आमचे मुख्यमंत्री -११

7 balasaheb kher
७. श्री. बाळासाहेब खेर
(१५-८-१९३७ ते ३१-१०-१९३९। ३१-३-१९४६ ते २३-४-१९५२)
त्रिभाषिक मुंबई इलाख्याचे प्रधानमंत्री

कॉंग्रेसने अधिकार ग्रहण करावयाचे की नाही ह्याबाबत ब्रिटिश सरकारशी जवळजवळ ५-६ महिने वाटाघाटी केल्या व सभ्य गृहस्थाचे आश्वासन ह्या सबबीवर सत्ताग्रहण केले. घटनेनुसार ब्रिटिश सरकारला कोणतेही अभिवचन लेखी स्वरुपात देता आले नसते. १५ ऑगस्ट १९३७ रोजी सहा प्रांतात कॉंग्रेलची राज्ये स्थापन झाली. घटना मोडायची ह्या शपथेवरच कॉंग्रेसने १९३७ साली सत्ताग्रहण केले.
पंतप्रधान। मुख्यमंत्री ठरविण्याबाबत महाराष्ट्रात खूपच राजकारण झाले. सर्वसाधारण लोकांचा असा समज होता की बॅ. वीर नरिमन ह्यांची कॉंग्रेस पक्षाचा नेता म्हणून निवड होईल. बॅ. वीर नरिमन हे कॉंग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते होते. त्यांचे मुंबई शहरात मोठे वजन होते. ते उत्तम वक्ते व संघटक होते. म्हणून श्री. बाळासाहेब खेरांची कॉंग्रेस पक्षाचा नेता व पर्यायाने मुख्यमंत्री म्हणून झालेली निवड अनपेक्षित होतीच. अर्थात त्याचे कारण श्री. नरिमन कॉंग्रेस श्रेष्ठींच्या मनातून उतरले होते. १९३६ साली मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या. ह्या निवडणुकांत श्री. वीर नरिमनांनी श्री. कावसजी जहांगिर ह्यांना मदत करून कॉंग्रेस उमेदवार श्री. कन्हय्यालाल मुन्शी ह्यांचा पराभव घडवून आणला असा त्यांच्यावर आरोप होता व श्रेष्ठींच्या पाठिंब्यावरच श्री. बाळासाहेब खेर कॉंग्रेस पक्षाचे नेते व प्रिमिअर-मुख्यमंत्री झाले.

श्री. बाळासाहेब खेरांच्या मंत्रिमंडळात कर्तबगार मंत्री होते. श्री. मोरारजी देसाई, कन्हय्यालाल मुन्शी वगैरे.

जन्म – शिक्षण

श्री. बाळासाहेब खेर ह्यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८८ साली रत्नागिरीस झाला. त्यांना माध्यमिक शिक्षणाकरता चार ठिकाणी यात्रा करावी लागली व अखेर अहमद नगर सिटी हायस्कूलमधून १९०२ साली ते उत्तम रीतीने मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची शैक्षणिक कारकीर्द उत्तम होती. ते १९०८ साली विल्सन कॉलेजातून बी.ए. झाले. कॉलेजात त्यांना अनेक शिष्यवृत्या व बक्षिसे मिळाली होती. संस्कृतकरता असलेले भाऊदाजी पारितोषिकही त्यांना मिळाले होते. १९०८ साली त्यांना सिनियर दक्षिणा फेलोशिप मिळाली होती. त्यानंतर १९०८ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले व १९१२ साली त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. परंतु त्यांची वकिली बेताबातच होती. म्हणून त्यांनी मुंबई हायकोर्टाचे ज्युनिअर न्यायाधीश जस्टीस बीमन ह्यांच्याकडे रिडर कम सचिव म्हणून नोकरी धरली. दोन प्रयत्नानंतर तिस-या प्रयत्नाअंती १९१८ साली ते सॉलिसिटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. जून १९१८ मध्ये त्यांनी मणिलाल व खेर म्हणून स्वतःची सॉलिसिटर फर्म सुरू केली.