यशोधन-१९

आपली आर्थिक प्रगती आणि आपले संरक्षण हे दोन्ही प्रश्न एकमेकांशी संलग्न आहेत, एवढेच नव्हे तर ते या अलिप्ततेच्या धोरणाशी अत्यंत निगडित आहेत. आर्थिक प्रगतीच्या सगळ्या क्षेत्रांत शिरल्याशिवाय हिंदुस्थानच्या संरक्षणाची तुम्हांला तयारी करताच येणार नाही.
 
आक्रमाची मला भीती वाटत नाही. पण भीती वाटते ती एवढीच की, तुमचे-आमचे मन दुबळे बनेल की काय? तुमचे-आमचे मन दुफळीने फुटून जाईल की काय? ते होता कामा नये. एवढी शक्ती जर आपण या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निर्माण करू शकलो, तर दुनियेतल्या तोफांची, विमानांची किंवा अँटम बॉम्बची शक्तीच काय, पण इतर कोणतीही शक्ती हिंदुस्थानचा पराभव करू शकणार नाही, असा विश्वास आहे.
 
आक्रमकाने दिल्ली काबीज केली की, हिंदुस्थान त्याच्या ताब्यात जात असे. जो आक्रमक दिल्लीमध्ये आपल्या नावाची ग्वाही फिरवील तो हिंदुस्थानचा बादशाहा बने, असा आतापर्यंतचा मामला होता सबंध देश जिंकण्यासाठी आक्रमण कधीच आमच्याकडे आला नाही. निदान लढाई करून सबंध देश कोणी जिंकला नाही. गावागावामध्ये लढाई झाली आणि आक्रमक एकेक गाव काबीज करीत गेला असे फारसे कधी घडलेले नाही. पंजाबातून आत शिरून आक्रमक दिल्लीमध्ये गेले आणि दिल्लीचे बादशहा झाले. मग ते लोदी असोत. घोरी असोत किंवा इतर कोणी असोत; परंतु आज हिमालयाच्या एका कोप-यात परकीयांच्या सैन्याने पाऊल ठेवताच सबंध हिंदुस्थान बिजली चमकल्यासारखा जागा झाला आहे. हा बदललेला हिंदुस्थान एक हिंदुस्थान आहे, जागृत हिंदुस्थान आहे.
 
देशाचे रक्षण करावयाचे म्हणजे काय हिमालयाचे रक्षण करावयाचे, की या देशातील गरिबीचे आणि भूकमारीचे रक्षण करावयाचे? या देशाचे रक्षण करावयाचे याचा अर्थ माझ्या मते असाली, या देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही नवीन आशा निर्माण झाल्या आहेत, काही नवीन मूल्ये निर्माण झाली आहेत, काही नवीन अधिकार निर्माण झाले आहेत. एक नवा मानव हिंदुस्थानमध्ये बनतो आहे. लोकशाही समाजवादाच्या दिशेने वाटचाल करणा-या या माणसाचे आपल्याला रक्षण करावयाचे आहे.

संरक्षणाची तयारी करणे याचा अर्थ आमच्या देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीची गती वाढविणे हा आहे. संकट ही एक संधी आहे, या दृष्टीने संकटाकडे पाहण्यास आपण आता शिकले पाहिजे. माझा स्वत:चा अनुभव असा आहे की, संकटासारखी दुसरी संधीच असू शकत नाही. मी तर असे म्हणतो की, संकट आले म्हणजे परमेश्वर संधी घेऊन आपल्याजवळ आला आहे असे समजावे. आलेल्या संकटावर आपण मात केली पाहिजे, त्यावर आपण आरूढ झाले पाहिजे. घोड्यावर जसे आपण स्वार होतो त्याचप्रमाणे संकटाला आपले साधन बनवून, वाहन बनवून पुढे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. संकट म्हणजे एक प्रकारचे आव्हान आहे. नुसते आव्हानच नव्हे, तर संधीही आहे.

देशाची अंतर्गत आर्थिक नीती, देशाची परराष्ट्रनीती आणि देशाची संरक्षणनीती ही परस्परावलंबी असतात. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय नीतीच्या एकाच सूत्राची ही केवळ वेगवेगळी रूपे असतात. कुठल्याही देशाची संरक्षणनीती अलग, परराष्ट्रनीती अलग आणि अंतर्गत आर्थिक नीती अलग अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्या द्शाच् भवितव्य धोक्यात येते.
 
तुझी बलिदानाची नुसती तयारी आम्हांला नको आहे. जीवनामध्ये देण्यासारखे तुझ्याजवळ उत्कष्ट असे काही आहे असे काही असे तू सिध्द करशील तरच बलिदानावर तुझा अधिकार राहील.
 
अणुबॉम्ब हे संरक्षणाचे शस्त्र आहे की सर्वनाशाचे शस्त्र आहे? हिंदुस्थानचा संरक्षणमंत्री या नात्याने माझी जिम्मेदारी ओळखून मी आपल्यासमोर बोलतो आहे. मी आपणाला सांगू इच्छितो की, अणुबॉम्ब हे संरक्षणाचे हत्यार नसून ते सर्वनाशाचे हत्यार आहे.