यशोधन-२२

ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाच समाजाचे जीवन समर्थ होत नाही, उन्नत होत नाही, विकसित होत नाही. ज्ञानभाषा एक आणि लोकभाषा दुसरी, अशी हिंदुस्थानच्या जीवनाची परंपरागत कहाणी आहे. ऋषीमुनींची आणी पंडितांची ज्ञानभाषा होती संस्कृत. कारण ती देवभाषा होती आणि जनसामान्यांची भाषा होती प्राकृत. हे फार पूर्वी; पण नंतरही तेच झाले. मुसलमानी अमलात ज्ञानभाषा उर्दू, फारसी, अरबी जी काही असेल ती झाली. त्यानंतर इंग्रज आले आणि या देशातील ज्ञानभाषा इंग्रजी बनली. लोकभाषा अशा त-हेने दुर्लक्षित राहिल्यावर लोक शहाणे होणार तरी कसे? आता स्वातंत्र्यानंतर जेव्हा जनजीवन आम्हाला विकसित करावयाचे आहे असे आम्ही म्हणतो, तेव्हाही लोकभाषा ज्ञानभाषा होणार नसेल, तर ज्ञानभाषा हा ज्यांचा मक्ता होता त्यांचेच संस्कार आणि त्यांचेच साम्राज्य सांस्कृतिक जीवनामध्ये निर्माण होईल.
 
देशातील लेखक, देशातील विचारवंत, देशातील कलावंत, शास्त्रज्ञ आणि संशोधक यांच्या प्रयत्नाने निर्माण होणारे जे विचारधन आहे, ते खरे म्हणजे समाजाचे फार मोठे धन आहे असे मी मानतो. ते असले म्हणजे देश ओळखला जातो; समाजाचे जीवन प्रवाही राहते. समाज जिवंत राहतो तो त्याच्याजवळ असणा-या भौतिक सामर्थ्याने नाही, तर त्याच्याजवळ असणा-या सांस्कृतिक मूल्यांवर व विचारधनांवर!

आपल्याला कदाचित कल्पना असेल की, कामाची व्याप्ती जितकी जास्त तितकी त्याची खोली कमी असते. निसर्गाचाच हा नियम आहे.

वृत्तपत्रांनी सदासर्वकाळ सरकारची स्तुती करावी असे नव्हे. संसदीय लोकशाही वृत्तपत्रस्वातंत्र्य पवित्र मानले जाते आणि डोळ्यांत तेल घालून त्याचे रक्षण करण्यात येते. यामुळे सार्वजनिक महत्त्वाच्या व हिताच्या सर्व प्रश्नांवर स्पष्ट व मुक्तपणे चर्चा होऊ शकते.

कधी साहित्यिकांना राजकारण्यांना मार्गदर्शन करतात, तर कधी राजकारणी साहित्यिकांना मार्गदर्शन करतात, असे हे सर्वत्र चालत आलेले आहे. तेव्हा माझ्या दृष्टीने मला जो महत्त्वाचा विचार आपल्याला सांगावयाचा आहे तो हा की, एक अनुभूती आणि एक विचार राबविण्याचे हे जे काम आहे ते अविभाज्य आहे.
 
जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांशी अधिक निकटचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय आणि जीवनामध्ये असलेले श्लेष आणि काव्य यांच्याशी अधिक जवळीक केल्याशिवाय साहित्यात फारशी भर कोणी घालू शकेल, असे मला वाटत नाही.
 
समाजातील विविध गटांतील लोकांचे प्रश्न वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून समजावून घेऊन सोडविण्याचे व्रत राज्याने घ्यावे. सामाजिक उदारता अंगी बाणल्याखेरीज हे व्रत पार पडणार नाही. पूजा गुणांची, जातीची नव्हे असे मी म्हणतो ते याचकरता!
 
आपले हे महाराष्ट्र राज्य विविधतेने नटलेले आहे. ही विविधता निसर्गाच्या रचनेत जशी आहे, तशी माणसांतसुध्दा आहे. उत्तरेस सातपुडा आणि पश्चिमेस सह्याद्री यांची उत्तुंग शिखरे व त्यांच्या उतरणीतील घनदाट जंगले यांनी या भागास भव्योदात्त सौंर्द्य प्राप्त झाले आहे, तर वर्धावैनगंगेच्या खो-यात जागोजाग असलेली जलाशये व पळसाच्या लाल फुलांनी डवरलेली राने मनाला प्रसन्नता आणतात. कोकणचा किनारा अथांग पश्चिम सागराचे दर्शन घडवितो, तर गोदेच्या पाण्याने पुनीत व समृध्द झालेली मराठवाड्याची भूमी महाराष्ट्राच्या तेजस्वी भूतकाळाची व संस्कृतीची आठवण करून देतो. नागपूरच्या परिसरात भारतातच केवळ नव्हे, तर सर्व आशियात उत्तम म्हणून नावाजलेली संत्री पिकतात, तर रत्नागिरीकडे भारतात ज्याच्या तोडीचा दुसरा आंबा नाही तो हापूस आंबा अमाप पिकतो. विदर्भ-मराठवाड्याच्या काळ्याभोर जमिनीत कापूस भरघोस फुलतो, तर नगर-सोलापूर-कोल्हापूर भागात पिकणारा रसदार ऊस सर्वांचे तोंड गोड करतो. निरनिराळ्या भागांतील लोकांच्या बाबतीतही ही विविधता आहे. कोकोणपट्टीतील माणसाचे अनुनासिक उच्चार ऐकून देशावरच्या माणसाला मौज वाटते, तर खानदेश-व-हाडचा माणूस एकविशिष्ट हेल काढून बोलू लागला की, सांगली-कोल्हापूरकडील माणसांच्या चेह-यावर स्मिताची रेषा न झळकली तरच आश्चर्य; पण या विविधतेनेच महाराष्ट्रातील जीवनाचे सौंर्द्य साठवलेले आहे. अशी विविधता नसेल, तर जीवन नीरस व रंगहीन होईल.