थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (2)

“थोरले साहेब – पुण्यस्मृती अभिवादन”

आज राज्य-देश व जागतीक स्थरावर स्वार्थ, भ्रष्टाचार, दहशतवाद तसेच जातीय व धार्मीक वैर वाढून माणसा-माणसातील सामाजिक, सांस्कृतीक, धार्मीक व राजकीय नितीमत्ता लोप पावल्याचे दूर्दैवी वास्तव आपण सर्वजण अनुभवत आहोत. शासन, समाजसेवक, सेवाभावी संस्था सर्वजण आपआपल्या परिने हे दुष्टचक्र नाहीसे करण्याकरिता प्रयत्न करत आहेत. राज्याला स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे रूपाने लाभलेले नेतृत्व व त्यांच्या सामाजीक, राजकीय कार्यपध्दतीची पदोपदी आठवण होत आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या सामाजीक व राजकीय कार्यपध्दतीवर विश्वास व श्रध्दा असलेल्या त्यांच्या सामान्य अनुयायाने “आज यशवंतरावजी आपल्यांत असते तर” प्राप्त परिस्थीतीत आपण सर्वांना सुसह्य व आदर्श जिवन जगण्यासाठी काय मार्गदर्शन केले असते. याबाबत शोधबुध्दीने यशवंतरावजींना अभिप्रेत असलेले मार्गदर्शन प्राप्त केले आहे. अनुयायाने पत्र रूपाने स्व. यशवंतरावजींना कळवलेल्या आपल्या भावनातून स्व. यशवंतरावजीनी पत्ररूपाने केलेल्या मार्गदर्शनाचे स्वरूप स्पष्ट करण्याचा केलेला विनम्र प्रयत्न “पत्रास कारण कि” सादर करत आहे.

पत्रास कारण कि,

वडीलधारी मंडळी, उद्याच्या शक्तीशाली भारत देशाचे शक्तीशाली आधार युवक-युवती, माझे सहकारी बंधू भगिनिंनो,

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीत ज्या थोर नेत्यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी अखंड सायास केले, आपले प्राण खर्ची घातले, त्या स्वातंत्र्य सैनिकांचे आणि स्वराज्यातील सामान्यांचे जिवन सुखी, सुसंस्कृत, समृध्द, आर्थीक बलवान करण्याकरिता शेवट पर्यंत प्रयत्न करणा-या, नव महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याची दिशा देणा-या, ज्यांच्यामुळे आपण स्वराज्याची फळे मनसोक्तपणे चाखत आहोत, अशा थोर स्वातंत्र्य सैनिक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्य स्मृतीचे स्मरण करुन त्यांना अभिवादन.

प्राचिन भारताच्या इतिहासातील ऋषीमुनींच्या तपश्चर्या, साधूसंतांच्या ध्यानसाधना, ग्रंथ साधना, संत प्रबोधन, समतेवर आधारीत संस्कृती यातून मिळालेली नात्याची, श्रध्देची, निष्ठेची, भक्तीची, आदरातिथ्याची शिकवण जोपासत आपण जो-जे वांछील तो ते लाहो अशी विश्वातील प्राणीमात्राकरीता प्रार्थना समजून घेतली.

प्राचीन भारत प्रगत होत असतांना घडलेल्या इतिहासात, धर्माकरिता, सत्तेकरिता झालेल्या युध्दांचा इतिहास वाचला. आपल्या संस्कृतीवर आधारीत सहिष्णुता जोपासन्याकरिता कार्यरत झालेल्या समाजसुधारकांचा कालखंड पाहिला. गुलामगीरीत ठेवणारे देशही ऐकले. हळू हळू गुलामगीरीचे हाल आणि स्वातंत्र्याचे मोल समजायला लागून सुरु झालेला स्वातंत्र्य संग्राम वाचनात आला. प्रदिर्घ संघर्षानंतर स्वातंत्र्य सुर्य उगवण्याचे भाग्य देशा-देशाला मिळू लागले. आपल्या भारत देशातही स्वातंत्र्याकरीता १००-१५० वर्षे संघर्ष करावा लागला. आपण विसाव्या शतकांत १९४७ साली स्वतंत्र झालो. प्रजासत्ताक राज्यसत्ता स्विकारली व आपला विकास करण्याचे काम करु लागलो. आज आपण जगभर गाजावाजा झालेल्या सर्वार्थाने प्रगतीची माध्यमे हस्तगत करणा-या २१व्या शतकाचे पहिले दशक संपवत आहोत. वास्तविक आजच्या प्रगत २१व्या शतकाचा पाया २०व्या शतकांतच घातला गेला. इतिहासांतील वाटचाल पाहिल्यावर २०वे शतक सर्वार्थाने प्रगतीचा पाया घालणारे ठरले. आज जागतीक स्थरावर स्वार्थ, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीय व धार्मीक वैर वाढून माणसामाणसातील सामाजिक, सांस्कृतीक, धार्मीक व राजकीय नितीमत्ता लोप पावल्याचे दुर्दैवी वास्तव आपण अनुभवत आहोत.