आमचे मुख्यमंत्री -१८

8 morarji desai८. श्री. मोरारजी देसाई
त्रिभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
(२४-०४-१९५२ ते ३१-१०-१९५६)

एक कर्तबगार कार्यक्षम व करारी व्यक्ती, परंतु त्यांच्या हट्टी स्वभावामुळे ते लोकप्रिय झाले नाहीत. संतुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या सांगण्यावरून केलेल्या गोळीबारात १०५ लोक मृत्युमुखी पडल्यामुळे ते महाराष्ट्रात मुळीच लोकप्रिय झाले नाहीत.

जन्म व शिक्षण
श्री. मोरारजी यांचा जन्म गुजरातमधील एका सामान्य कुटुंबात भांडेला ह्या खेडेगावी झाला. वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे वडील वारले. श्री. मोरारजींनी त्यांचे सर्व शिक्षण स्वकष्टाने व मिळालेल्या शिष्यवृत्यांच्या साहाय्याने पूर्ण केले. १९१७ साली ते विल्सन महाविद्यालयातून बी. ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १९१८ साली त्यांची डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली. त्या जागी त्यांनी सहा वर्षें काम केले. त्यांना बढती देण्यात झालेला अन्याय व ब्रिटिश शासनाच्या न्यायबुध्दीवरील विश्वास उडाल्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याकरता त्यांनी वरील पदाचा राजीनामा दिला.त्यांनी सेवानिवृत्ती-वेतन घेतले नाही.

कॉंग्रेसचे कार्य
श्री. मोरारजींची व गांधींची गाठ १९३१ साली पडली. त्यांची गाधींजींवर नितांत निष्ठा होती. ते गुजराथ प्रांतिक कॉंग्रेस कमेटीचे सभासद होते. गांधीजींचा १९३० सालचा मिठाचा सत्याग्रह, कायदेभंगाची चळवळ (१९३३), वैयक्तिक सत्याग्रह व गांधीजींची चले जावची चळवळ ह्या सर्व वेळी त्यांना कारागृहवास झाला. त्यांनी एकूण सात वर्षें तुरुंगात काढली.

सांसदीय राजकारणात सहभागः
श्री. मोरारजी बाळासाहेब खेरांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री होते (१९३७). परंतु कॉंग्रेसच्या युध्दाच्या प्रश्नावर राजीनामा देण्याच्या आदेशानुसार सर्व मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. (१९३९). श्री. बाळासाहेब खेरांच्या दुस-या मंत्रिमंडळात (१९४६) श्री. मोरारजी हे गृहमंत्री म्हणून समाविष्ट झाले. त्यांचा कणखरपणा, प्रशासनावर त्यांची असलेली पकड, ह्यामुळे ते गृहमंत्री असताना त्यांची जरबही मोठी होती. ३१-१-१९४८ रोजी, म्हणजे ज्यावेळी महात्मा गांधींची हत्या झाली, त्यावेळी त्यांनी हिंसेला प्रभावी रीतीने आळा घातला.

त्यांनी भ्रष्टाचाराविरुध्द मोठी मोहीम उघडली होती. बस ट्रान्सपोर्टचे राष्ट्रीयीकरण, न्यायालय व अंमलबजावणी खाते यांची फारकत, तुरुंग सुधारणा करण्याकरता आखलेला कार्यक्रम व गुन्हेगार जातींची सुधारणा करण्याकरता केलेले कार्य ही त्यांची त्यावेळची प्रमुख कामगिरी.

याशिवाय पोलिसांकरता कल्याण निधी, त्यांच्या गणवेशात बदस, मध्यरात्री हॉटेल बंदचा आदेश, सायकल रिक्षावर बंदी, थिएटरमध्ये धूम्रपानावर बंदी, फिल्म सेन्सॉरची स्थापना ह्या गोष्टी त्यांनी कार्यान्वित केल्या. सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे ज्या कर्मचा-यांना कमी केले होते त्यांची पुनश्च नेमणूक केली व इतरांना १९४६ पासून सेवानिवृत्त होण्याचे आदेश दिले. दारुबंदीची त्यांनी कठोरपणे अंमलबजावणी केली. त्यातून येणारा तोटा भरून काढण्याकरता त्यांनी विक्रीकर बसवला.