थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (4)

नव महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर स्वातंत्र्य सेनानी, लोकाभिमुख राजकारणी, मुत्सदी, सुसंस्कृत लोकाग्रणी, विचारवंत, बुध्दीमान, कर्तृत्ववान आणि कष्टकरी – साहित्यीक व कलावंत इत्यादी वर्गाचे पाठीराखे, जन्माने देवराष्ट्राचे व कर्माने राष्ट्राचे झालेले नव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र निर्मीतीच्या पुर्व संधेला नव-महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा सर्वांसमोर मांडला होता. त्या आराखड्याच्या दिशेने आपण वाटचालही सुरु केली. त्याचीच फळे म्हणून महाराष्ट्र आज सामाजीक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, सहकार, कृषी क्षेत्रांत अग्रेसर व संपन्न आहे. तथापी या प्रवृत्तीला गेल्या २५ वर्षापासून आपसातील राजकीय वितंडवादातून राज्याच्या विकासाचे लक्ष दुय्यम दिसू लागले. देश व जागतीक पातळीवर थैमान घालणारा विध्वंस, भ्रष्टाचार, आतंकवाद, धर्मवाद, जाती-जातीचे पुनर्जिवन इत्यादी कारणाने समाजाभीमुख विकास आणि राष्ट्रवादाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ मिळत नाही. अशा परिस्थीतीत आपले राज्य आणि देश कोणत्या दिशेने जात आहे हे पहातांना प्रत्येकजण चिंतेत आहे.

नवमहाराष्ट्र निर्मीतीची कल्पना मांडताना स्व. यशवंतरावजींनी राजकीय अर्थिक व नवबौध्दांचा, महाराष्ट्राच्या विविधतेचा प्रश्न सोडवण्याकरिता. आपले विचार सर्वांसमोर ठेवले. त्यात त्यांनी भावनात्मक प्रश्न सोडवण्याकरिता सांगीतले, आपले मराठी बांधव वर्षानुवर्षे आपल्या पासून दुरावले होते. विदर्भ व मराठवाडा यांच्या मनातला संशय आहे त्यांना भावनेने आमच्याशी एकरुप होता येईल असे वातावरण निर्माण करायचे आहे. मराठवाडा मराठी माय बोलीचे माहेर, तेथे मराठी भाषा रांगली-चालतीबोलती झाली तो मराठवाडा १००-१५० वर्षे मोगलाईत पडला होता. मध्यप्रदेशांत व-हाड जावून पडले होते. हे बांधव तेथील परंपरेत, भावनांच्या आवरणांत व तेथील पार्श्वभूमीत वाढले. त्यांना आपण आपुलकीने, प्रेमाने जवळ घेतले पाहीजे. मेहरबानी म्हणून नव्हे तर तो त्यांचा हक्क आहे म्हणून. सामाजीक प्रश्ना बाबत त्यांनी सांगीतले, महाराष्ट्राच्या सामाजीक जिवनासंबंधी अनेक विचारवंतांची चिंता व्यक्त करुन त्याचे वर्णन “भंगलेले मन असे केले होते. महाराष्ट्राच्या मागणीचा पाठपुरावा करताना आमचा एक आवाज एक मन यासारखे ऐक्याचे दर्शन नाही. हे एक दिसणारे मन-ऐक्य संयुक्त महाराष्ट्र येतो आहे म्हटल्यावर शंकेने भरले ते भंग पावलेले मन आपणांस सांधावयाचे आहे. प्रत्येक जण आपल्या जातीवर आधारीत विचार करत आहे. जातीयवादाच्या या विषारी विचारापासून महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे तरच महाराष्ट्राचे मन एकजिनसी होईल. जातीय वाद प्रत्येक जातीत असला तरी आपण विचारपूर्वक ७०-८० वर्षे राष्ट्रवादी भावनेला वाहून घेतलेली माणसे आहोत. म्हणून हे विचार मनांत आणू नका. निवडणूकीच्या माध्यमातून बहुजन समाज पुढे येत असता गुणांची अवहेलना होणार की काय ? अशी शंका आणू नये. शंका घेवू नका. गुणांची पुजा होणे-मेरीटचे महत्व ठेवणे गरजेचे आहे. आणि तो आपला निर्धार आहे. संख्या बळाच्या जोरावर कोणाला मागच्या बाकड्यावर बसण्याची वेळ येणार नाही. नव बौध्दाचे प्रश्न मांडताना स्व. यशवंतरावजीनी सांगीतले डॉ. आंबेडकरांनी अस्पृष्य म्हणून वावरलेल्या समाजांत नवी जागृती निर्माण केली व अनेक बुध्दीमान व विचार करणा-या कर्तृत्ववान तरुणांचा नवा वर्ग तयार केला. जो समाज तुमच्या आमच्याबरोबर समाजांत वावरला, त्या समाजाचा स्वाभीमान जागृत झाला आहे. या समाजातील बुध्दीमान, कर्तृत्ववान मंडळींना सहभागी करुन घेतले पाहीजे. त्यांना सहानुभुती नको आहे. त्यांना हक्क हवा आहे. नवा महाराष्ट्र कर्तृत्ववान हातानी घडवायाचा असेल तर जुना राग, द्वेष दूर करावाच लागेल. त्यांच्या मनांत भागीदारीची भावना निर्माण करुन समरसता निर्माण करावयाची आहे. शेतीच्या प्रश्नाबाबत सांगताना स्व. यशवंतरावजी म्हणाले की, सर्वांच्या शेतीच्या समस्या समजून घेताना शेतकरी म्हटले की सारख्या समस्या न मानता भौगोलीक विचार करुन वास्तव समस्यांचे निराकरण करण्याचा आपला निर्धार आहे. बियाने-खते-पाणी आणि नवीन तंत्र विभागनिहाय फळबागांचा विचार. हे सर्व प्रश्न सोडवताना एकजिनसी कार्यकर्त्यांची सेना आपणांस उभी करायची आहे.