थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (8)

आजचा महाराष्ट्र वैभवशाली इतिहासाची परंपरा राखत वैज्ञानिक युगात सांस्कृतीक, सामाजिक, औद्योगिक, कृषी, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात आघाडीवर आहे. तथापी स्वार्थाने देश विघातक प्रवृत्ती या सगळ्याचा, तुमच्या प्रीय महाराष्ट्राला, सुराज्याची चव चाखू देत नाहीत म्हणून तुम्ही दाखवलेल्या दिशेने सुखी-समृध्दी समतेवर, आधारीत महाराष्ट्र कार्यरत करण्याचे व हे करत असता प्रसंगी स्वातंत्र्य संग्रामातील चळवळीत तुम्ही झेललेले आघात घेण्याचे आम्ही आमचे ध्येय ठरविले आहे. यशवंतरावजी आम्हाला बुध्दी द्या, सामर्थ्य द्या, आशिर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाने वैचारिक परिवर्तनाच्या मोहिमेतील माध्यमातून राबवण्यात येणा-या कार्यक्रमात मनापासून योगदान देत असलेल्या तरुणांना निश्चित केलेले ध्येय साकारण्याचे सामर्थ्य लाभेल याचा मला विश्वास वाटतो.

स्व. यशवंतरावजी आज आपल्यात असते तर काय मार्गदर्शन केले असते याबाबत अध्ययन आश्रमातील सामान्य अनुयायाने प्राप्त परिस्थीतीत कोणत्या कार्यक्रमाला प्राधान्य द्यावे याबाबत स्व. यशवंतरावजींना अभिप्रेत असलेल्या सुचना मार्गदर्शनाच्या स्वरूपांत मिळवल्या आहेत. अनुयायी आश्रमातील सामान्य अनुयायाने स्व. यशवंतरावजींना पाठवलेल्या पत्रातून व स्व. यशवंतरावजींनी पत्र रूपाने दिलेल्या उत्तरातून दिसून येतील.

आपला
धाकटा बाळ

प्रीत संगम, कराड  
दिनांक : २५-११-२०१०

 

स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेणा-या पिढीने स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर व्हावे हे स्वप्न पाहिले. आजच्या वैफल्यग्रस्त समाजमनाला सुसंस्कारीत परिवर्तनाची गरज वाटते. सामान्यांचे जीवन सुखी, समृध्द व आर्थिक बलवान करण्याकरीता थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक व सहकार या क्षेत्रात काम करताना दिलेले राजकीय आदर्श आजही देशाला गतवैभव मिळवून देण्यास उपयुक्त ठरतील. स्व. यशवंतरावजींच्या राजकीय आदर्शात राष्ट्रप्रगतीची शक्ती आहे. पण आज स्व. यशवंतरावजींचे आदर्श सामाजीक व राजकीय जिवनात जोपासले जात नाहीत. जोपासण्याचा प्रयत्न करणा-यांना समाजाची व सर्व क्षेत्रातील व्यवस्थापनांची साथ मिळत नाही. हेच सद्य स्थितीतील अधोगतीचे कारण ठरते. आज स्व. यशवंतरावजी हयात असते तर आम्हाला काय मार्गदर्शन केले असते हे आजच्या पिढीला विशेषतः तरुण पिढीला समजणे गरजेचे वाटते. स्व. यशवंतरावजींच्या राजकीय आदर्शावर श्रध्दा व विश्वास असणा-या त्यांच्या सामान्य अनुयायाने स्व. यशवंतरावजींना आजच्या परिस्थितीबाबत अभिप्रेत असलेले उपाय व विचार पत्र रुपाने मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘थोरले साहेब-पुण्यस्मृती अभिवादन’ लेखमालेतील स्व. यशवंतरावजी यांना सद्यस्थितीबाबत समस्या कळवून मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांची परवानगी मागणारे पत्र आज सादर करत आहे.