थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (17)

अशा या वैशिष्ट्याने परिपुर्ण असलेले २० वे शतक संपवून वैज्ञानीक विकासासह आम्ही २१ व्या शतकांत प्रवेश करुन पुढचे एक-एक दशक संपवायला सुरवात केली आहे. २१ व्या शतकांत प्रवेश करण्यापुर्वीचे दशक आम्ही नव्या शतकांत  काय घेवून जाणार आहोत याचा निश्चित आराखडा पुसट करण्यांत व्यर्थ शक्तीपात केल्याचे जाणवू लागले आहे. यामुळेच २० व्या शतकाची आठवण करत असताना आज अनुभवत असलेले वास्तव आपणापुढे मांडत आहे.

२० व्या शतकांत आम्ही जे-जे जोपासले ते-ते आता तासातसाला अज्ञात शक्ती उध्वस्त करत आहे.

देशाच्या प्रारगणांत काढलेली संस्कराची प्रदिर्घ रांगोळी कोणी तरी विस्कटत आहे. जिवनाच्या प्रवासासांठी अचूक सुखकर महामार्ग तयार करुन ठेवले असले तरी आज जपून पावलं टाकण्यासाठी पायवाट देखील दिसत नाही. ज्यांच्याकडे मान उंचावून पहावं अशी हिमालयाच्या उंचीची व्यक्तीमहत्व असलेली माणसं दिसत नाहीत. आणि वाकून ज्यांच्या पायाला स्पर्ष करावा असे सतपुरुषही उरले नाहीत. ज्यांची आराधना केली त्यांची संभवना होत आहे. ज्यांच्या गुणांशी आम्ही नतमस्तक झालो त्यांच्याशी आज प्रतारणा होत आहे. मूल्यांकीत आचरण  शुन्यांकीत झाले आहे. जिवनमुल्यांचा अर्थच बदलल्याने आदर्श होत त्यांच निर्माल्य झाले आहे. माणसातील माणूसकी वितळली आणि त्यांची यंत्र झाली आहेत. जंगलातील पशु देखील सुखासमाधाने जगत आहेत. सिंह, वाघ अशा सारख्या हिंस्त्र पशूनी सिंह सिंहावर आणि वाघ वाघांवर जीवघेणा हल्ला करत असल्याचे ऐकीवात नाही. समूहाने निसर्गधर्म पाळतच आपले जिवन आपल्या मर्यादेतच घालवत असतात. पण या सुधारलेल्या २१ व्या शतकांतील माणूस मात्र माणसाला जगू देत नाही. आज माणूसच माणसाला मारतो आहे व माणूसच माणसाचे तुकडे करत आहे. जो येतो तो खणताना दिसतो-उकरताना दिसतो. जो येतो तो काही तरी मागतो, हात पसरतो. घेणा-यांचे हात उदंड झाले आहेत आणि या गर्दींत देणा-याचा हात मात्र दिसतही नाही सापडतही नाही. माणसाने माणसासाठी निर्माण केलेल्या वास्तूसह एकमेकांना उद्वस्त करणा-या या जगात उद्या मानव जातीचे काय होईल याची चिंता करायला कोणी राहिल्याचे दिसत नाही. आता आम्ही वारंवार स्वत:चा विचार करतो तर कधी-कधी देशाचा विचार करतो. घरातले-मनातले देव्हारे उतरले गेलेत व शेजारधर्म फ्रीजमध्ये फ्रीज झाला आहे. नाक्या नाक्या वरची श्रद्धास्थाने जीर्ण होवून बार मुजरा सुकाळ झाला आहे. मुलाला मॉडेल व्हायचं आहे तर मुलीला सौर्द्यस्पर्धेत भाग घ्यायचा आहे. देशातून गेलेले ब्रीटीश रुप पालटून घरां घरांत शिरले आहेत. आता वरण भाताची चव कळत नाही. देश हा देश राहीला नाही व वेश हा वेश राहिला नाही. आई वडीलांचा मान राहीला नाही व कुटूंबाची शान राहीली नाही. प्रत्येकाला कसंही करुन काहीही करुन कोणाचाही कसलाही पैसा हवा आहे. आणि पैशाशिवाय प्रतिष्ठा वाटत नाही. तुम्ही जोपासलेला राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक परंपरा टिकविण्याचा एकीकडे प्रयत्न होत असता दुसरीकडे अशा दुष्प्रवृत्ती वाढत आहेत. आपण दिलेले संस्कार आम्ही पाळत आलो. म्हणूनच परंपरेचे व संस्काराचे मोल आम्हास कळू शकले. हीच परंपरा पुढच्या पीढीला आत्मसात करण्याकरीताचे महत्वाचे काम कसे पार पाडायचे याच संभ्रमात आजची कार्यरत पीढी सापडली आहे. याचाच परिणाम आम्ही वारंवार सगळीकडे घोटाळे ऐकत आहोत, चारा घोटाळा, डाळ घोटाळा, संरक्षण शस्त्र खरेदीत घोटाळा, पतसंस्थेत घोटाळा, हवाला घोटाळा, टेलीफोन घोटाळा, एस. टी.त घोटाळा, ७/१२ त घोटाळा, दुध संघात घोटाळा, वीज मंडळात घोटाळा, जातीच्या सर्टीफिकेटमध्ये घोटाळा, शाळेच्या सर्टीफिकेटमध्ये घोटाळा, सवलतीचा पास देताना घोटाळा, सरकारी स्टॅम्प छापताना घोटाळा, नोटा छापताना घोटाळा, सरकार देणा-या सरकार पाडणा-या आमदारांत, खासदारांत घोटाळा, साखरेत घोटाळा, गरीबाला मिळणा-या अनुदानांत घोटाळा, विद्यार्थ्याना द्यायच्या खाऊत घोटाळा, विकायला मांडलेल्या वस्तूत घोटाळा, परिक्षेत राज्यात पहिला येणा-या विद्यार्थ्याला नापस करता येते व पास होणा-या अनेकांना नापासाच्या यादीत ठेवता येते. पैसा नसतानाही योजना आखल्या जावू शकतात सरकारी अनुदान न देताच बजेट संपते. गंगेच्या प्रवाह नसला तरी विकासगंगा दारांत आणण्याच्या आश्वासनाची खैरात होते. दुस-याची चूक दाखवणारा तुरुंगात जातो. लूटमार होते. खूनखराबी होते. बॉम्बेस्फोट होतात. लोकशाहीचे पवीत्र मंदीर असलेले लोकसभागृह उडवण्याचा प्रयत्न होतो. तहलकाद्वारे अप्रीय घटना लाखोंच्या नजरेसमोर येवूनही आपण काहीच चूकत नसल्याचा भास यशस्वी केला जातो. जाती-जातीत-धर्माधर्मात तेढ वाढवून हत्या जाळपोळ होतात. याबाबींना खंड नाही व उद्याकरीता दिलासा नाही.