यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १-२६०१२०१२-१

काँग्रेसची खूण बैलजोडी.  'बैलजोडीच्या चित्रावर शिक्का मारा'.  'यशवंतराव चव्हाणांना विजयी करा'.  'पंचवार्षिक योजना हीच आमची घोषणा.'  'राज्य कसं घेतलं गांधीनं ?  मूठभर मिठानं, मूठभर मिठानं.'  'तिरंगी झेंडा जिंदाबाद.'  सारं गाव दणाणून जात होतं.  फार मोठी फेरी असायची.  सकाळपेक्षा संध्याकाळी फेरी मोठी निघायची.  सारा गाव जागवायचा.  बाया, पोरी आपापल्या उंबर्‍यावर, दारात, अंगणात, बोळाच्या तोंडाला, घोळक्या घोळक्यानं बगत उभ्या राहायच्या.  ज्याच्या त्याच्या तोंडी 'बैलजोडी', 'बैलजोडी', 'यशवंतराव', 'यशवंतराव', 'यशवंतराव' असायचं.  बैलजोडीचा असा दणक्यात प्रचार असायचा.  'अहो,  बाबूराव जेवणाची काय सोय     आहे का ?' 'अहो काकासाहेब, काही खाण्यापिण्याची व्यवस्था आहे का ?' 'काय राव, ही काय जत्रा हाय का चव्हाणाच्या पोरीचं लगीन ?  'ही इलॅक्शन हाय इलॅक्शन, ध्यान ठीवून असा.  इरोदक ह्याच्यातलं कायतर करतील.  आपली आपली माणसं ताब्यात ठिवा, आन् बैलजोडी.' 'आरं बाबा, इंग्रज पळालं, ह्येच मोठं झालं.  वाटत होतं का जात्याली म्हणून ?  आजून आमच्या कानात त्यांच्या बुटाचा आवाज हाय.  ज्यो बेइमानी करंल, त्यो नरकात जाईल.  साडी, माडी, जेवणावळ्या, पत्रावळ्या, घोटबर दारू ह्याज्यापरीस दारातला सावकार गेला, ही का बारकी गोष्ट हाय ?  कवातरी ती तांबड्या तोंडाची माकडं जात्याल, आन् आसं स्वातंत्र्य मिळंल, सपनात होतं का ?  मर मर मेहनत केली, पॉट भरत होतं का ?  आता स्वराज आलं, कुणीबी उपाशी निजायचं नाय.  साळा आल्या, शिक्शान आलं, म्हणजे सगळी भरून पावत्याल बगा.  घटकीच्या घोटासाठी असं आयसंग जाऊन बापाला रामराम करायचा नसतो.  बाप बापच असतो बाबा.  एवढी घटना काय शेन खायला लिहिली ?  यशवंतराव तुरुंगात गेला, तवा काय त्याला सपान पडलं व्हतं ?  आरं फलटणच्या तुरुंगात व्हता, पोटचा गोठा गेला तरी तुरुंगातनं बाहीर नाय आला.  माफी नाय मागितली.  त्याला नाय द्यायचं मत तर मग कुणाला ?'  चावडीवरच्या गप्पांना असा ऊत यायचा.  चव्हाणांचं मोठेपण अशा खर्‍याखोट्या आख्यायिका घेऊन जन्माला आलं होतं.

एक प्रभातफेरी संपली की विरोधकही फेरी काढत असत.  त्यांच्या हातात लाल रंगाचा, विळा-हातोडा असलेला झेंडा असायचा.  त्यांच्या घोषणा वेगवेगळ्या.  माणसं  फार नसायची.  बारकीसारकी पोरंबी नसायची.  चारदोन बाया, आन् पाचपन्नास पुरुष.  सारे प्रौढ, गंभीर.  गंमतजंमत नाही, दंगामस्ती नाही, वाद्यं नाहीत, गोंगाट-कालवा नाही.  मोठमोठ्यानं 'लाल बावटे की जय.' 'शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा विजय असो', 'गरिबांचं राज्य आलंच पाहिजे', 'शेतकर्‍यांचं राज्य आलंच पायजे', 'क्रांतीसिंह नाना पाटलांचा विजय असो', 'कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकरांचा विजय असो' असे नारे देत फिरायचे.  त्यावेळी या लाल बावटेवाल्यांच्या सायकलवरूनही प्रभातफेर्‍या निघत.  एखाद्या सायकलच्या नळीवर बसून, हातात लाल झेंडा घेऊन मीही घोषणा देत असे, 'लाल बावटे की जय'.  हे लाल बावटेवाले आम्हाला चिरमुरे-फुटाणे द्यायचे.  या फेरीत बहुतेक सारे मागासवर्गीय.  रामभाउफ् सस्ते आणि त्यांच्या विचाराची माणसं.  सारे शिस्तीनं चालायचे.  सगळ्यांच्या हातात लाल बावटे.  किती सालची निवडणूक कोण जाणे ?  काँग्रेसच्या फेरीत आम्ही पोरं मोठ्या संख्येनं असायचो.  फेरी संपली, की सर्वांना लिमलेटच्या दोनदोन गोळ्या मिळायच्या.  लाल बावटावाले अशा काही गोड गोळ्या द्यायचे नाहीत.  त्याचं आपलं लाह्या-फुटाणे.  त्यांच्या घोषणा बी जाड, लांबच्या लांब. आपलं पब्लिक भारी.  हिकडं गेलं तरी 'जय' म्हणायचं, तिकडं गेलं तरी 'जय' म्हणायचं.  कशाची 'जय' कुणास ठाऊक ?  सार्‍यांचीच जय.  पण, आजही महात्मा गांधी म्हटलीं की, आपोआप तोंडात येतं, 'जय'.  'यशवंतराव चव्हाणांचा... म्हटलं की, आपोआप तोंडात येतं, 'विजय असो.'   इतका दीर्घकाळ चव्हाणसाहेबांचा आमचा सातार्‍याच्या माणसांशी संबंध होता.  हयात असेपर्यंत ते आमचे नेते होते.  दुसरा कुणीही आमच्या लोकसभा मतदारसंघात उभा राहिला नाही.  आणि निवडूनही येऊ शकला नाही.  विजयी व्हायचे ते चव्हाणच.  चव्हाणसाहेबांचं सातार्‍याच्या मातीशी हे जे नातं होतं ते अखेरपर्यंत.  त्यांची आठवण झाली नाही, असा एकही दिवस निदान माझ्या आयुष्यात जात नाही.  जेवढं आठवेल, तेवढं तुला कळवत जाईन.  तळागाळातून शिखराला पोहोचलेल्या एका अवलियाची गोष्ट.  ज्याचं नाव होतं 'यशवंत'.

तुझा,
लक्ष्मणकाका