यशोधन-२०

हिंदुस्थानची कूस भाग्याची कूस आहे. जेव्ह जेव्हा संकटे निर्माण होतात तेव्हा तेव्हा त्या संकटांना तोंड देणारे सुपुत्र तिच्या उदरी जन्माला येतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.
 
चीनच्या हातातला पत्ता आता आम्हांला समजला आहे. तो सांगत असे की, माझ्या हातात मैत्रीचा पत्ता आहे म्हणून आम्हीही आमच्या हातात मैत्रीचा पत्ता धरून होतो. आता त्याने आपल्या हातातला पत्ता उघडा केला आहे. त्याच्या पत्त्यावर मैत्री लिहिलेली नाही. त्या पत्त्यावर समशेर कोरलेली आहे, बंदूक कोरलेली आहे, आक्रमण रेखाटलेले आहे. आता आम्हाला पूर्वीच्या मैत्रीच्या पत्त्याऐवजी शस्त्रास्त्रांचा पत्ता आमच्या हातामध्ये घेतला पाहिजे; पण आमच्या हातात मैत्रीचा पत्ता होता म्हणजे बावळटपणाचा पत्ता होता असे समजण्याचे कारण नाही. आमची नीती, फुलासारखे वागतील त्यांच्याशी फुलासारखे वागवयाचे आणि वज्रासारखे वागतील त्यांच्याशी वज्रासारखे वागावयाचे, ही आहे.
 
लढाईसाठी ज्या वेळी देश तयारी करतो त्या वेळी मनगट लोखंडासारखे बळकट करावे लागते, त्याचप्रमाणे मनही लोखंडासारखे बळकट करावे लागते.
 
शेजा-याला वैरी करून नवा संसार मांडणारी शहाणी माणसे अजून मी या जगात पाहिलेली नाहीत.
 
दुस-या देशाच्या जीवनातील संकटाच्या राशी ह्या आक्रमकांच्या नेहमीच संधी असतात.
 
सर्वनाशाची लढाई होण्याचा हिंदुस्थानमध्ये संभव निर्माण झाला, तर हिंदुस्थानला मदत करणारा शांततेचा हिंदुस्थानचा जो सिध्दांत आहे, त्यासंबंधीची त्याची निष्ठा हेच त्याचे सगळ्यात मोठे हत्यार आहे, हे मी आपणाला सांगू इच्छितो. सगळ्या अणुबॉम्बना पचविणारी ही जी शक्ती आपल्या विचारांमध्ये आणि श्रध्देमध्ये आहे तिचे आपण रक्षण केले पाहिजे.
 
लढाईकरिता लढाई हा विचार मानवजातीच्या प्रगतीचे लक्षण आहे असे मी मानत नाही. प्रसंग पडला तर छाती पुढे काढून, मान ताठ ठेवून, प्राण जाईपर्यंत लढले पाहिजे आणि समोरून चालून येणा-या शत्रूचा नि:पात केला पाहिजे; परंतु समोर शत्रू नसेल तेव्हा आपली सर्व शक्ती, आपला सर्व निर्धार, जनसेवेचे व्रत हातात धरून, जेणेकरून जनतेचे कल्याण साधेल अशा प्रकारचे सामर्थ्य वाढविण्याच्या कामी आपण लावला पाहिजे.
 
महाराष्ट्रात उद्योगीकरणाचा पुरस्कार मी मानतो, त्याप्रमाने देशाच्या रक्षणार्थ लष्करीकरणाचा आग्रह मी धरतो. मला आयुबखान निर्माण करावयाचा आहे, मला आयुबखान व्हावयाचे आहे अशी यावर टीका होते. पण भारतात आयुबखान निर्माण होऊ नयेत, म्हणून तर लष्करीकरणाचा पुरस्कार करीत असतो. बहुजनसमाजातून सैनिक व लष्करी अधिकारी येऊ लागले की, त्यांचा सामान्यांच्या जीवनाशी संबंध राहील व त्यामुळे लष्करात कधीच आयुबखान निर्माण होऊ शकणार नाही. सर्वांना लष्करी शिक्षण द्यावे असे माझे मत आहे.
 
दान द्यावयाचे असेल, तर ते उत्कृष्ट गोष्टीचे द्यावे लागते. देशासाठी द्यावयाचे दानही असेच असले पाहिजे. नको असलेली गोष्ट दान देणे, याला दान म्हणत नाहीत.

आमची बाणेदारपणाची, आत्मयज्ञाची, बलिदानाची परंपरा आहे. जे आक्रमक येथे आले त्यांना आमच्याशी समरस तरी व्हावे लागले, किंवा खुषीने येथून निघून तरी जावे लागले.
 
निव्वळ पैशाने लढाई जिंकता आली असती तर शस्त्रांचे कारखाने काढण्याऐवजी आपण टांकसाळीच काढल्या असत्या.