यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-(आठवणींची साठवण)

आठवणींची साठवण

आठवणी यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या आणि कथन करणारे लक्ष्मण माने.  उत्तम पुस्तक होण्यासाठी आणखी काय हवे आहे ?  या संयोगाचा परिणाम तोच झाला आहे.  एक उत्तम निर्मिती आपल्या हाती येते आहे.

यात माने यांनी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पत्ररूपाने या आठवणी सादर केल्या आहेत.  खरे तर, हे कथन आहे सुप्रियाच्या पिढीसाठी.  सुप्रिया निमित्तमात्र आहे.

चव्हाणसाहेबांची पिढी व सुप्रियाची पिढी यात दोन पिढ्यांचे अंतर आहे. आजोबांच्या आणि नातवांच्या पिढीत असते तसे.  चव्हाणसाहेबांचे व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व ऐकले आहे, पण पाहिले, अनुभवले नाही, अशी ही पिढी आहे.  ते जाणून घेण्याची या पिढीला जिज्ञासा आहे.  माने यांच्या लिखाणात ही जिज्ञासा शमविण्याची क्षमता आहे.

चव्हाणसाहेबांच्या सावलीत वाढलेल्या व सुप्रियाचे बोट धरलेल्या पिढीचे लक्ष्मणराव प्रतिनिधी आहेत.

यशवंतरावांचा जीवनपट विस्तीर्ण आहे व विविध पैलूंनी नटलेला आहे.  त्यातील काही काळ व काही पैलू माने यांच्या वाट्याला आले आहेत.  ते त्यांनी अत्यंत संवेदनशील मनाने टिपले आहेत व पत्ररूपाने सादर केले आहेत.

महात्वा गांधींनी उत्तम भाषणाची व्याख्या केली आहे.  ''तुमच्याजवळ सांगण्यासारखे काहीतरी असावे व ते तुम्ही मनःपूर्वक सांगितले की उत्तम भाषण होते.''  ही व्याख्या या लिखाणालाही लागू होते.  माने यांच्याजवळ लिहिण्यासारखे बरेच काही होते आणि त्यांनी ते मनःपूर्वक लिहिल्यामुळे उत्तम झाले आहे.

यशवंतरावांनी लक्ष्मण माने यांचे आत्मकथन 'उपरा' वाचले.  त्यात माने यांच्या वाट्याला आलेल्या परिस्थितीमुळे भारताच्या पार्लमेंटवर बॉम्ब टाकावा वाटते, असे मानेंनी लिहिले आहे.  हे वाचून चव्हाणसाहेब हादरले, ते म्हणाले, 'मी एवढी वर्षे पार्लमेंटमध्ये आहे.  देशाने प्रगती केली असे आपण मानतो.  पण माझ्याच मतदारसंघातील, माझ्याच सातारा गावातील एक भटक्या-विमुक्त जातीतील तरुणाला पार्लमेंटवर बॉम्ब टाकावासा वाटतो.  या तरुणाचे मनोगत आपण समजावून घेतले पाहिजे. चव्हाणसाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन मानेंशी संवाद साधला.  त्यांचे मनोगत समजावून घेतले.  या चर्चेच्या प्रक्रियेत त्यांचा स्नेहबंध जोडला गेला.  ज्या दुर्मिळ लोकांच्या वाट्याला यशवंतराव एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून आले त्यात माने कुटुंबीय आहेत.  सौ. शशी माने ही मुलगी व लक्ष्मणराव जावई, असा हा स्नेहबंध विकसित होत गेला.  चव्हाणसाहेबांचे जावई म्हणजे महाराष्ट्राचे जावई, हे माने यांचे महाराष्ट्राशी नाते, असे आम्ही सर्व चव्हाणप्रेमी मानतो व लक्ष्मरणरावांशी तसेच वागतो.  जावई मधूनच व्यवस्थेवर रागावतो, चिडचिड करतो.  समाजव्यवस्थेचे प्रतिनिधी समजून शरद पवारांसह आम्हा सगळ्यांना समक्ष, मनसोक्त शिव्या घालतो.  शिव्या पेपरात छापूनही आणतो.  आम्ही सगळे गप्पगुमान ऐकून घेतो.  काय करणार, जावई पडला ना !  आणि तो साहेबांचा.

सध्याच्या पिढीसाठी आवश्यक व उपयुक्त असे चव्हाणसाहेबांच्या - वरील लिखाण या निमित्ताने झाले आहे.  यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने निर्माण झालेला हा महत्त्वाचा दस्तऐवज लक्ष्मण माने यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

ही पत्ररूप आठवणींचा साठवण मराठी वाचकांच्या सदैव लक्षात राहील.

- विनायक पाटील