महाराष्ट्रातील दुष्काळ - ४

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे ज्याप्रमाणे पक्षभेदपंथातील वैचारिक व्यासपीठ बनले आहे, तसेच ते विविध ज्ञानशाखांचा सैद्धांतिक समन्वय वास्तविक व्यवहाराशी कसा घातला जाऊ शकतो हे दाखवणारे मुक्त कार्यानुभवाचे वर्कशॉपही बनून समाजाला उपयोगी गोष्टी शिकवणारे प्रेरणा केंद्रही बनत आहे, हे ह्या ग्रंथावरून कळू शकते.  श्री. अण्णासाहेब शिंदे नेहमी म्हणतात, गोरगरीबांना जे लाभदायी आहे ते देणारे माध्यम आपण झाले पाहिजे.  यशवंतराव चव्हाणांचे समग्र जीवन ह्या एकाच विचाराने भारलेले होते.  शेतीच्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार समाजाने करावा ह्यासाठी हा ग्रंथ आग्रह बाळगतो !  पाण्याबाबत आमूलाग्र काटेकोरपणाचा दृष्टिकोन स्वीकारण्याचे वैज्ञानिक आवाहन ह्या ग्रंथाच्या पानापानात आहे.  खरे म्हणजे हे काम शेती-विद्यापीठाचे आहे.  हे करण्यासाठी सुविद्य शेती तज्ज्ञ, पाणी तज्ज्ञ आणि कौशल्याने व ग्रामीण बुद्धिमत्तेने भरपूर उत्तम पीक काढणारे शेतकरी एकत्र यायला पाहिजेत.  हे सर्व ह्या ग्रंथात एकत्र आले आहेत. सक्रिय कार्यकर्त्यांना हा ग्रंथ नव्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दिशा दाखवणारा एक मोठा मार्गदर्शक मानला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे नवभारत युवक आंदोलन आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठ ह्या दोन चळवळी आरंभिल्या आहेत.  ह्यांच्यामुळे नव्या जागरूक धर्मजातिपंथभेदातील सामाजिक कार्यकर्त्यांची दले निर्माण व्हावी ही अपेक्षा आहे.  त्यांच्यासाठी हा ग्रंथ राज्यव्यापी कार्यक्रम आखण्यास प्रेरणा व प्रोत्साहन देणारा आहे.  मला असे सुचवावेसे वाटते की ह्या आंदोलनाच्या बैठकांतून आणि महिलांच्या व्यासपीठावरून महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन ह्यावर आधारलेले प्रबोधनाचे व प्रत्यक्ष कार्य करून दाखवण्याचे नवे पर्व सुरू झाले पाहिजे.  यशवंतरावांनी एके ठिकाणी म्हटले आहे :

'(त्याकरिता) शेतीचे हे ज्ञान पावसाच्या पाण्यासारखे (वाहत) गेले पाहिजे असे मला वाटते.  वाहणारी नदी ज्या गावच्या काठाने जाईल त्यालाच पाणी देते.  पण पावसाचे पाणी हे सगळीकडे जाते.  कुठे कमी, पर कुठे जास्त, असे पावसाच्या पाण्यासारखे खेतीचे सर्वव्यापी ज्ञान सगळीकडे पसरले पाहिजे, वाढले पाहिजे.'

असा हा मुक्त महाविद्यालय स्वरूप ग्रंथ आचरणात यावा म्हणून जनतेला बहाल करताना मला ह्या दसर्‍याच्या दिवशी खूप आनंद वाटतो.

शरद पवार
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
दसरा
१० ऑक्टोबर १९८९