यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-(मनोगत)१

यशवंतराव चव्हाण हे केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे असामान्य नेतृत्व होते.  २५ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.  त्यापूर्वी अनेक प्रकारांनी त्यांचा तेजोभंग झाला होता.  अनेक अवमान त्यांनी पचवले होते.  कौटुंबिक दुःखाने तर त्यांच्यावर सामूहिक हल्ला केला होता.  त्यांच्या जागी अन्य कुणी असता तर उन्मळूनच पडला असता.  वेणूताईंच्या नंतर तर त्यांचे जीवन सत्त्वहिन झाले होते.  शेवटपर्यंत ते वेणूताईंना क्षणभरही विसरू शकले नाहीत.  अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जन्माला आलेले यशवंतराव आपल्या अंगच्या अभिजात व अतुलनीय गुणांनी ध्येयनिष्ठ आणि मुल्यनिष्ठ जीवन जगले.  माझ्यासारख्या सर्वार्थाने उपेक्षित असलेल्या माणसावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले.  शशी, भाई, समता आम्हाला त्यांच्या कुटुंबाचा भाग केले.  त्यांच्याबरोबर त्यांच्या वेदना वाटून घेता आल्या नाहीत, पण आमच्या कुटुंबासोबत चार क्षण आयुष्याचे त्यांना विरंगुळा मिळाला आणि खरे तर त्याने आमचेच आयुष्य समृद्ध झाले.  चव्हाणसाहेबांच्या या ॠणातून मुक्त होणे शक्य नाही.

चव्हाणसाहेबांच्या बरोबर जेवढा काळ मी काढला, जे त्यांच्याशी बोललो अशा आठवणी तर आल्याच; शिवाय मी ऐकलेल्या त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका या ग्रंथामध्ये आल्या आहेत. यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व उलगडत असताना, स्वातंत्र्योत्तर काळातला सामाजिक बदलही चित्रीत करावा आणि त्यांच्या आठवणी सांगत असताना त्यांचे लोकोत्तर निर्णय तरुण पिढीपर्यंत पोहोचवता आले तर पाहावे असाही प्रयत्‍न केला आहे.  ही पत्रे लिहीत असताना महात्मा फुल्यांचे समग्र वाङ्‌मय त्र्यं. ना. अत्र्यांना गावगाडा, माधुरी पुरंदरे यांचे पिकासो, मी पाहिलेले यशवंतराव-सरोजिनी बाबर, कृष्णाकांठ- यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र, यशवंतराव चव्हाण व्यक्तित्व व कर्तृत्व- गोविंद तळवळकर, सह्याद्रीचे वारे - यशवंतराव चव्हाण, भूमिका - यशवंतराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण - आनंदराव पाटील, रामभाऊ जोशी यांनी संपादित केलेले यशवंत स्मृतिगंध, यशवंतराव चव्हाण - राजकारण आणि साहित्य हा भास्कर लक्ष्मण भोळे यांचा ग्रंथ, अशा ग्रंथांचा मला मोलाचा उपयोग झाला आहे.

ही पत्रे लिहीत असताना जसे काही ग्रंथांचे साहाय्य झाले तशा काही मित्रांनी अनेक आठवणी शेअर केलेल्या आहेत.  त्यात माझे पत्रकार मित्र बाबूराव शिंदे, विनायकदादा पाटील, यशवंतराव गडाख, प्रगती बाणखेले, दत्ता बाळ सराफ, रंगनाथ पठारे, अरुण शेवते, यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे.  हस्तलिखिताची पहिली प्रत अर्थातच शशी वाचत होती, अनेक सूचना करत होती.  तर आपल्या सर्व कामाच्या व्यापातून वेळ काढून मनीषा पांब्रे यांनी ग्रंथाची टंकलेखनाची जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडली.  या सर्व मित्रांच्या, सहकार्‍यांच्या प्रेमळ आग्रहाने हा पत्रप्रपंच वाचकांपर्यंत पोचला.  ते पोचवण्याचे काम 'ग्रंथाली' च्या सर्व मित्रांनी केले.  ग्रंथाचे कव्हर माझे 'उपरा'च्या पहिल्या वाचनापासूनच मित्र, जगप्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांनी केले आहे.  सुभाष एक अवलिया माणूस.  फार मोठा कलावंत.  या ग्रंथाला त्याने मुखपृष्ठ करावे असे मला वाटले. शब्द टाकावा की नको अशा मनस्थितीत होतो.  आणि म्हटलं पाहूया, तो घरातला तर आहे.  आम्ही शिव्या तर एकमेकांना पूर्वीपासूनच देत आलोय.  सुभाष अत्यंत दिलदार माणूस.  एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने मुखपृष्ठ करण्याचे मान्य केले.  मी त्याचा आणि उल्लेख केलेल्या सर्वच माझ्याच माणसांचे आभार मानतो.  सकाळी सकाळी लेखन सुरू असले तरी कोणासही दाद न देता मांडीवर बसून मी कसे लिहितो आहे हे पाहण्याचा हट्ट करणारी माझी नात श्रावस्ती असो की कुतूहलाने पाहणारी यशवंत, लुम्बीनी ही नातवंडे असोत, सर्वांनीच या लेखनाला प्रोत्साहित केले.  कारण मी अपघातानंतर हात गमावलाच होता.  तो लिहू लागला याचाच आनंद कुटुंबातल्या सर्वांना होता.  या माझ्या ग्रंथाचा उपयोग वाचकांना आणि त्यातही तरुण वाचकांना व्हावा ही माफक अपेक्षा.

नव्या पिढीने बदलत्या जीवनपद्धतीबरोबरच, बदलत्या जागतिकीकरणा-बरोबर यशवंतरावांनी मांडलेला, टोकाचा उजवा आणि टोकाचा डावा या दोन्ही टोकांना सोडून, कृषी औद्योगिक समाजाचा, समाजवादाचा जो विचार मांडला तो विचार कदाचित आपल्या देशाला अधिक मार्गदर्शक ठरू शकेल.  आपल्या देशाने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे.  खाजगी गुंतवणूक, सार्वजनिक गुंतवणूक, शासनाची गुंतवणूक, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहकारातली गुंतवणूक करण्याची तरतूद केली आहे.  तराजूचा काटा एका कोणाही टोकाकडे झुकू लागला की भारतीय जनता तो मध्यावर आणते.  केवळ औद्योगिकीकरण आणि केवळ शेती असे न करता बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग स्वीकारला तर तरुण पिढीच्या पुढचे प्रश्न सुटतील का, असाही विचार हे लिहीत असताना मनामध्ये होता.  यशवंतरावांच्या आख्यायिका सातारा जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यात पसरलेल्या आहेत.  झोपडीपासून बंगल्यापर्यंत आमची सर्वांची घरे ही चव्हाणसाहेबांची होती.  सगळ्यांच्या दुखल्याखुपल्यात घरातला बनून जगणारा एक कर्ता माणूस आज आमच्यात नाही.  परंतु त्यांच्या आठवणी आणि आख्यायिका या आमच्या घराघरात आहेत.  सर्व तरुण मुलांना सुप्रियाच्या मार्फत मी चव्हाणसाहेबांचा विचार सांगण्याचा प्रयत्‍न केला आहे.

लक्ष्मण माने
समता, १०, ब
करंजे, सातारा - ४१५००१
दिनांक १४ नोव्हेंबर २०१२
पं. जवाहरलाल नेहरू जयंती