाय स्थैर्य (स्टॅबिलिटी) येणार नाही, हे माझे निदान आहे. भारतीय लोकशाही राजकारणाचा सामाजिक आशय डॉ. लोहियांना खरा समजला होता. परंतु दुर्दैवाने त्यांचे नेहरू विद्वेषाचे वेड होते. त्यामुळे ते एकांगी झाले आणि त्यांचे विचार दुर्लक्षिले गेले.

या वर्षी वॉशिंग्टनला दोन वेळा जावे लागले. मार्च अखेर आणि जुलै अखेर. आर्थिक प्रश्नावरील सी-२० च्या बैठका म्हटल्या तर महत्त्वाच्या झाल्या. म्हटल्यावर अशासाठी की निर्णयात्मक परिस्थिती अजून नजरेतही येत नाही. नैरोबीची मीटिंग धरून यावर्षी तीन बैठका झाल्या. पुढारलेल्या राष्ट्रांचे आर्थिक हितसंबंध असे गुंतागुंतीचे झाले आहेत की वरून एकमेकांशी गोड बोलतात परंतु तडजोडीसाठी आवश्यक असे खरे बोलत नाहीत. पुन्हा १९७४ला जानेवारीत रोमला सी-२० ची बैठक भरणार परंतु आता ऑइल क्रायसेसचे प्रश्न, मोनेटरी रिफॉर्मचा प्रश्न दुय्यम बनविला आहे. नैरोबीचे बैठकीला - नागिणीमुळे प्रकृती बरी नसतानाही गेलो. आफ्रिकेतील बैठकीला गैरहजर राहाणे बरोबर नाही या भावनेने गेलो ते धाडस करून गेलो. श्री. उपासनींनी माझ्या प्रकृतीची फार काळजी घेतली. हाय कमिशनर श्री. नायर, फार सज्जन गृहस्थ आहे. माझ्या प्रकृतीकडे आपुलकीने पाहिले. प्रकृती बरी नसताना या गोष्टीचे महत्त्व वाटते. या गोष्टी लक्षातही राहातात. आफ्रिकेमध्ये या संबंधांना काही अर्थ आहे असा विश्वास वाटत नाही. त्यांना संशय होता. त्यांनी तपासणी केली. आम्ही ती करू दिली. हे एका अर्थाने चांगलेच झाले. परंतु परतीचा प्रवास मानसिक यातनेने झाला. माझ्या देशाला त्यांनी अवमानित केले याबद्दल परत आल्यावर केनियाच्या सरकारची माफी घेऊन त्यांचा हायकमिशनर भेटला वगैरे ठीक परंतु मनाला लागणारी घटना घडली ती घडलीच.

वॉशिंग्टनच्या दोन्ही भेटीच्या वेळी डॉ. किसिंजरशी भेट झाली. त्यांच्या पुढाकारामुळे भेटले. एक वेळ ऍम्बॅसडर एल. के. झा व दुसऱ्या वेळी टी. एन्. कौल बरोबर होते. माझ्या दोन्ही भेटींचा वृत्तांत मी तातडीने एम्बसीमार्फत पंतप्रधानांना कळविला. दोन्ही वेळ अर्धा अर्धा तास होतो. बांगला देशाचे वातावरण पूर्णत: बदलण्याची इच्छा व्यक्त झाली. अमेरिका व भारत यांच्यामधे मूलभूत हितावरोध नाही. बरोबरीच्या नात्याने आर्थिक आणि राजकीय संबंधाची पुनर्रचना केली पाहिजे असे त्यांना वाटते. व्यक्ती म्हणून मोठा आकर्षक माणूस आहे. प्रश्नाच्या मुळाशी जाऊन थोडक्यात आणि स्वच्छपणे मुद्दे मांडण्याचे कौशल्य आहे. बोलण्या-वागण्यात आत्मविश्वास ओसंडून जाताना दिसतो. हसत-खेळत वागण्याची बोलण्याची पद्धती. त्यामुळे मैत्रीची भावना तत्परतेने निर्माण करू शकतो. पी. एल ४८०च्या चर्चेची बीजे या बैठकीत रोवली. भारत-अमेरिका संबंधाच्या क्षेत्रांत पी. एल ४८०चा करार ही वर्षातील महत्त्वाची घटना आहे. गेल्या दोन वर्षात भारत-अमेरिकेचे आर्थिक संबंध किती अडचणीतून गेलेत! एक वेळ इन्डायरेक्टली आम्ही काही देत नाही असे घोषित करावे असा सल्ला देण्यापर्यंत मी गेलो होतो परंतु परिस्थिती काहीशी बदलली आणि त्यातून हा करार तयार झाला. माझे वित्तमंत्रालयातील प्रमुख अधिकारी, विशेषत: एम्. एस्. कौलने पुष्कळ श्रम घेतले. यावर्षी वाढत्या किमतीनी अक्षरश: हैराण केले. या वर्षी पार्लमेंटमधे तहकुबीची सूचना, अविश्वासाचा ठराव यांच्या निमित्ताने हा प्रश्न चार वेळा चर्चिला गेला. चारही वेळ मला तोंड द्यावे लागले.