आमचे मुख्यमंत्री -१५

कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर

१९४६ साली कॉंग्रेसने पुन्हा अधिकार ग्रहण केले व श्री. बाळासाहेब खेर ३१ मार्च १९४६ रोजी पुन्हा मुख्यमंत्री (प्रधानमंत्री) झाले. त्यावेळच्या मंत्रिमंडळात श्री. मुरारजी देसाई, डॉ. गिल्डर, एल. एम. पाटील, दिनकरराव देसाई, वैकुंठलाल मेहता, गुलझारीलाल नंदा, जी. डी. वर्तक ही मंडळी होती. बाळासाहेबांनी स्वतःकडे शिक्षणखाते घेतले. बाळासाहेबांच्या पुनर्निवडीचे सर्वांकडून स्वागत झाले. कारण त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळी त्यांनी सुरू केलेल्या कार्यक्रमाला चालना मिळेल हे लोकांना अपेक्षित होते. १९४६ ते १९५२ चा काळ बाळासाहेबांच्या कारकिर्दीतील अभिमालास्पद म्हणण्यास हरकत नाही. कारण समाजसेवा, कायदा, शिक्षण, गरिबांच्या प्रश्नांची जाण ह्याविषयी त्यांना भरीव कार्य करता आले. त्याच वेळी म्हणजे १९४६ मध्ये कॉंग्रेसने तात्पुरते (Interim) सरकार स्थापन केले आणि १५ ऑगस्ट १९४७ ला भारतास स्वातंत्र्य मिळाले.
ह्याच काळात कुळकायदा पारित झाला. शेतीवरील सारा कमी झाला, खावटी कर्जाची सोय झाली. अशा त-हेने शेतकरी व आदिवासी ह्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळाले. शेतकरी कर्ज निवारण कायदा (Agricultural Debt Relief Act), सावकारी कायदा (Money Lenders’ Act), कर्ज तडजोड कायदा(The Debt Adjustment Act), असे शेतक-यांच्या हिताचे कायदे कार्यवाही झाले. तालुकदारी व इनामदारी पध्दत नष्ट झाली(Abolition of Inamdari). त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी व इरिगेशन ह्यांबाबत त्यांनी काही भरीव पावले टाकली.

शिक्षण तर बाळासाहेबांच्या आवडीचा विषय. टाकलेल्या मुलांचे शिक्षण व तांत्रिक शिक्षण ह्यांकरता त्यांनी संस्था स्थापण्यास उत्तेजन दिले. प्राथमिक शिक्षणाकरता माध्यमिक शिक्षण बोर्ड स्थापन केले. वांद्रेकरांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षणाकरता एक समिती नेमली. दुय्यम माध्यमिक शिक्षणाकरता स्वतंत्र बोर्ड स्थापन करून विद्यापिठाऐवजी बोर्डाकडे मॅट्रिकची परीक्षा सुपूर्द केली.

त्यावेळी मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ होते. म्हणून प्रांतातील इतर भागात उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी पुणे (१०-२-१९४८), धारवाड, अहमदाबाद, बडोदा ह्या ठिकाणी स्वतंत्र विद्यापीठांची स्थापना केली. (२६-३-१९२४ रोजी सर चिमणलाल सेटलवाड ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने महाराष्ट्र, गुडराथ, कर्नाटक ह्या विभागाकरता स्वतंत्र विद्यापीठे स्थापन करण्याकरता सहमती दर्शविली होती.) पुणे विद्यापीठाला तर त्यांनी गणेशखिंड म्हणजे गव्हर्नरच्या वास्तूत जागा दिली व त्या ठिकाणी बाबासाहेब जयकरांसारख्या मान्यवर व्यक्तीला कुलगुरू होण्याकरता आमंत्रण दिले. ह्या ऋणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता पुणे विद्यपीठात बाळासाहेबांचा पुतळा उभा केला आहे. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ सन १९१६ मध्ये स्थापन झाले तरी १९४८ पर्यंत त्या विद्यापीठाला शासकीय मान्यता नव्हती. बाळासाहेबांनी १९४९ साली शासकीय मान्यता देऊन सर्व ठिकाणी ह्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळवून दिली. डेक्कन कॉलेज १९३४ पासून बंद होते. ते त्यांनी पदव्युत्तर संस्था म्हणून पुन्हा चालू केले.