यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र -२-२९०१२०१२

पत्र - २
दिनांक २९-०१-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

निरगुडी हे फलटण तालुक्यातलं फार जागरुकता बाळगणारं गाव.  तसं गिरवीही राजकीयदृष्ट्या जागरूक गाव.  दोन गांव शिवथडी.  त्यानं पै-पावनं दोन्ही गावांत मैंदाळ.  कोण कुणाच्या नात्यातला आसंल सांगता येत नाही.  कुणाला पदर कुठं लागंल सांगता यायचा नाही, तेवढा गोतावळा. दोन्ही गावचा कुणबावा मोठा.  बागायती जमिनी निरायतीपेक्षा कमी.  कोरडवाहू जमिनीच जास्त.  पण तुला सांगतो, शेतकरी मरणाचं कष्ट करून बागायती शेतीत सानें पिकवत होते.  मोत्यासारखी ज्वारी आता कुठं बगायला मिळत नाही.  तीस-चाळीस पेरांचा ऊस.  त्यावेळी ४१९ ची मोठी लागन असायची.  पण, शेती रानवडी असो, बागायती असे, वारंगुळ्यानं व्हायची.  काढणी, मळणी, पेरणी सारी कामं वारंगुळ्यानं व्हायची.  त्यात गावातली माणसं सारी कायम एकमेकांत गुतल्याली असायची.  भांडणतंटा झाला तरी तेवढ्यापुरता.  पुन्हा एक व्हायचं.  पण शेती जशी मनगटाच्या जोरावर फुलायची, तसं राजकारण बी रक्तात मुरल्यालं, लोणच्यावाणी, इरिशिरी तेवढीच.  सारं नातंगोतं, पै-पावनं भावकीत गुंतलेले असायचं.

मागच्या पत्रात मी तुला प्रभातफेरीबद्दल लिहिलं व्हतं, की आमची तिरंगी झेंड्याची मिरवणूक मोठी निघालीती.  पण वारं सारकं फिरत व्हतं.  एक डाव तिरंग्याचा जोर दिसायचा, तर दुसर्‍या दिशी लालबावट्याचा.  गावात नुसत्या चर्चा आन् चर्चा.  कोण कुणाची कुरापत कवा काढंल ह्याचा नेम नव्हता.  निवडणुकीची तारीख जशी जवळ यायला लागली, तसतसं वातावरण गरम व्हाया लागलं.  त्यात एका दिशी चावडीम्होरं बोर्ड लागला :  'संयुक्त महाराष्ट्र समिती'.  ह्या बोर्डावर लिहिलं व्हतं, 'गुरुवार, दिनांक ४ रोजी सायंकाळी सात वाजता तोफा गरजणार, तोफा गरजणार !  शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर जंगम स्वामी यांची जाहीर सभा.  प्रमुख वक्ते :  क्रांतीसिंह नाना पाटील, कॉ. हरिभाऊ निंबाळकर, कॉ. रामभाऊ सस्ते.  हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा.  निपाणी, बेळगाव, धारवार, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.'  बोर्ड बघायला पोरासोरांबरोबरच थोरामोठ्यांची गर्दी जमू लागली.  ज्याच्या त्याच्या तोंडी एकच गोष्ट, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.  'मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.'  'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.'  आता गावात वातावरण पेटलंय, म्हणजी ज्यो त्यो खाका सावरून म्हणायला लागला, 'लाल बावटेकी जय.'  घराघरावर लाल झेंडे दिसायला लागले.  कालपर्यंत तिरंगी झेंड्याकडे आसलेले लोक हळूहळू लाल झेंड्याकडे वळू लागले.  त्यांच्या प्रभातफेर्‍या मोठ्या होऊ लागल्या.  आमच्या गावातली तरणी पोरं सायकलवर बसून सारा तालुका पिंजून काढू लागली.  आता सारेच हौसेगौसेनवसे हुरळून पळाया लागले.  नाही म्हणायला वरची आळी, मधली आळी जाम तिरंग्याला चिकटून व्हती.  त्यानं गावात नुसत्या झेंड्याची लढाई सुरू होती.  तीच स्थिती गिरवीची आन् सार्‍या तालुक्याची.  वाटार फुटलं, फलटण फिरलं, निंबळकद लाल झालं, भाडळी गेली, आसं मोठी माणसं म्हणायची.  म्हंजे काय झालं ते आम्हा पोरांना कळायचं न्हाय.  पण लाल बावटेवाले म्होरं सरलेते.  ज्याची चूल पेटत नव्हती, त्योबी राजकारणाशिवाय काय बोलत नव्हता.  बगता बगता ४ तारीख आली.  लाल बावटावाल्यांची दिसभर पळापळ सुरू होती.  गाव सारं शिवारात गेलतं.  शिवारातली कामंधामं टाकून पोटाला का बिबा घालायचा का ?  राजकारणानं काय, चुली पेटत नव्हत्या त्याकाळात.  ती देशसेवा होती, समाजसेवा होती.  छातीवर गोळ्या झेललेल्यांचं रक्त अजून भळभळत होतं.  जखमा ओल्या होत्या.  क्रांतिकार्य केलेले अनेक क्रांतिकारक जिवंत होते.  अनेकांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जात होते.  बघता बघता उन्हं कलली.  सांच्याला गाईगुरं माघारी फिरली.  गाईगुरं घरच्या ओढीनं हंबरत गोठृयाकडं पळत होती.  मेंढरांची खांडं सार्‍या वाटंनं धुरळा उडवीत बॉ बॉ करीत वाडग्याकडं म्होरच्या पावंडानं धनगरामागं पळत व्हती.  आयाबाया पोरालेकरांस्नी काखंला घिऊन, डोस्क्यावरचं गवताचं भारं उजव्या हातानं धरून, लुगडं पायात येणार नाही अशा बेतानं पाय उचलीत चालत व्हत्या.  कुणी जळानकाटूक डोस्क्यावर घितलेलं, तर कुणी भाकरीच्या रिकाम्या टोपल्या घितलेल्या.  सारी वाट धुळीनं माखल्याली.  दिस जसा कडुशाला गेला तसं तिन्हीसांजा झाल्या.  गुरंढोरं दावणीला गेली.  आन् चावडीम्होरं माणसं हळूहळू जमायला लागली.  तिन्हीसांजा टळून गेल्या.  घराघरांत दिवंलागण झाली.  चावडीवरला स्पिकर मोठ्यामोठ्यानं पवाडं म्हणू लागला.  आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार हाय.  लोकांनी खाली बसून घ्यावं, कार्यकर्ते सांगत व्हते. आम्ही पोरं एकमेकांच्या आंगावर माती उधळीत धिंगाणा घालीत व्हतो.