यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३-०१०२२०१२-१

स्वातंत्र्यसैनिकांच्या थाटात मिशावणी पिळ मारीत, गांधी टोपी तिरकी करून आपुनबी त्यात हुतू म्हणून फुशारकी मारत व्हते.  आली, आली, म्हणता दहा तारीख आली.  सारं गाव यशवंतरावांच्या वाटंला डोळे लावूनशानी बसलतं.  शाहीराची सभा वरल्या आळीच्या पोरांनी उधाळल्याली.  रामभाऊच्या डोस्क्यात काठी लागलीती हे खालच्या आळीची माणसं इसरायला तयार नव्हती.  पुन्हा कलागत व्हणार, म्हणून माणसं आता सावध व्हती.  त्यात नरसिंग गुरुजी म्हणाले, 'गावात काय बी व्हता कामाचं न्हाय.  आदीच गावाची अब्रू गेलीया.  शांततेत सारं करायचं.  फक्त गावातनं बैलजोड्याची मिरवणूक निघंल.  यशवंतराव, म्हाराजसाहेब गाडीत बसत्याल.  बाकी म्होरं १०१ बैलजोडी जोडल्याली आसंल.  घोषणा नाही, गुलाल नाही.'  मानसिंग ससता म्हणाला, 'मंग का उपयोग ?  बैलजोडीच्या चित्रावर शिक्का मारा', 'आपली खूण, बैलजोडी' येवढं तर म्हणू.'  गुरुजींनी परवानगी दिली.  सार्‍या पंचक्रोशीतनं बैलं जमायला लागली.  शिवळ आन् बैलं येटणानं एकमेकाला बांधली आन् गावाच्या बाहेर समद्या रस्त्यानं बैलंच बैलं.  बैलजोड्या बगायला ही गर्दी झाली.  आलं आलं म्हणता गाड्या वाजाया लागल्या.  ढोल-ताशे वाजू लागले.  धुळीचं लोट आभाळाला भिडले.  रामभाऊ सस्ते आन् आणखी पाचसहा लोकांना पोलिसांनी पिंजर्‍यात घालून फलटणला नेहलं.  त्यानं लाल बावटेवाले चवताळले.  पण, काय करणार ?  पोलिसांनी सारं गाव ताब्यात घितलंतं.  गर्दी तर तोबा झाली.  आमच्या बानं आमाला जाम धरून ठेवलं व्हतं.  'पळायचं न्हाय, चेंगरून मरशील.  मुठीयेवढा जीव, काय करायचं तुला ?'  म्हणत दाबून हात धरलाता.  मला कायच दिसत नव्हतं.  मी रडाया लागलो.  बानं समजूत काढीत खांद्यावर घितलं.  आता दिसायला लागलं.  मी आनंदानं टाळ्या वाजवल्या.  गाड्या आल्या आन् गाड्यातनं खादीच्या कापडातली दोन मोठी माणसं खाली उतारली.  दोघांच्या आंगात नेहरू शर्ट, पांढरी धुवाट धोतारं 'तिरक्या आकाराची टोपी हाय ना, ते यशवंतराव.'  बानं सांगितलं, 'आन् बुटके हायत ना, सरळ टोपीवाले, ते महाराज.'   मी बगत व्होतो.  बाया यशवंतरावांस्नी कुंकू लावीत व्हत्या.  पाचपन्नास बाया, नुसती गर्दी.  कोण कुंकू लावतंया, कुणी दुसरीला मागं सारून म्होरं घुसतंय, तर कुणी आरतीतील वात म्होरं सारतंय, कुणी ओवाळतंय !  बापे मंडळी 'यशवंतराव चव्हाणांचा विजय असो' अशा घोषणा देता देता, चवड्यावर येऊन यशवंतरावांना कसं बगता येईल म्हणत जो तो म्होरं म्होरं घुसतोय.  त्यानं नुसती रेटारेटी.  निघा निघा, पुढारी जमावाला आवरत होते.  पण, एक जमाव मागं गेला की, दुसरा म्होरं.  यशवंतरावांचं कपाळ कुंकवानं पार लालभडक दिसायला लागलं.  म्हाराजांचा गोरापान चेहरा आणखीच लाल दिसाला लागला.  नरसिंग गुरुजींना मोठा घोर.  माणसांची उलघाल चालू.  प्रत्येकाला यशवंतरावास्नी, महाराजास्नी बगायचं असतंया.  त्यात बैलांच्या शिवळा घिऊन बैलं चुळबूळ करायला लागली.  बैलकरी बी कावलं, 'लेका, आमास्नीबी बगायचंय नव्हं, यशवंतरावाला. ये धर माझी बैलं धर.'  एक दुसर्‍याला इनवत व्हता.  पोरं मोठी बरं का, झाडांवर चढून यशवंतरावाला बगत व्हती.  अशी तोबातोबा गर्दी.  काकणाच्या, साड्यांच्या, पदरांच्या सुंदरमाळा मोठ्या शोभिवंत दिसत होत्या.  बाया नटूनथटून आल्यात्या.  कालवा तसाच म्होरं सरायला लागला.  जिनं ववाळलं तिनं ववाळलं, ज्या र्‍हायल्या त्या फुगून चालायला लागल्या.  बैलं बी म्होरं म्होरं निघाली.  घोषणांचा पाऊस पडत व्हता.  'काँग्रेसची खूण बैलजोडी.'  