यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch 2

२. कृष्णाकाठचा सुपुत्र (शंतनुराव किर्लोस्कर)

यशवंतराव चव्हाणांचा आमच्या किर्लोस्करवाडी गावाशी फार जुना संबंध होता.  यशवंतराव कराडचे.  किर्लोस्करवाडीपासून कराड तीस-बत्तीस मैलांवर.  यशवंतरावांच्या ओळखीचे कितीतरी लोक आमच्या किर्लोस्करवाडीत राहात.  माझा व यशवंतरावांचा व्यावसायिक संबंध मात्र सुरुवातीला फारसा नव्हता.  ते लहान वयातच राजकारणात शिरले तर मी कारखानदारीत.

मी स्वतः राजकारणात शिरलो नसलो तरी आमचे किर्लोस्कर कुटुंब आणि किर्लोस्करवाडी मात्र राजकारणात भाग घेई.  माझी आई कै. ममा राधाबाई किर्लोस्कर, माझी पत्‍नी सौ. यमुनाताई ह्यांनी पुढाकार घेऊन सूत कताईचे वर्ग चालविले होते.  किर्लोस्करवाडीत प्रभात फेर्‍या निघत त्यांत दोघीही पुढाकार घेत.  माझे वडील कै. लक्ष्मणराव( पपा )किर्लोस्कर हे तर निष्ठने खादी वापरीत.  त्या वेळचे राजकीय पुढारी किर्लोस्करवाडीला भेट देत, प्रचार करीत, व्याख्याने देत.  महात्मा गांधींनी पुकारलेल्या प्रत्येक लढ्याला किर्लोस्करवाडीने प्रत्यक्ष कार्य करून सक्रिय पाठिंबा दिला होता.  पपांनी किर्लोस्करवाडीला अस्पृश्यता पाळलीच नाही व त्यासाठी शेजारच्या कुंडल गावच्या ब्राह्मणांनी टाकलेला बहिष्कारही सहन केला.  राजकीय दृष्टीने किर्लोस्करवाडी जागृत होती.  माझे वडील पण स्वातंत्र्य संग्रामाला पैशाची आणि इतरही खूप मदत करीत.

१९४२ सालच्या स्वातंत्र्य युद्धात किर्लोस्करवाडीला विशेष महत्त्व आले.  ह्या काळात यशवंतरावांचा आणि किर्लोस्करवाडीचा संबंध वाढला.  ह्या स्वातंत्र्य युद्धात किर्लोस्करवाडीचे विशेष स्थान होते.  सांगली, सातारा, कराड आणि भोवतालची गावे ही हिरीरीने १९४२ च्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेत होती.  त्या वेळी ही गावे ब्रिटिशांच्या हद्दीत होती तर किर्लोस्करवाडी औंध संस्थानात होती.  वाडीची माणसे प्रत्यक्ष चळवळीतही होती.  इस्लामपूरच्या तहशील कचेरीवर राष्ट्रीय ध्वज फडकावण्यासाठी गेलेल्या मोर्चात किर्लोस्करवाडीचे एक तरुण एंजिनिअर उमाशंकर पंड्या हे डी.एस.पी. येट्स यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाले.  त्या मोर्चात किर्लोस्करवाडीच्या गोविंदराव खोत व इतर बर्‍याच राजकीय कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.  पुढे ब्रिटिश विरुद्ध 'चले जाव' चळवळीतले बरेच पुढारी व कार्यकर्ते 'भूमिगत' झाले, आणि वाडीला विशेष महत्त्व आले.  किर्लोस्करवाडी औंध संस्थानात असल्याने राजकीय पुढार्‍यांना पकडण्यासाठी ब्रिटिश शासनाखाली असलेल्या पोलिसांना औंध संस्थानच्या शासनाच्या सहकार्याशिवाय वाडीला येता येत नसे.  त्यात वेळ लागे व शिवाय वाडीला येऊन राहणार्‍या राजकीय पुढार्‍यांना आधी सूचना मिळे व ते निसटून जात.  यशवंतरावही त्या वेळी 'भूमिगत' होते.  त्यांच्या विशेष ओळखीचा एक तरुण किर्लोस्करवाडीला राहात असे.  पुष्कळदा यशवंतराव त्याच्या घरी येऊन राहात.  वाडीच्या लोकांना हे माहीत होते.  पण कोणीही बोलत नसे किंवा पोलिसांना पत्ता लागू देत नसत.

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही वर्षे राजकीय पुढारी आणि कारखानदार आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी एकत्र काम करीत होते.  नंतर समाजवादाचे वारे जोरात आले आणि दोन वर्ग दूर जाऊ लागले.  १९६० ते ७० ह्या दशकात ह्या दोन्ही वर्गातले मतभेद वाढत गेले.  यशवंतराव महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात गेले.  केंद्रीय सरकारची धोरणे ते आपल्या प्रभावी वक्तृत्वाने मांडू लागले व त्या धोरणांचा आग्रह करू लागले.  मी भारतीय उद्योग-व्यावसायिकांच्या मध्यवती्र संघटनेचा (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्रीज) प्रथम उपाध्यक्ष व नंतर अध्यक्ष झालो (१९६४-६६).  त्या वेळी आर्थिक धोरणात मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंधांत अंतर पडले असे नाही.  यशवंतराव भारत सरकारची धोरणे मांडीत हे खरं असलं तरी त्या धोरणावर मी करीत असलेली टीका आमच्या व्यक्तिगत संबंधाच्या आड आली नाही.  जेव्हा आमच्या भेटी होत, तेव्हा थट्टाविनोद भरपूर होत.  त्याला यशवंतरावांचा स्वभावही कारणीभूत होता.  विरोधक असले तरी त्यांचं म्हणणंही शांतपणे ऐकून, नीट समजून घ्यायचा त्यांचा स्वभाव होता.  काही वेळा त्यांना एखादं म्हणणं पटे, मग सरकारी धोरणाला धक्का न लावता काय करता येईल याचा विचार करीत.  एकदा छोटी विमाने बनवायचा कारखाना काढण्याची योजना त्यांच्या विचारार्थ पाठविली.  त्यांनी ती समजावून घेतली.  वास्तविक ही विमाने ही लहान प्रवासी विमाने होती पण आधुनिक होती.  शेतीच्या कामासाठी, प्रवासासाठी व अशा इतर अनेक कारणांसाठी त्यांचा उपयोग उद्योगप्रधान देशात होत असे.  ही लष्करी उपयोगासाठी नव्हती आणि आपल्या देशात त्यांची गरज होती.  हे सर्व यशवंतरावांना पटलं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी खटपटही केली.  मग निरोप पाठविला, ''कुठलीही विमाने बनवायची असली तरी ती सरकारी मालकीच्या कारखान्यातच बनवायची हे सरकारी धोरण आहे व त्यात बदल होणार नाही.  आमच्या ब्रह्मवाक्यापुढे तुमच्या विचारांचा उपयोग नाही.''