थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (15)

धाकटा बाळ
अनुयायी आश्रम, विरंगुळा परिसर,
कृष्णा काठ, कराड, जि. सातारा,
महाराष्ट्र, भारत.
पि. – ०२५०११०१९८५०
दिनांक : ०१-०१-२०११


प्रति,
वंदनीय सर्वपीतृ प्रमुख ‘साहेब’
“विरंगुळा” इंद्रप्रस्थनगर,
कराड आळी, कृष्णाकाठ शेजारी,
जि. ध्रुवतारा, तारांगण महाराष्ट्र,
नभांगण भारत,
पिन कोड नं. ०१९८५०२५०११.

आपले ५ डिसेंबरचे पत्र मिळाले. अपेक्षे प्रमाणे आपण मला पत्राद्वारे शंकासमस्या कळवून आपले मार्गदर्शन मिळवण्याबाबत परवानगी दिलीत याबद्दल आनंद वाटला. आपण कळवल्या प्रमाणे तुमचे पत्र मला १२ डिसेंबरलाच हाती पडले. आपल्या येथील वास्तव्यांत आपण कामाच्या नियोजनांस प्रथम प्राधान्य देत असत. तीच शिस्त आजही निवृत्तीकाळांत आपण पाळत आहांत हे आम्हाला प्रेरणा देणारे वास्तव आम्ही स्विकारतो. आपले पत्र हाती मिळताच उत्सुकतेने वाचण्यांस सुरुवात केली आणि आपण पत्राच्या सुरूवातीलाच माझ्यावर सोपवलेली कामगीरी पार पाडली. अनुयायी आश्रमांत १२ डिसेंबरला पंढरपुरच्या आषाढी एकादशीच्या गर्दीसारखीच गर्दी होती. साहेबांच्या वाढदिवसानिमीत्त येथे शुभेच्छा देवून संकल्प करण्याचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. अनुयायी आश्रमाच्यावतीने साहेबांना शुभेच्छा देण्याचा क्रमही पहिलाच असतो. आमच्यातील ज्येष्ठ अनुयायाला ही कामगीरी पार पाडण्याची जबाबदारी दिली जात असते. आपल्या शुभेच्छा प्राधान्याने प्रथम पोहचत्या करण्याचा माझा प्रस्ताव सर्वांनीच मान्य केला व विशेष आनंदाची बाब म्हणजे ही कामगीरीही सर्वांनी मोठ्या आनंदाने माझ्यावर सोपवली. अनुयायी आश्रमातील साहेबांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम साहेबांच्या उपस्थितीतच करण्याचा आमचा निर्णय होता. तथापि राज्यातील दुष्काळ परिस्थितीच्या निवारण कार्यात सर्व अनुयायी गुंतले असल्याने आजचा वाढदिवस अनुयायांच्या, हितचिंतकांच्या सहवासात घालविण्या ऐवजी, साहेबांनी अनुयायी आश्रमाच्या महत्वाच्या शाखेवरच वेळ घालविण्याचे ठरविल्याचे आम्हांस सांगण्यात आले. आमच्या अनुयायी आश्रमातील साहेबांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम सुरु होत असतांना या परिसरांत संगीत स्वरांच्या प्रसन्न वातावरणाने आसमंत व्यापून टाकला होता. व्यासपीठावरील औपचारीकता पुर्ण होताच अनुयायी आश्रमाच्यावतीने शुभेच्छा देण्याकरीता आमच्या प्रतिनिधीस पाचारण करण्यांत आले. शुभेच्छा देण्याची कामगीरी माझ्यावर सोपवलेली असल्याने मला ही संधी मिळाली. मी प्रत्यक्ष व्यासपीठावर पोहचलो तरीही घोषीत कामासाठी अद्याप कोणी दुसराच येणार असल्याच्या भावनेने सगळ्यांच्या नजरा फीरत होत्या. कारण व्यासपीठावर वावरणारा मी तसा नवखाच होतो. व्यासपीठावर पोहचताच मी प्रथम आपण दिलेल्या शुभेच्छा जाहीर केल्या. आपण पाठविलेल्या शुभेच्छा मी येथे जाहिर केल्या असल्या तरी आज साहेब ज्या महत्वाच्या शाखेवर आहेत तेथे साहेबांशी थेट संपर्कात येणा-या आमच्या वरिष्ठ अनुयायांकडे याच शुभेच्छा सुपूर्द करुन पोहचत्या करण्याची जबाबदारी दिली. आमचा येथील कार्यक्रम चालू असतानाच या शुभेच्छा साहेबांना पोहचत्या झाल्याचे मला सांगण्यात आले व मी कर्तव्य मुक्त झाल्याचे समाधान वाटले. अनुयायी आश्रमाच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा दिल्याच पण त्यापुर्वी तुमच्या शुभेच्छा जाहिर करताना तुमच्या पत्राची सर्वांना माहिती दिली. त्या दिवशी आमच्या संपूर्ण परिसरांत व अनुयायी कुटूंबात आपण पाठवलेल्या शुभेच्छांचीच चर्चा होती. संपूर्ण परिसर तुमच्या इथल्या वास्तव्याच्या आठवणीत रमून गेला होता. तो दिवस आम्हा सर्वांनाच उत्साही व नव्या प्रेरणेचा जाणवला. शुभेच्छा स्विकारतांना साहेबांनी कृतज्ञतापुर्वक आपणांस विनम्र अभिवादन करुन नव्याने कार्यपुर्तीचा संकल्प केला असल्याचे मला सांगण्यांत आले.