महाराष्ट्रातील दुष्काळ - ६

यशवंतराव चव्हाणांच्या प्रेरणेने आणि प्रोत्साहनाने मी भारत सरकारच्या मंत्रिमंडळात माझ्या आवडत्या शेती-कृषि व्यवसायाशी संबंधित खात्याचा मंत्री झालो होतो.  सतत पंधरा वर्षे राष्ट्रीय कृषि विकास कार्याची ध्येयधोरण-आखणी करण्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीत व्यतीत झाली.  भारतीय हरित-क्रांतीचा भागीदार मला होता आले व तिच्याद्वारे भूमातेचे ॠण फेडण्याचे अल्प समाधान मी मिळवू शकलो.  परंतु मुख्य समाधान हे आहे की देशपातळीवरील शेती समस्यांचे सर्वसमावेशक पदर अभ्यासण्याची व त्यानुषंगाने ग्राम विकास, पाणी व पर्यावरण, शेतीचा व्यापारी भाग, त्यांशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्या, व विदेशातील मानवी अनुभव, त्याचप्रमाणे ह्या बाबतीतील नामवंत तज्ज्ञ, अभ्यासक व संशोधकांच्या साहचर्यामुळे मला ह्या प्रश्नांच्या आयामांच पारख करण्याची दृष्टी लाभली.  ह्या दृष्टीमुळेच महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन ह्या ग्रंथात सर्वांगीण व्यापकता सहजपणे अवतरू शकली आहे.

महाराष्ट्राच्या शेतीचा इतिहास हा उपासमार, घाम व रक्ताचा इतिहास होता आणि अजूनही आहे.  सहकारी चळवळीमुळे शेती उत्पादनाला व्यापारी जगाशी टक्कर देण्याची संधी मिळू लागली.  त्यामुळे शेतीची उत्पादनक्षमता निश्चितच वाढू लागली.  ही उत्पादनक्षमता आणि सारख उद्योगामुळे आलेली समृद्धी निवडक भागाला मिळाली हे खरे.  त्यामुळे आर्थिक विकासाचा असमतोलही दिसू लागला.  हा असमतोल दूर करण्यासाठी आणि ग्रामीण समाजाची पुनर्आखणी करण्यासाठी परत एकदा शेतीचाच आधार घेणे जरूरीचे आहे.  त्यासाठी आडगाव, पळसखेडा, म्हैसाळ, राळेगाव शिंदी येथे होत असलेले, गाव-समाज म्हणून एकसंघतेने केलेले प्रयत्‍न महाराष्ट्रभर प्रख्यात झाले आहेत.  हे अत्यंत मोलाचे सामाजिक सेवाकार्य होय असे माझे मत आहे.  महाराष्ट्राच्या सर्व थरांतील युवक कार्यकर्त्यांना अशा प्रकारची क्रियाशील समाजिक सेवा अनुसरणासाठी निमंत्रित करत आहे.  ह्या ग्रंथामध्ये त्या दिशेकडे वाटचाल करण्यासाठी रूपरेषा निश्चितपणे आढळेल.  प्रगतीची अनेक गाणी आहेत, आपण कोणते निवडाल ते निवडाल.  महाकवी महानोरांनी स्फूर्ती घेऊन आपले एक गाणे निवडले, ज्याचे गोड स्वर अजिंठ्याकडून वाहणार्‍या वार्‍याने सर्व महाराष्ट्राभर पसरवले आहेत.  म्हणून आपणही गाणे निवडावे, आणि गावेही मोठ्या षौकाने, हे मात्र आवश्यक माना.

बलाढ्य राष्ट्र बनून भारताला जगात अग्रेसर राहावयाचे आहे.  त्यासाठी इतर राष्ट्रांतील मानव समूहाने अग्रेसर होण्यासाठी जे जे प्रयत्‍न केले आहेत व करीत आहेत त्याचे भान ठेऊन, भारताने आपली कार्य दिशा पक्की केली पाहिजे.  लोकशाहीद्वारे हे सिद्ध व साध्य करावयाचे म्हणजे मूलभूत सार्वजनिक धोरणे, विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान ह्यांच्या आधारे, शासनाने नक्की कली पाहिजेत.  त्यासाठी शेतमालाचे भाव, रासायनिक खते व यंत्रसामुग्री ह्या विषयातले प्रबोधन ही राष्ट्रीय धोरणांची अटळ अंगे आहेत.  शेती व अन्न फलोत्पादन, स्वच्छ पाणी, पर्यावरणाबाबत जागृती हे सर्व राष्ट्रहिताशी निगडित कर्तव्याचे प्रश्न आहेत.  म्हणूनच 'दुष्काळ आणि पाणी' ह्या चर्चा शिबिरात ह्या सर्व विषयांचा जागृत शेतकर्‍यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि तज्ज्ञ जाणकारांनी आग्रहाने उल्लेख केला होता.  आणि असा उल्लेख स्वाभाविकच मानला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे पक्षातील मुक्त व्यासपीठ आहे.  'दुष्काळ आणि पाणी' ह्या चर्चेच्या अधारे महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी अग्रक्रमाने काय आवश्यक आहे, ह्याची कर्तव्यबुद्धीने महाराष्ट्र नोंद घेईल अशी आशा आहे.  आणि ही आशाच महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन ह्या ग्रंथसंपादनाच्या मागील प्रेरणास्त्रोत आहे.

ह्या ग्रंथाचे प्रभावी संपादक आणि सर्वसमावेशक अंतरंग हे प्रतिष्ठानचे सरकार्यवाह प्राचार्य पी. बी. पाटील ह्यांच्या बहुमुखी दृष्टीमुळे आणि प्रा. विजय पानसरे ह्यांच्या आस्थेवाईक परिश्रमामुळे शक्य झाले आहे, असे माझे नम्र मत आहे.  म्हणून प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष म्हणून मी उभयतांना ह्या ग्रंथाच्या निमित्ताने विशेष धन्यवाद देतो.

अण्णासाहेब शिंदे
संपादक
उपाध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
दसरा
१० ऑक्टोबर, १९८९