आमचे मुख्यमंत्री -७

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक मान्यवर व्यक्ती मुख्यमंत्री होत्या. श्री. बाळासाहेब खेर (महाराष्ट्र), श्री. गोविंद वल्लभ पंत (उत्तर प्रदेश), खानसाहेब (सरहद्द प्रांत), डॉ. बी. सी.रॉय (पश्चिम बंगाल), श्री. राजगोपालाचारी (मद्रास), श्री. पटनाईक (ओरिसा) अशी नावे सांगता येतील. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या व त्याग केलेल्या आणि बंदिवास भोगलेल्या ह्या व्यक्ती होत्या. त्या सर्व मंडळींनी राजकारण व सत्तेचा उपयोग लोककल्याणाकरता केला. अधिकारग्रहण केल्यानंतरही त्यांची जीवनशैली साधी होती. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायी भाव होता. राजकारणातील अनिष्ट प्रवृत्तींना त्यांचा धाक होता. त्यामुळे भ्रष्टाचार व सामाजिक जीवनाच्या अवमूल्यनाला एक प्रकारचा पायबंद बसला होता. काही राज्यपाल ब्रिटिश होते. मुंबईत लॉर्ड ब्रेबर्न, लम्ले हे दोघे काही काळ गव्हर्नर होते. ते दोघेही सभ्य राज्यपाल होते. इतर राज्यांतही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या नामवंत व्यक्ती राज्यपाल होत्या. आज मुख्यमंत्री हे श्रेष्ठींच्या पटावरील खेळणी झाली आहेत, तर नको असलेले राजकारणी हे राज्यपाल झाले आहेत. त्यांना स्वतःचाच उत्कर्ष करून घेण्याचा ध्यास लागलेला असतो. स्थानिक राजकारणावर दबाव आणण्याकरताच श्रेष्ठींनी त्यांची नेमणूक केलेली असते.

५. सत्तेचे रचनाशास्ञ

भारताचे पंतप्रधान वा राज्यांचे मुख्यमंत्री होण्याकरता त्या व्यक्तीच्या ठिकाणी काही विशेष गुण असावे लागतात. उदा., लोकांच्या प्रश्नांची जाण, लोकसंग्रह करण्याचे कसब इ. परंतु या सर्व गुणांनी संपन्न जरी एखादी व्यक्ती असली तरी त्या पदापर्यंत ती पोहोचेलच अशी खात्री नाही. उदाहरणार्थ, श्री. यशवंतरावजी चव्हाणाकडे पंतप्रधान होण्यासाठी लागणारे सर्व गुण होते. परंतु ते पंतप्रधान झाले नाहीत. श्री. विठ्ठलराव गाडगीळांकडे कबिनेट मंत्री होण्यास सर्व गुण होते, परंतु ते फक्त राज्यमंत्री झाले. ते अधिकारवर तसे म्हटले तर फारच थोडा काळ राहिले होते. श्री. शरदजी पवार ह्यांना संधी आली असताना सुध्दा पंतप्रधानाच्या पदापर्यंत ते पोहोचले नाहीत. श्री. सुशीलकुमार शिंदे ह्यांच्या हातून मुख्यमंत्रिपद तीनदा निसटले. श्री. मनोहरपंत जोशी व श्री. नारायणरावजी राणे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनाही काटशह बसला. श्री. सुधीर जोशीजी मुख्यमंत्रिपदाला लायक व्यक्ती अशी प्रतिमा लोकमानसात होती. परंतु हे पद त्यांच्यापासून लांबच राहिले. ह्याचा अर्थ गुण असले तरी असे पद मिळविण्यास नशीब लागते हे त्रिवार सत्य आहे. याउलट अतिशय सामान्य व सुमार बुध्दीच्या व्यक्तींना हे पद मिळून जात. अर्थात, ते त्या पदावर फार काळ टिकत नाहीत हि गोष्ट वेगळी.

ह्याविषयी इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या संदर्भात जेम्स मारगॉच ह्यांनी दि अनेटॉमी ऑपपॉवर म्हणून एक मजेशीर पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी एकूण ब्रिटिश पंतप्रधानांबद्दल लिहिले आहे. तो म्हणतो की राजकारण हा सत्तेचा खेळ आहे. त्याकरता नशीब, महत्त्वाकांक्षा, धैर्य, दूरदृष्टी, ध्येयवाद, मुत्सद्दीपणा, व्यवस्थापनकौशल्य, कठोरता वगैरे अनेक गुण लागतात. त्या व्यक्तीचे राजकीय व व्यवस्थापनातील कौशल्य, कायदे वगैरेंचे ज्ञान, जाहीरनाम्यातील वचने ह्या गोष्टींचा संबंध दूरान्वयानेच असतो. त्यांचे अंतर्गत व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख पैलू ह्यासंदर्भात जास्त महत्त्वाचे असतात. अर्थात हे सर्व गुण त्या पदावर आरुढ झाल्यावरच उपयोगी येतात. ती व्यक्ती त्या अधिकारपदावर नशीब व अपघातानेच येत असते.