'बैलजोडीच्या चित्रावर शिक्का मारा.'  बाया बी जोराजोरात घोषणा देत व्हत्या.  मिरवणुकीतला ताशावाला रंगात आला होता.  ढोल, ताशा, सूर, सनई, कांडकी एकाच तालासुरात रंग भरत व्हती. पुढारी त्यास्नी 'चला म्होरं, चला म्होरं' म्हणून रेटत व्हते.  बैलाच्या येसणी प्रत्येक बैलकर्‍यानं वडून धरल्या व्हत्या.  त्यानं ताकदीचं खोंडसुद्धा गप्प गाईवाणी हळूहळू चालत व्हतं.  मध्येच एकांदा बैल शेणाचं पव टाकायचा.  आन् 'हात् तुझ्या आयला' म्हणत बैलकरी आंगावरलं श्यान झाडीत 'त्याच्या बायला, तुला खाल्ला आराबानं' म्हणत, त्याच्या पोटात कोपरानं मारीत व्हता.  मिरवणूक मुंगीवाणी म्होरं सरत व्हती.  माणसांची गर्दी बी मुंग्यावाणी झाली व्हती.  १०१ बैलजोड्यांची मिरवणूक !  बैलंच बैलं. पांढरी, तांबूस रंगाची, काळ्या रंगावर झकास पांढरं टिपकं, तर काय काय बैलांवर पांढर्‍या रंगावर काळं टिपकं.  परत्येकाचा वाण येगळा.  परत्येकाची शिंगं येगळी.  कुणी खिल्लारी जोडी आणलेली, तर कुणी नंदीबैलावाणी पंढरपुरी आणलेली.  सार्‍यांच्या गांधीटोप्या, म्हंजी आभाळांतल्या बगळ्यावाणी रांगत निघालेल्या.  मी बाच्या खांद्यावरनं सार्‍या टोप्याच टोप्या बगत होतो.  तेवढ्यात काय झालं कुणास ठाऊक, ज्यो त्यो वर बगत व्हता.  पाटलाच्या वाड्याम्होरनं मिरवणूक निघालीती.  कैकाडवाड्यात आली.  तिथं वाटच्या एका बाजूला मोठाच मोठा लिंब.  लिंबाच्या म्होरं, वाटंच्या म्होरच्या बाजूला चिंचंच झाडं.  दोन्ही झाडं आमनेसामने.  एका झाडावर चारपाच जणांनी हातात दाबं धरल्यालं.  तसंच त्याच दाव्याचं दुसरं टोक दुसर्‍या झाडावर चारपाच जणांनी धरल्यालं.  तसंच त्याच दाव्याचं दुसरं टोक दुसर्‍या झाडावर चारपाच जणांनी धरल्यालं.  पायातली पायतानं त्या सार्‍यांनी कासर्‍यात ववल्याली.  कासरा वडून धरल्यानं सारी मिरवणूक जोड्यांच्या माळंखालनं गेली.  जसं हे ध्यानात आलं तसं पोलिस, कार्यकर्ते आणि गर्दीतली सारी माणसं दिसंल ती वस्तू झाडावर मारायला लागली.  यशवंतरावांचा फार मोठा अपमान या टोळक्यानं केला व्हता. पोलिसांनी झाडांच्या बुंध्याचा ताबा घेतला आणि यशवंतरावांनी कौशल्यपणाला लावून मिरवणूक म्होरं सरकावली.  पोलिसांनी झाडावरल्या टोळक्याला झोडत झोडपत पिंजर्‍यात घातलं.  सारा रंगाचा बेरंग झाला.  जोड्याच्या माळंखालनं काँग्रेसची मिरवणूक गेली.  पोलिसाला आधी का समाजलं न्हाय आसं.  सारी एकमेकाला इचारत होती.  हे गाव समितीचा बालेकिल्ला.  रामभाऊला एकट्याला पिंजर्‍यात बसावलं म्हणं का झालं ?  त्याला अटक नस्ती केली तर कायबी नसतं झालं.  गर्दी म्होरं सरत व्हती.  बैलांच्या जोड्या लांबच्या लांब होत्या.  त्या सार्‍याबरोबर गर्दी चावडीम्होरं सरकत निघाली.  सार्‍या पंचक्रोशीतनं माणसं आली व्हती.  आता तू म्हणशील,  इतकी माणसं कशी आली ?  त्याकाळात गाड्यांची रेलचेल नव्हती.  प्रत्येकाकडं सायकल व्हती.  सायकलीनं, गाड्या जुंपून नाहीतर पायीपायीच माणसं पदरच्या भाकरी बांधून सभंला जायची.  आतावाणी खाण्यापिण्याची सोय तसा होत नव्हती.  आपापल्या पडशीत आपापली शिदोरी असायची.  सभा संपली म्हंजी कार्यकर्ते आपापल्या सोयीनं हिरीवर, वड्यावर, जिथं पाणी आसंल तिथं जेवणं करायची.  ज्यानं कायच आणल्यालं नसंल, त्यालाबी समद्यासंग जेवायला मिळायचं.  तवा पक्ष गरीब होते, गरिबांचे होते. राजकारण धंदा नव्हता.  यशवंतरावांनी कोणा गावाला सोड, कुणा कार्यकर्त्याला पुढार्‍यालासुद्धा असलं जेवणखाण दिलं नव्हतं.  माणसं इचारासाठी भांडायची.  इचार करून स्वार्थासाठी नाही.  पक्षासाठी डोस्की फुटायची, थैल्यासाठी नाही....