यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व-ch २-१

एकदा काही गोष्टी मोकळ्या वातावरणात बोलायला मिळाव्यात म्हणून मी यशवंतराव, वसंतदादा, आबासाहेब कुळकर्णी (खेबुडकर) ह्यांना निरोप पाठविला की एका जागी भेट, बोलू.  यशवंतरावांनी आणि दादांनी मला निरोप दिला की शंतनुरावांना सांगा ''कृष्णाकाठची ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी खाऊन वाढलेले आपण, आपल्याला शिष्टाचार कशाला हवेत ?  जागा ठरवा आपण एकत्र येऊ.''

भेटीत यशवंतराव फार खेळकरपणे वागायचे, अगदी आपलेपणाने बोलायचे.  एकदा मी त्यांना त्यांच्या दिल्लीच्या घरी भेटलो.  मी नुकताच अमेरिकेतून आलो होतो.  अमेरिकेत तेव्हा अध्यक्षीय निवडणुकीची गडबड होती.  यशवंतराव मला म्हणाले, ''शंतनुराव, ह्या निवडणुकीत निक्सन पडणार असं माझं मत आहे.''  मी म्हटले, ''तुमचा अंदाज जर भारत सरकारच्या मतावर आधारलेला असला तर तो चुकणार !''  ते म्हणाले, ''तुम्ही सरकारवर नेहमीच टीका करता.  पण ह्या वेळी निक्सन येणार नाही असं मलाही वाटतं.''  माझे मत निक्सन निवडून येणार असं होतं.  त्यांना ते पटले नाही.  वादात शेवटी पैज लावली.  निक्सन निवडून आल्यास यशवंतरावांनी एक रुपया द्यायचा व निक्सन पडल्यास मी त्यांना एक रुपया द्यायचा असं ठरलं.  

अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा मी पुण्यास होतो.  यशवंतराव दिल्लीत होते.  आमच्या कारखान्याचे एक अधिकारी दिल्लीला गेले होते.  कामासाठी यशवंतरावांना भेटले.  त्यांच्या बरोबर यशवंतरावांनी एक रुपया पाठवून दिला आणि निरोप दिला, ''निक्सन निवडून आल्यामुळे मी पैज हरलो त्याचा रुपया.''

कोल्हापूर ते कराड या भागात किर्लोस्कर कारखान्यामुळे झालेली प्रगती यशवंतराव अभिमानाने इतरांना सांगत.  कै. पपांच्या जन्मशताब्दीच्या समारंभात आम्ही सर्वांनी पपांचा पुतळा किर्लोस्करवाडीला उभा केला.  त्याच्या उद्धाटनाच्या वेळी यशवंतरावांनी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  ते म्हणाले, ''आज एखादा कारखाना उभा करायचा तर प्रथम आपण वीज, पाणी, रस्ता, फोन ही सारी आहेत का ह्याची खात्री करून घेतो.  आजची तरुण पिढी सर्व सोयी असल्या तरी कारखाने काढावेत का नाही ह्याचा विचार करते.  कै. लक्ष्मणरावांनी किर्लोस्करवाडीत कारखाना काढला तेव्हा कारखान्याला अनुकूल असे काहीच नव्हते.  प्यायला पाणी सुद्धा नव्हते.  उजाड रान होते.  पण लक्ष्मणरावांचा निश्चय कडवा होता, चिकाटी दांडगी होती, आत्मविश्वास पक्का होता.  त्यांनी कारखाना काढला, यशस्वी केला आणि इतरांना शिकवून, स्फूर्ती देऊन आणखी कारखाने काढावयास मदत केली.  हे कर्तृत्व असामान्य आहे.''  तसेच मी कारखाने वाढवले, जगभर महाराष्ट्रात तयार केलेला माल पोचवला, ह्याचेही तोंड भरून कौतुक केले.  त्या समारंभाला दादाही होते.  दोघेही एकाच आपलेपणाने आले, बोलले.

मला वाटते यशवंतराव जितके मोठे झाले त्यापेक्षा आणखी कितीतरी मोठे व्हायला पाहिजे होते.  मला राजकारणातल्या अंतर्गत वाटा, प्रवाह ह्यांचा अनुभव नाही.  ह्या प्रवाहांचा, वाटांचा यशवंतरावांच्या आयुष्यावर जो परिणाम झाला असेल त्यामुळेही पुढे पुढे त्यांच्या मोठ्या पदाला धक्का पोचला असेल.  ते गेले तेव्हा मला वाटले, यशवंतरावांच्या कर्तबागारीच्या मानाने त्यांना आणखी मोठे स्थान मिळावयास पाहिजे होते.  कदाचित माझी ही भावना व्यक्तिगत असेल.  त्यांच्याच भाषेत सांगायचे तर कृष्णाकाठची ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी खाऊन वाढलेले आम्ही.  आमच्यातून ते गेले तेव्हा त्यांची जागा रिकामी झाली, रिकामीच राहिली.