पत्र- ५
दिनांक १८-०२-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
'कृष्णाकाठी कुंडल आता, पहिले उरले नाही' या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळींनी चव्हाणसाहेबांनी 'कृष्णाकाठ' या त्यांच्या आत्मचरित्राची सुरुवात केली आहे. कृष्णेबद्दलचं प्रेम त्यांच्या मनामध्ये बाळकडूसारखं होतं. चव्हाणसाहेब आपल्यातून जाऊनही २५ वर्षे उलटून गेली. तरीही माझ्या मनामध्ये रुंजी घालणारा कृष्णाकाठ आणि यशवंतराव, कृष्णेच्या खोर्यातले आम्ही सारे भूमिपुत्र आणि यशवंतराव, नदीचं पाण्याशी जेवढं घट्ट नांतं असतं, तेवढंच घट्ट नातं मराठी माणसांबरोबर यशवंतरावांचं होतं. ते स्वतःला या सगळ्यापस्नं वेगळं करूच शकले नाहीत. महाराष्ट्राच्या आणि राष्ट्राच्या बरोबर असलेलं त्यांचं नातं हे अभिजात होते. कृष्णा, कोयना, भीमा, निरा यांनी जसं आम्हाला समृद्ध केलं आहे, तसंच यशवंतरावांनी आमची आयुष्य समृद्ध केली आहेत. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पिढीनं दिलेलं वैचारिक धन पाथेयासारखं माझ्या पिढीला सगळ्या प्रवासात वापरता आलं. ते जिथे जिथे भेटले, जसे जसे भेटले तसे तसे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भावले. दह्यारी, दुधारी, तुपारी, ताकारी, लोणारी ही सारी कृष्णाकाठची गावं. तिच्या समृद्ध वैभवाची साक्ष. याच नदीच्या काठावर यशवंतरावांची पावलं मोठी मोठी होत जाताना या कृष्णामाईनं पाहिली. कृष्णेचं खोरं हे भौतिक अर्थानं समृद्ध. तेवढचं साहित्य-संगीत-कला या सार्या सांस्कृतिक आयामांनी भरलेलं. या सार्याचा एकजीव रस म्हणजे यशवंतराव. तर काय सांगत होतो, तेव्हा पावसाळा नुकताच संपला होता. फलटण-बारामतीचा पाऊस तुला ठाऊक आहेच. यशवंतरावांनी काय केलं ? असा प्रश्न तुमच्या पिढीला नेहमी पडत असणार, हो ना ? आजची तुमची सायबर पिढी आहे. आम्हाला साधा मोबाईल वापरता येत नाही. नातवंडं लीलया सारी आत्याधुनिक उपकरणं वापरतात याचं मला खूप नवल वाटतं. त्या अर्थानं तुमची मुलं, तुम्ही खरंच फार हुशार आहात. पण हे जे जग आज तुमच्या मुठीत आहे ना, तिथवरचा प्रवास फार महत्त्वाचा आहे. तो काळ आजच्यासारखी साधनं नसल्यानं टिपून ठेवता आलेला नाही. तो जो काही शब्दांमध्ये पकडता येईल तेवढा पकडायचा हा प्रयत्न.
तर काय सांगत होतो ? फलटणचा पावसाळा नेहमीच बिनभरवशाचा. आला आला म्हणत वाळवाणं अंगणात गोळा करावीत तोवर गायब. गेला गेला म्हणून निवांत राहावं तर क्षणात सारं आभाळ काळंभोर आणि मुसळावानी विजावार्यासह पडणारा पाऊस. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटानं तुफान कोसळू लागलं की गाईगुरांना, पशुपक्ष्यांना, वृक्षवेलींना कुठे तोंड लपवावं हे कळत नसे. वारा असा पिंगा घाली की कंबरेतून गोल फिरणारी, केस मोकळे सोडलेली, पिंगाकरी बाई जशी पिंगा घालते तसं तुफान सुरू झालं ना की झाडं गरगरायला लागत. कडाडा फांद्या मोडून पडत. जीव मुठीत धरून सारी माणसं आडोशाला पळत असत. नाले, ओढे, भरभरून धावत सुटत. आणि तसा अचानक आलेला हा पाऊस अचानक क्षणांत निघूनही जात असे. पिकापाण्याची, घरादारांची फार फार दुर्दशा करून जात असे. त्याला वळीव म्हणतात. सांगून येणार नाही आणि सांगून जाणार नाही.
निरेला पूर आला की सारी वाहतूक बंद. सोमंथळीतून सांगवीला जायचं तर, निरेला बारा महिने तेव्हा पाणी असे. पूर येई तो पार सांगवीची चावडी आहे ना आपली, तिथवर. सोमंथळीत तर पाणी पार गावात घुसायचं. तिन्ही बाजूंनी ओढे. निरेला तेव्हा पूल नव्हता. नदीच्या पात्राला ओलांडायचं तर नावेनं जावं लागत असे. सांगवीच्या शाळेच्या मागे या नावा लावलेल्या असायच्या. सांगवीचा बाजार शुक्रवारी भरत असे. दोन्ही तालुक्यांतली माणसं बाजारहाटाला सांगवीला येत. नदीला पाणी आं की नवेत बसून आम्ही सांगवीला जायचो. नावेत बिघाड झाला, नावकरी नसला की माणसं, म्हंजे पुरुष माणसं नदीपात्रात उड्या टाकत आणि पोहत येत असत. असे पट्टीचे पोहणारे होते, सांगू तुला ! मीही लहानपणापासून नदीला पोहत असे. आमचं एक पाचदहाजणांचं टोळकंच होतं म्हणना. नदीला पूर आला की आम्ही पळत गावापासून दोनतीन किलोमीटर नदीच्या वरच्या बाजूला जात असायचो. नदीत उड्या मारायच्या, पुरात पोहायचं तसं धाडसाचं पण सोपं. भीती वाटली ना पाण्याची, की मेला. भोवर्यात सापडला तरी मेला. गावातल्या लोकांच्या नजरा चुकवून आम्ही पोरं पुरात उड्या मारायचो, पोहायचो. पुरातनं त्यावेळी कलिंगड, टरबूज वाहत येत. त्यातला वेल पकडायचा, पायानं तो सारा वेल वाहत, पाण्याबरोबर पोहत गावाजवळ नदीच्या कडेला आणायचा. पूर बघायला आलेले गावकरी शिव्या देत वेल पकडू लागत आणि वेलाला लागलेली कलिंगडं मग सार्या गावांत वाटली जात. सारा गाव एकीकडे पुरानं धास्तावलेला असायचा, दुसरीकडे 'पोरं म्हणजे फार हूशार' म्हणून शाबासकी द्यायचा.