यशोधन-२३

आम्ही आमच्यामध्ये नाना त-हेच्या सामाजिक भेदाभेदांची मोठी थोरली उतरंड रचली म्हणून हिंदुस्थान दुबळा झाला. हिंदुस्थानचा दुबळेपणा, हिंदुस्थानचा मागासलेपणा हा या उतरंडीचा परिणाम आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. आम्ही खूप खटपट करतो आहोत आर्थिक क्रांती करावयाची, औद्योगिक क्रांती करावयाची. हातात आलेल्या मोठ्या थोरल्या स्वातंत्र्याच्या शक्तीचा, लोकशाहीच्या सत्तेचा वापर करावयाचा प्रयत्न चालला आहे. पण गाडा अजूनही काही फार पुढे जात नाही. याचे कारण समाजातील ही उतरंड आहे. उतरंड हा शब्द मी मुद्दामच वापरीत आहे. कारण आम्ही सर्व एकमेकांच्या डोक्यावर बसलो आहोत आणि वरचा जो खालच्याच्या डोक्यावर बसला आहे, तो नुसता बसलेला नाही तर तो त्याचा गळा धरून बसला आहे, त्याचे तोंड बंद करून बसला आहे. खालच्याला काही वावच नाही. समाजामध्ये आम्ही ही जी उच्च-नीचतेची, जातिभेदांची, वर्णभेदांची उतरंड रचलेली आहे, ती केवळ एकाच प्रांतात रचलेली नसून सर्व हिंदुस्थानभर रचलेली आहे. ही उतरंड मोडण्याचे काम ज्या दिवशी आपण करू, त्या दिवशी आपण खरी क्रांती केली असे मी म्हणेन.
 
पंढरीच्या वारक-याला जागा करून चंद्रभागेच्या वाळवंटावर जातभेद काही नाही, असेच जणू घोषित करीत भागवत धर्माचा झेंडा उभा राहिला. माझ्या कल्पनेने तो सुधारणेचा झेंडा होता. आजही मी पंढरपूरच्या मंदिरात जातो तेव्हा याच भावनेने जातो. चंद्रभागेच्या वाळवंटावर महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांतला ब्राह्मण, मराठा, माळी, न्हावी, भंगी, कुभांर, सुतार, महार- मी हे वेगवेगळे जातिवाचक शब्द वापरतो त्यांचा उल्लेख केला पाहिजे म्हणून वापरतो, मला त्याची काही हौस नाही- हे सगळे तेथे एका मेळ्यामध्ये आले आणि त्यांनी पंढरीचा झेंडा, भागवत धर्माचा झेंडा उभा केला. त्यामध्ये जसे तुकाराम झाले, नामदेव झाले, रामदास झाले, ज्ञानेश्वर झाले, तसेच चोखा मेळा, गोरा कुंभार आणि सावता माळी हेही झाले. खरे म्हणजे सामाजिक क्रांतीच व्हावयास पाहिजे होती अशा वेळी; पण आजही आम्ही असे पाहतो की, सावता माळी फक्त माळ्यांचा संत आहे, नामदेव फक्त शिप्यांचा संत आहे, चोखा मेळा फक्त महारांचा संत आहे, गोरा कुंभार फक्त कुंभारांचा संत आहे. अशीच वाटणी का आम्ही नेहमी करणार आहोत? शिंपी समाजाला नाव देताना नामदेव शिंपी समाज असे म्हणतात. नामदेवांचे एवढे मोठे विश्वव्यापी काम! परंतु आज आम्ही काय त्यांना एका शिंपी समाजाचे प्रतीक मानणार? मी शिंपी समाजाला दोष देत नाही. पण आमची प्रवृत्ती कशी आहे पाहा. जोतिबा फुल्यांनी सामाजिक क्रांतीचा संदेश दिला. त्या संदशातून डॉ. आंबेडकर यांच्यासारखी कर्तृत्त्ववान, धगधगती माणसे निर्माण झाली. एक मोठी शक्ती निर्माण झाली; पण महात्मा फुले फक्त माळ्यांचे, डॉ. आंबेडकर फक्त बौध्दांचे, गांधी फक्त गुजराथ्यांचे, टिळक फक्त ब्राह्मणांचे, शिवाजीमहाराज फक्त मराठ्यांचे अशा प्रकारे जर आम्ही या महापुरूषांच्या वाटण्या केल्या, तर या हिंदुस्थानमध्ये सामाजिक क्रांती कधीच होणार नाही.
 
ब्राह्मण ब्राह्मणांपुरता विचार करतो. मराठा मराठ्यांपुरता विचार करतो, महार महारांपुरता विचार करतो, माळी माळ्यांपुरता विचार तरतो. हे मासले मी केवळ नमुन्यादाखल सांगितले. जातीयवादाच्या या विषारी विचारापासून आपण महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे. जातीयवादाचा हा विचारच समूळ नष्ट केला पाहिजे, तेव्हाच महाराष्ट्राचे सामाजिक मन एकजिनसी होईल; परंतु हे कार्य आपण एका दिवसात, एका रात्रीत करू शकणार नाही. त्यासाठी विचारी माणसांनी विचारपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय हे घडून येणार नाही.
 
जो देश आपला इतिहास विसरतो, त्याला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची शिक्षा मिळते. आम्हांला आमच्या देशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावयाची नाही. आम्हांला महापुरूष निर्माण करावयाचे आहेत. शेकडो वेळा दुस-यांचे हल्ले पत्करून त्यांची आम्हांला आता गुलामी करावयाची नाही; ज्ञानाला बंदिखान्यात ठेवणारा आणि चित्तामध्ये भय निर्माण करणारा समाज यापुढे आम्हांला निर्माण करावयाचा नाही.