यशोधन-१८

निव्वळ प्रेमाची भाषा बोलून प्रेम मिळत नाही. निव्वळ शांततेची घोषणा करुन शांतता मिळत नाही. राष्ट्राच्या आणि समाजाच्या जीवनात मैत्री आणि शांतता टिकवायची असेल, तर त्यासाठी मनगटात शक्ती असावी लागते ही गोष्ट खरी असून तिचा अनुभव आपणास येतो आहे. दुनियेच्या बाजारात ही गोष्ट साफ आहे.
 
भाडोत्री सैन्याच्या मदतीने आणि दुस-याकडून उधारीने घेतलेल्या मदतीवर काही छोट्या-मोठ्या गरजा भागतात, पण देशाचा संसार चालविता येत नाही. तुम्ही-आम्हीसुध्दा खाजगी जीवनात उधारउसनवारीने मागून आणतो. पण केव्हा? कधी एखाद्या वेळी अडले म्हणजे; पण सारखा उसनवारीने संसार चालला तर तो फार दिवस टिकत नाही. हिंदुस्थानातील चाळीस कोटी जनतेच्या स्वातंत्र्याचा संसार आपणास उभा करावयाचा असेल, तर तुमची-आमची शक्ती काय आहे व ती कशी वाढेल याचा विचार प्रथम झाला पाहिजे.

स्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरिता लागणा-या शस्त्रांच्या निर्मितीचे सामर्थ्य दुस-याकडे आणि स्वातंत्र्याची मालकी फक्त आमच्याकडे. अशाने स्वातंत्र्याचे रक्षण होत नाही. एवढेच नव्हे तर ते स्वातंत्र्यही खरे नव्हे.

हिंदुस्थानचे रक्षण करावयाचे म्हणजे काय करावयाचे? हिंदुस्थानचे रक्षण करावयाचे याचा अर्थ फक्त आमच्या नागरिकांचे रक्षण करा एवढाच नाही. हिंदुस्थानचे रक्षण करावयाचे याचा अर्थ हिंदुस्थानने ज्या नवीन तत्त्वांची जोपासना केली, ज्या तत्त्वांच्या जोरावर आपले स्वातंत्र्य उभे केले ती तत्त्वे आणि ते स्वातंत्र्य यांचेही आम्हाला रक्षण करावयाचे आहे.
 
आधुनिक लढाईमध्ये सैनिक तर लढतोच, पण त्या सैनिकाच्या पाठीमागे डावपेच आखणारा सेनापती, राज्यकारभार हाकणारा मंत्री, सैनिकाला शस्त्र पुरविणारा तंत्रज्ञ, कारखान्यात कामकरणारा कामगार, शेतीचे उत्पादन वाढविणारा शेतकरी, सरकारी नोकरीत काम करणारा कर्मचारी यांपैकी प्रत्येक जण, शत्रुदेशातील आपापल्या क्षेत्रातील व्यक्तीबरोबर आधुनिक युध्दात लढत असतो. आधुनिक युध्दाचे हे वैशिष्टे्य आहे की, एका देशाची शक्ती, त्याची अर्थव्यवस्था, त्याचे कार्यकौशल्य, त्याची कार्यक्षमता ही दुस-या देशातील शक्तीशी, अर्थव्यवस्थेशी, कार्यकौशल्याशी आणि कार्यक्षमतेशी लढाई करीत असते. एक संपूर्ण शक्ती दुस-या संपूर्ण शक्तीशी लढत असते. तेव्हा ही लढाई दीर्घ काल चालू राहील या दृष्टीनेच तुम्हां-आम्हांला आता तयारी करावयाची आहे. या बाबतीत आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा संदेह असता कामा नये.
 
रणगाडा हे किती अजस्त्र शस्त्र आहे याची आपल्याला कल्पना येईल; पण तंत्रज्ञांनी कितीही नवीन नवीन शस्त्रे शोधून काढली असली, नवे शोध लावून कितीही नव्या सामर्थांना जन्म दिला असला, तरी सगळ्यात मोठे सामर्थ्य शेवटी ईश्वराने निर्माण केले आहे आणि ते म्हणजे मनुष्य आणि त्याची जिद्द. त्याच्याइतके समर्थ शस्त्र आजपर्यंत निर्माण झालेले नाही.
 
आजच्या या कठोर आणि गुंतागुंतीच्या दुनियेमध्ये केवळ दोस्तीसाठी कोणी लढाईस सज्ज होत नाही. मैत्रीसाठी लढाई पत्करणे यासारखा बावळटपणा दुनियेमध्ये दुसरा कोणता असू शकणार नाही. तुम्हांला तुमची तयारी करावयाची असेल, तर मित्रराष्ट्र म्हणवणारी राष्ट्रे तुम्हांला तुमच्या तयारीत मदत करण्याची तयारी दाखवतील. यापेक्षा मैत्रीची व्याख्या आजकाल अधिक लांबलचक होत नाही.