महाराष्ट्रातील दुष्काळ - ५

संपादकीय

डॉ. अण्णासाहेब शिंदे
उपाध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

'दुष्काळ आणि पाणी' ह्या विषयावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, तर्फे चर्चा विनिमय शिबिर, २६-२७ फेब्रुवारी १९८८ मध्ये संपन्न झाले.  ह्या चर्चा-शिबिरामध्ये महाराष्ट्रातील दुष्काळाचे स्वरूप आणि ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या सहाय्याने कोणत्या प्रकारे उपयोजन करावे; शिवाय, वापरल्या जाणार्‍या, आकाशातून पडणार्‍या व व्यर्थ जाणार्‍या पाण्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने कसे करावे, ह्याबाबत अत्यंत उपयोगी व व्यवहार्य मार्ग सुचवणारी चर्चा झाली.  आधुनिक तंत्रविज्ञानाला पाणी व्यवस्थापनामध्ये कितीतरी महत्त्व आहे, हा मुद्दा ह्या चर्चासत्रात प्रकर्षाने मांडण्यात आला.  ह्या सर्व विचारमंथनावर आधारित एक ग्रंथ संकल्पना प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने मान्य केले होती.  त्यातून निर्माण झालेला महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन हा ग्रंथ महाराष्ट्रातील ग्रामीण विकास आणि अभ्यासात स्वारस्य असणार्‍या रसिकांच्या हाती देताना कर्तव्यपूर्तीचा, अल्प का होईना, आनंद वाटत आहे.  खूप आनंद त्यावेळी वाटेल जेव्हा ह्या ग्रंथात अनेक ठिकाण चर्चा केल्याप्रमाणे जनतेचा सहकार, जनतेचा सहभाग आणि जनतेचा पुढाकार ह्या त्रिसूत्रींचे सम्मीलन होऊन काटकसरीने पाणी वापराच्या तंत्राचा मोठ्या प्रमाणात प्रसार होईल आणि लक्षावधींना पाण्याच्या बाबतीत न्याय मिळवून देण्यात यश मिळेल.  आणि अशा यशाच्या खात्रीसाठी एखादे रचनात्मक जन आन्दोलन उभे राहून सातत्याने कार्य करील.

ह्या ग्रंथात मी स्वतः लिहिलेले दोन निबंध आहेत.  एक दीर्घ (प्रबन्धात्मक) निबंध व दुसरा स्वच्छ पाण्यासाठी विदेशात सुरू असलेल्या प्रयत्‍नांची माहिती देणारा साधारण मर्यादित टिपणवजा लेख.  अन्य सामुग्री :  दुष्काळाचे स्वरूप, दुष्काळ दूर करण्यासाठी शासकीय प्रयत्‍नांची रूपरेषा निश्चित करण्यासाठी नियुक्त आयोगांच्या शिफारशींचा गोषवारा, राष्ट्रीय पाणी धोरण, अल्प पाण्याचे संचयन व नियोजनबद्ध उपयोजन करून अन्नधान्यफळफळावळ निर्मितीचे प्रयत्‍न स्पष्ट करणारे लेखन-साहित्य हे विविध तज्ज्ञ व व्यासंगी अभ्यासकांनी लिहिलेले आहे.  त्यांच्या सहकार्याबद्दल मी ॠणी आहे.  ह्याशिवाय ह्या चर्चाशिबिरात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत, त्याचेही वेगळेपण वाचकांना विचारांची वेगळी दिशा देऊ शकेल.  ग्रंथ संकल्पना जसा आकार घेऊ लागली, तसा, हाही विचार मनात आला की काही उपयोगी नकाशे तयार करावेत.  ज्यामुळे ग्रंथाला संदर्भमूल्यही लाभेल.  असे आठ वेगळे नकाशे विशेष परिश्रमपूर्वक तयार करून घेण्यात आले.  राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या सेवेतील श्री. कांबळे ह्या प्रतिभावंत नकाशाकाराने हे नकाशे विश्वासपात्रतेचा कटाक्षपूर्वक आग्रह मनात बाळगून आणि कौशल्य पणास लावून तयार केले.  ह्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस, अवर्षणग्रस्त प्रदेश, भूगर्भातील पाणी प्रदेश, पाणीविहीन प्रदेश, धरणे, तलाव पाणलोट क्षेत्र इत्यादींचा समावेश असणारे हे नकाशे, पुष्कळ नवी माहिती दाखविण्याएवढे बोलके आहेत.  ते सर्व नकाशे ह्या ग्रंथात चर्चित विषयाच्या संदर्भाप्रमाणे समाविष्ट करण्यात आले आहेत.  ह्या ग्रंथातील परिशिष्टांतूनही चर्चाविषयासंबंधी पूरक माहिती मिळेल.  ऑगस्ट १९८९ पर्यंतची पूर्ण, अपूर्ण व संकल्पित धरणे, व पाणी प्रकल्प ह्यांची अधिकृत माहिती आणि ह्या विषयांशी संबंधित ग्रंथांची संदर्भ सूची ही देखील परिशिष्टांत संग्रहित केलेली आढळेल.  ह्यामागे माझी एक विशिष्ट भूमिका आहे; ती अशी की यशवंतराव चव्हाणांनी कृषि-औद्योगिकतासंपन्न आधुनिक समतावादी महाराष्ट्राची रचना व्हावी असे जे स्वप्न पाहिले होते, त्या दिशेकडील प्रवास हा व्यासंग व जिज्ञासापूर्तीच्याच आधारे यशस्वी होऊ शकेल, अन्यथा नाही.  ह्याची जाणीव शेती विषयक कार्यकर्त्यांनी मनात सतत बाळगावी म्हणून हे संकलन.

मी स्वतः एका शेतकरी कुटुंबात व एका खेड्यात जन्मलेला माणूस.  आईवडिलांचा पिढीजात शंदा म्हणजे काळ्या भूमातोची शेती करणे व शेती राखणे.  माझे शालेय जीवन शेताला पाणी देणे, गुरे राखणे व त्यांना चरवणे, कडबा देणे आणि शेतकामात आईवडिलांना मदत करण्याच्या अंगमेहनतीने भरलेले आहे.  घरची गरिबी, शेती केल्याशिवाय जेवण मिळणे दुरापास्त.  त्याही परिस्थितीत आईवडिलांनी खस्ता खाऊन मला शिकवले, परंतु शेतकामापासून मला दूरही ठेवले नाही हे विशेष.  अशाप्रकारे मी ही शेती, पाणी, गुरे, दुष्काळ आणि ओढाताण ह्यातून वाढत वाढत महाराष्ट्रातल्या जनजीवनातील ढेकळांना सपाट करत व त्यातल्या तणांना उच्छेदून टाकण्याचा सतत प्रयत्‍न करत राहिलो आणि उन्नत होण्याच्या जिद्दीचा भाग बनत गेलो.  त्यामुळे माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की कमाल उत्पादनक्षमतेचा ध्यास धरूनच महाराष्ट्राच्या शेतीला आधुनिकता देण्याचे सार्वत्रिक प्रयत्‍न झाले पाहिजेत.  अशा प्रयत्‍नांना आज समाजात सन्मान व प्रोत्साहन मिळत आहे.  महाराष्ट्रातल सामान्य शेतकरी कमाल उत्पादनासाठी विविध आधुनिक तंत्रांचा आग्रहपूर्वक प्रयोग करताना दिसत आहेत.  म्हणूनच उत्तम उत्पादन क्षेमतेसाठी चालवलेल्या पद्धतींचा वापर अधिक वाढत्या प्रमाणात झाला पाहिजे.