यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३-०१०२२०१२-२

तर बग मी भलतीकडेच गेलो.  मिरवणूक शांततेत पार पडली.  दंगल झालीच असती.  पण पोलिसांनी, कार्यकर्त्यांनी अपमान गिळून यशवंतरावांना सभंच्या ठिकाणापर्यंत नेलं.  बानं मला खांद्यावरनं खाली उतरवलं.  आम्ही चावडीवरल्या पटांगणात एका कडंला बसलो.  काय झालंच नाय आसं माणसं वागत व्हती.  पण प्रत्येकाचा चेहरा पार पडला होता.  प्रत्येकजण खजील झाला व्हता.  गावाचं नाव पुन्हा खराब झालं व्हतं.  बदनामी झाली व्हती.  मानसिंगराव, नरसिंग गुरुजी रडवेले झाले व्हते.  तर यशवंतराव धीरगंभीर, शांतपणे मधल्या खुर्चीत बसले व्हते.  फलटणचे महाराज मालोजीराजे नाईक निंबाळकर म्हणजे अगदी लालबुंद माणूस.  उंचीने थोडे कमी पण, चेहरा अतिशय बोलका.  यशवंतरावांच्या शेजारच्या खुर्चीवर बसले होते.  महाराज कार्यकर्त्यांना सारख्या सूचना देत होते.  मानसिंगराव गावचे सरपंच.  त्यांनी समद्या पावण्यांचं स्वागत केलं.  महाराजांनी यशवंतरावांना भला मोठा हार घातला.  टाळ्यांचा कडकडाट झाला.  काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा झाल्या.  सभेला समितीवालेही मोठ्या प्रमाणात होते.  सारे यशवंतरावांचं ऐकायला शांत बसलेले.  सभा सुरू झाली.  महाराजांनी अत्यंत शांत स्वरात भाषण केलं.  संयुक्त महाराष्ट्राची मागणी ही आपली सर्वांचीच असल्याचं सांगत पक्षाला विजयी करण्याचं आवाहन करून ते खाली बसले.  आता यशवंतराव काय बोलणार यासाठी सार्‍यांचे कान आसुसले व्हते.

सुप्रिया, चव्हाणसाहेबांचं पहिलं भाषण इतक्या लहानपणी मी ऐकलं याचा अभिमानही वाटतो व समजून घेण्याचं ते वय नव्हतं म्हणून दुःखही होतं.  ते बोलायला लागले.  डाव्या बाजूला तिरकी असलेली टोपी त्यांना फार शोधून दिसत असे.  अंगातलं जॅकेट, जॅकेटला असलेलं पेन, धोतर, नेहरू शर्ट, पायात बूट असे अत्यंत साधे.  समोरचा माईक त्यांनी नीट केला.  सार्‍या म्होरक्यांची नावं घेतली.  आणि जसं खरंच काही झालंच नाही असा सुसंवाद सुरू झाला.  गावची ते नानाप्रकारे तारीफ करत होते.  बैलांची मिरवणूक आणि त्यात हरवलेले यशवंतराव शेती, शेतकरी, पाणी, स्वराज्य, देशाची राजाकीय परिस्थिती, शेतकर्‍यांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न, शेतकर्‍यांच्या दुःखी-कष्टी आयुष्याच्या व्यथा, वेदना यशवंतरावांच्या ओठी होत्या.  मधून मधून टाळ्यांचा कडकडाट होत होता.  साहेब बोलत व्हते, ''मला मुंबई पाहिजे.  धारवाड, कारवार, निपाणी, बेळगाव, बिदर, भालकी आणि डांगही पाहिजेल हाय.  पण तो शांततेच्या मार्गानं. वाटाघाटी करून, मला आपण सार्‍यांनी हार घातले तसं जोड्यांच्या माळाही.  लोकशाहीमध्ये दोन्हीही महत्त्वाचं.  डोंगराएवढ्या हारांच्या ढिगावर उभा राहिलो आणि काही भावंड रागावली त्यांनी जोड्यांच्या माळा गळ्यात घातल्या, पण मी डगमगलो नाही, रागावलो नाही.  ज्यांच्या पोटात दुखतं ते रागवणारच.  त्यांच्या रागाकडेही मी मायेनं पाहिलं.  राज्याच्या, देशाच्या हिताचं पाहिलं.  ही सारी शक्ती मिळाली तुमच्यामुळे, तुमच्या डोळ्यांतले दुःखाश्रू पाहून, हे दुःखाश्रू पुसायचे तर संयम असला पाहिजेल.  कुणी अपशकुन केला तरी खचून जाऊ नका.  पक्षाला प्रचंड मतांनी निवडून द्या.''

सुप्रिया, तो मंतरलेला काळ होता.  तो मला लहान असताना पाहता आला.  तशी चळवळ आता पुन्हा होईल का ?  दुःखी, पीडितांचे अश्रु कुणी पुशील का ?  हे वाटून पोटात खड्डा पडतो.  लोकशाही खरंच गेली गोरगरिबांच्या हातून.  काय ठाऊक, ती परतेल की नाही ?  काळ मोठा कठीण आलाय खरं.

आदरणीय बाबांवा, सौ. वहिनींना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका