विरंगुळा - ८४

अन्नधान्याची आयात अमेरिकेच्या सहकार्याने सुरू करण्याचे प्रयत्न झाले, परंतु अमेरिकेशी आर्थिक संबंध तणावाचे बनलेले होते. हा तणाव दोन वर्षे टिकून राहिला. अमेरिकेने लादलेल्या जाचक अटी पेलणे भारताला शक्य नव्हते. त्यातून एक वेळ अशी आली की, भारत कोणतीही अट मान्य करून शकत नाही असे अप्रत्यक्ष रीत्या अमेरिकेला कळवावे या मनस्थितीपर्यंत जाण्याची अर्थमंत्री यशवंतराव यांनी मनाची तयारी करून ठेवली.

अमेरिकेला असे काही सुनावण्याच्या मनस्थितीत असतानाच तेथील दौऱ्यात एक दिवस किसिंजर यांची भेट होण्याचा योग जमून आला. किसिंजर एक उमदे व्यक्तिमत्व. स्वच्छ विचाराचे, स्पष्टवक्ते. अमेरिका आणि भारत यांच्यात आर्थिक आणि राजकीय संबंधाची पुनर्रचना करायला पाहिजे ही त्यांची भूमिका यशवंतराव जाणून होते. या दोन नेत्यांच्या भेटीत जी विचारांची देवाण-घेवाण झाली त्यातून पी. एल्. ४८० कराराची बीजे रोवली गेली. पुढील टप्प्यात या बीजाला अंमलबजावणीचे अंकुर फुटले. किसिंजर या विचारावर सिंचन करीत राहिले असावेत. अखेरीस या दोन देशात सर्व सव्यापसव्य होऊन करार अस्तित्वात आल्यावर यशवंतरावांच्या अर्थमंत्रिपदाच्या कारकीर्दीतील पी. एल्. ४८० या ऐतिहासिक कराराची कार्यवाही भारताच्या धोरणानुसार गतिप्राप्त झाली. पी. एल्. ४८० करारामुळे देशातील उपासमारीवर मात मात्र करता आली.

राष्ट्राची मते बदलणे किंवा राष्ट्राच्या मतावर प्रभाव पाडणे ही गोष्ट पुष्कळ वेळा अशक्य असते. परंतु राष्ट्राच्या प्रतिनिधीभूत व्यक्तिच्या मतांमध्ये बदल करणे ही पुष्कळवेळा शक्य कोटीतील गोष्ट असते. हे लक्षात घेऊन यशवंतराव प्रयत्नशील असत. किसिंजर यशवंतराव भेट आणि चर्चा अमेरिकेच्या मतामध्ये बदल घडवून आणण्यास उपयुक्त ठरली.

विदेशात असताना परस्पर संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने राजकारणी, सत्ताधारी, पत्रकार, कलाकार, कारखानदार, विदेशातील भारतीय अशांना मेजवान्या द्याव्या लागतात. समारंभांना उपस्थित रहावे लागते. यशवंतरावांनी निरनिराळ्या राष्ट्रांच्या दौऱ्यात हे सर्व केले. खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केली. या संदर्भात ते लिहितात-

''आम्ही पिणारे नाही हे पाहून व्यवस्था ठेवण्यासाठी हजर असलेल्या लोकांची फारच निराशा होत असे.''

यशवंतरावांची अर्थमंत्रीपदाची कारकीर्द मोठी 'अर्थ'पूर्ण ठरली. धनराशी सावरल्या. त्रुटीच्या अंदाजपत्रकावर जालीम तोडगा काढला. निरनिराळ्या राज्यात होणारी आर्थिक उधळपट्टी काबूत आणून आर्थिक शिस्त निर्माण केली. स्वातंत्र्योत्तर काळात जे अर्थमंत्री झाले त्यातील बहुतेकांना या ना त्या कारणासाठी पायउतार व्हावे लागले. अर्थमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे यशवंतराव हे पहिलेच अर्थमंत्री म्हटले पाहिजेत. त्यांच्यानंतरही अर्थमंत्र्यांनी पायउतार होण्याची प्रथा सुरूच राहिलेली आढळते.