यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch 1

विभाग १. -  चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व

यशवंतराव चव्हाण :  संपन्न व्यक्तिमत्त्वाचा आदर्श (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी)

सातारा जिल्ह्यातील मागासलेल्या ग्रामीण भागात म्हणजे देवराष्ट्रे या लहानशा गावात १२ मार्च १९१३ ला अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात श्री. यशवंतरावांचा जन्म झाला.  स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भारतात ग्रामीण जीवनात जन्मणार्‍या आणि जगणार्‍या व्यक्तींचे जीवन सामान्यपणे खुरटलेलेच राहात असे.  त्यातील माणसांची मने जन्मभर मुकुलित स्थितीत राहावयाची, कारण त्या ग्रामीण जगतात शतकानुशतके महत्त्वाचा असा बदल घडतच नव्हता.  व्यक्तीच्या विकासाची कसलीही साधने उपलब्ध नव्हती.  विशेषतः गरिबांची कुटुंबे पिढ्यानपिढ्या परिस्थितीच्या कचाट्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्‍न क्वचितच करीत.  बंधनातून मुक्त होण्याकरता आवश्यक असा संस्कृतीचा प्रकाशच त्या कोंडलेल्या जीवनात शिरू शकत नव्हता.  यशवंतरावांचे वडील बळवंतराव यांनी हिंमत धरली आणि नशिबाची परीक्षा पाहण्याकरिता त्या खेड्याची हद्द कायमची ओलांडली.  नागरी जीवनाचा आश्रय केला.  कराड या तालुक्याच्या शहरात राहावयास गेले.  यशवंतरावांच्या वडिलांचे प्राथमिक शिक्षणही जेमतेमच झाले होते.  त्यामुळे चवथ्या श्रेणीचीच नोकरी शोधावी लागली.

कराड येथे ठाण मांडले.  बेलिफाची नोकरी पत्करली.  दोन मुले व दोन मुली होत्या.  यशवंतरावांची आई विठाबाई.  यशवंतरावांचे वडील बळवंतराव ऐन उमेदीत १९१८ साली इहलोक सोडून गेले.  यशवंतरावांचे वडील बंधू गणपतराव यांच्या खांद्यावर प्रपंचाची धुरा आली.  यशवंतरावांच्या मातुश्री विठाबाई या तर अगदी निरक्षर होत्या.  मुलामुलींचे शिक्षण व्हावयास पाहिजे असा निश्चय त्यांनी मनाशी पक्का बांधला.  यशवंतरावांचे बंधू गणपतराव यांना इंग्रजी शिक्षणाचे माहात्म्य उमगले होते.  गणपतरावांनी यशवंतरावांना कराड येथे टिळक हायस्कूलमध्ये घातले.

टिळक हायस्कूलमधील त्या वेळचे शिक्षक आदर्शवादी होते.  ''सर्व हि तपसा साध्यम'' हे व्यासवचन या शाळेचे ध्येयवाक्य होते.  शिक्षक राष्ट्रवादी विचाराचे होते.  केवळ वर्गाचाच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पुरा करावा आणि उत्तीर्ण व्हावे अशा मर्यादित उद्देशाने आपला शिक्षकाचा व्यवसाय चालवीत नव्हते.  टिळकयुग सुरू झाले.  हे युग राष्ट्रवादाच्या मंत्राने भारलेले होते आणि या युगाच्या प्रेरणांनी अस्वस्थ झालेले ध्येयवादी शिक्षक हे टिळक हायस्कूल चालवत होते.  यशवंतरावांचे बंधू गणपतराव सत्यसमाजी, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये मोठ्या हिरीरीने भाग घेत होते.  सत्यशोधक समाजाच्या दणदणीत प्रचाराने सामाजिक परिवर्तनाचा आदेश महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दुमदुमत होता.  या प्रचाराला प्रखर स्वरूप पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये प्राप्‍त झाले होते.  १९१९-१९३० या कालखंडात याच वेळी राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाने महाराष्ट्रासह अखिल भारत व्यापूर टाकलेले होते.  भगतसिंगासारखे सशस्त्र क्रांतीचे वीर फासावर लटकले होते.  त्या सुमारास क्रांतिवीर जतींद्र दास यांनी कारागृहात आमरण अन्नत्याग करून देशातील तरुणांची आणि सगळ्या नागरिकांची मने सचिंत आणि शोकाकुल करून टाकली.  याचा परिणाम यशवंतरावांच्या संवेदनशील मनावर अत्यंत खोलवर झाला.  जतींद्रांच्या उपवासाच्या दिवसांत यशवंतराव वेदनांनी विव्हल झाले आणि जतींद्रांच्या निधनाने ते शोकाकुल होऊन अश्रू टाळत बसले.  त्यांच्या अशिक्षित मातुश्रीला दिसले की आपला मुलगा घरातलंच कोणी जिव्हाळ्याचं दगावलं तसा रडतो आहे.  तिला यशवंतरावांच्या रडण्याचा उलगडा झाला नाही.  या परिस्थितीचा स्वाभाविक परिणाम म्हणजे यशवंतराव सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीत सामील न होता राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात अगदी कुमारवयात १४-१५ व्या वर्षीच ओढले गेले.  महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासातील स्थित्यंतराच्या कालखंडाचे एक उत्कृष्ट प्रतीक म्हणून हे यशवंतरावांचे उदाहरण लक्षात घेता येते.

१९३० आणि १९३२ सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत यशवंतरावांनी उडी घेतली.  १८ महिन्यांचा कारावास भोगला.  घरची गरिबी, शिक्षण अपुरे अशा स्थितीत सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ते सामील झाले.  या चळवळीच्या प्रारंभीच्या आठवड्यांमध्ये म्हणजे म. गांधींच्या दांडी मोर्चाच्या आठवड्यांमध्ये आम्ही स्वतः कराड येथे आणि कराडच्या भोवतालच्या खेड्यांमध्ये कायदेभंगाचा प्रचार करीत होतो.  या प्रचारात १५-१६ वर्षांचे कुमार वयातले यशवंतराव आमच्या सहकारी मंडळींत सामील झाले होते.  त्या वेळी आमचे व यशवंतरावांचे जे अनेक विषयांवर बोलणे झाले.  त्यांत शिक्षण पुरे करण्याचा प्रश्न उपस्थित झाला.  शालान्त परीक्षा पुरी करून पदवी परीक्षेपर्यंत जावयाचे असा निर्णय यशवंतरावांनी घेतला.  राजकीय वा सामाजिक चळवळीमध्ये सार्वजनिक निधीवर जगण्याची पाळी येऊ नये म्हणून काही झाले तरी शिक्षण पुरे करायचे असा निर्णय त्यांनी त्या वेळी केला.  १९३४ मध्ये ते शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले.  १९३८ मध्ये इतिहास व अर्थशास्त्र हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी.ए. ही पदवी त्यांनी घेतली.  १९४० मध्ये एलएल.बी. ही कायद्याची पदवी घेऊन वकिलीस प्रारंभ केला.