यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-महाराष्ट्र शासनातर्फे आदरांजली १

महाराष्ट्र राज्याच्या विकासाला अधिक गती यावी, स्थानिक विकासाचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सुटावेत, त्यात स्थानिक जनतेचा, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग लाभावा म्हणून महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची निर्मिती करण्यात यशवंतरावजींचा वाटा मोठा मोलाचा आहे.  पंचायत राज्याच्या निर्मितीमुळे एखाद्या ज्योतीने अनंत ज्योती प्रज्वलित व्हाव्यात त्याप्रमाणे यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून विकासोन्मुख नवनेतृत्व मोठ्या संख्येने उदयास आले, त्याचाही विसर कोणास पडणार नाही.  

महाराष्ट्राचे समाजकारण आणि राजकारण करताना आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची धुरा वाहताना यशवंतरावजींनी सामाजिक प्रबोधनाची केलेली कामगिरी तर अविस्मरणीय मानावी लागेल.  या राज्यातील गोरगरीब, दीनदलित, हरिजन-गिरिजन यांना केवळ सामाजिकच नव्हे तर शैक्षणिक आणि राजकीयही न्याय देण्याचा प्रयत्‍न त्यांनी निर्धाराने केला.

महाराष्ट्र हे देशातील एक प्रगतीपथावरील राज्य म्हणून ओळखले जाते.  याचे श्रेय मोठ्या प्रमाणात यशवंतरावजींनी राज्य प्रशासनात घालून दिलेल्या निकोप संकेतांना दिले पाहिजे.  प्रशासन लोकाभिमुख व लोकादरास पात्र असावे यावर त्यांचा कटाक्ष होता.  

१९६२ साली चिनी आक्रमणाच्या वेळी त्या वेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राच्या या अग्रगण्य नेत्यास देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारण्यासाठी दिल्लीस पाचारण केले आणि महाराष्ट्र राज्याला त्यांची गरज असतानादेखील यशवंतरावजींनी आपल्या नेत्याची आज्ञा प्रमाण मानली.  सह्याद्री हिमालयाच्या रक्षणार्थ दिल्लीस धावला.  संरक्षणमंत्री या नात्याने यशवंतरावजींनी ते पद १९६२ ते १९६६ सालापर्यंत समर्थपणे सांभाळले.  त्यानंतर या खंडप्राय देशाच्या कारभारामध्ये ज्यांना अतिशय महत्त्व आहे अशा गृह, अर्थ व विदेश मंत्रालयांची धुरा त्यांनी तितक्याच कुशलतेने व आत्मविश्वासाने वाहिली.  जेव्हा जेव्हा देशापुढे वा संबंधित खात्यांमध्ये कसोटीचा कठीण क्षण आला त्या त्या वेळी यशवंतरावजींवर ते खाते सोपविण्यात आले व प्रत्येक वेळी त्या सत्त्वपरीक्षेला ते यशस्वीपणे सामोरे गेले. पंडित नेहरू आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अलिप्‍ततावादी ध्येयधोरणाची पताका परराष्ट्रात डौलाने फडकविण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.  भारताच्या उपपंतप्रधानासारखे महत्त्वपूर्ण पदही त्यांनी कौशल्याने सांभाळले.  अलीकडे आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी समर्थपणे भूषविले.

चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात आणि पंचवीस-तीस वर्षे उच्च अधिकारपदे भूषविताना त्यांनी साहित्य, नाट्य, संगीतादी क्षेत्रांत आस्थेने रस घेतला.  ते एक उत्तम वक्ते होते.  त्यांच्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक भाषणाने सारा जनसमुदाय मंत्रमुग्ध होत असे.  'सह्याद्रीचे वारे' आणि 'युगांतर' हे त्यांच्या भाषणांचे संग्रह लोकप्रिय ठरले आहेत.  'कृष्णाकाठ' हे त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र तर उत्तम साहित्याचा एक नमुनाच मानावा लागेल.  साहित्य, संगीत, नाट्य, क्रीडादी विविध क्षेत्रांतील मंडळींना जवळ करून त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.  यशवंतरावजी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात जेवढे रंगून जात तेवढेच ते साहित्यिकांच्या काव्यशास्त्रविनोदात गुंगून जात.  महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर स्थापन केलेले भाषा संचालनालय आणि साहित्य संस्कृती मंडळ ही त्यांच्या या क्षेत्रातील रसिकतेची व द्रष्टेपणाची साक्ष देत आहेत.  असे एक चतुरस्त्र, अलौकिक व समतोल राजकीय नेतृत्व, चोखंदळ, रसिकत्व, सहृदय आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आज अंतर्धान पावले आहे.

महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि देशाचे एक थोर नेते श्री. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचे रविवार, दिनांक २५ नोव्हेंबर १९८४ रोजी नवी दिल्ली येथे आकस्मिक निधन झाले.  त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या या अतीव दुःखाच्या प्रसंगी महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्र शासन शोकभावना प्रकट करून त्यांच्या दुःखात सहभागी होत आहेत.  सामाजिक समतेचे अढळ अधिष्ठान असलेल्या पुरोगामी विचारांचा पाठपुरावा करून यशवंतरावजींनी दिलेले आदर्श आचारविचारात आणून महाराष्ट्राच्या, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणे हीच महाराष्ट्राच्या या थोर सुपुत्रास खरीखुरी श्रद्धांजली ठरणार आहे.